Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधनक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा...!

नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!

सुहास गोखले

(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)

पहिली तीन नक्षत्रं – अश्विन, भरणी, कृत्तिका यांच्याबाबत गेल्या लेखात मी आकाशातल्या पहिल्या तीन नक्षत्रांची माहिती आणि त्यांच्या आधारावर पुराणात आलेल्या कथा सांगितल्या होत्या. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती आणि पौराणिक कथा पाहुया.

रोहिणी : रोहिणी नक्षत्राच्या संदर्भात काही कथा पुराणात आढळतात. या ताऱ्याबद्दल आपल्या प्राचीन साहित्यामध्ये एक कथा आढळते. ती म्हणजे, प्रजापतीने प्रथम विराट नावाची स्त्री उत्पन्न केली. पण तिला यज्ञात योग्य तो मान न मिळाल्यामुळे ती उंच आकाशात गेली. उंच उडत जाणारी, आरोहण करणारी म्हणून तिचे नाव रोहिणी पडले असावे.

दुसऱ्या एका कथेनुसार रोहिणी ही अत्यंत सौंदर्यवती होती आणि तिच्या या सौंदर्यावर तिचा पिता प्रजापती लुब्ध झाला. कदाचित, आपल्या पित्याच्या या घृणास्पद वर्तनामुळे ती आकाशात निघून गेली आणि रोहिणीचा ठळक, सुंदर तारा बनली.

आपल्या येथील पौराणिक साहित्यामध्ये चंद्र हा रोहिणीचा पती असल्याचे वर्णन आढळते. चंद्र-रोहिणी जोडपे सर्वमान्य असून या उभयतांचे पौराणिक साहित्यामधून भरपूर कौतुक केले आहे. एवढेच नव्हे तर, नंतर या जोडप्यास बुध हा पुत्र झाला, असाही उल्लेख आढळतो.

हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा

मृग : सर्वसाधारणपणे आकाशदर्शन करणाऱ्या प्रत्येकानेच हे नक्षत्र पाहिलेले असते. ‘मृग’ म्हणजे हरीण… या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन आणि मागे दोन तारका त्याचे पुढील तसेच मागील पाय असल्याचे तर, पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शीर (डोके) असल्याचे सुचवितो. या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारका अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की, त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित या नक्षत्राचे नाव ‘मृगशीर्ष’ असे पडले असावे.

रामायणातल्या सुवर्णमृगाच्या कथेप्रमाणेच, आपल्या पौराणिक साहित्यामध्ये या मृगा विषयी एक कथा आढळते. एकदा प्रजापती आपलीच कन्या रोहिणीच्या सौंदर्यावर भाळला. त्याच्या या अनुचित वर्तनाने सर्वच त्याच्यावर रागावले आणि रुद्र संतापाने प्रजापतीवर धावून गेला. तेव्हा रुद्रास घाबरून प्रजापतीने मृगाचे रूप घेतले आणि तो उंच आकाशात पळाला. मग रुद्राने देखील व्याधाचे (शिकारी) रूप धारण केले आणि मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलून उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला.

या कथेचा संदर्भ जर प्रत्यक्ष आपणास पाहावयाचा झाल्यास उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास आपणास आढळेल की, या मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असते आणि त्याच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली आपणास एक तेजस्वी तारा आढळेल. तोच व्याध तारा.

हेही वाचा – नक्षत्रांच्या पुराणकथा

आद्रा : आकाशदर्शनाची सवय नसलेल्या व्यक्तीला हे नक्षत्र सहजपणे शोधता येणार नाही. पटकन पाहताना हे नक्षत्र ओळखता येत नाही. त्याचे कारण, त्याच्या आसपास इतर अनेक नक्षत्रांची असलेली गर्दी… म्हणूनच हे नक्षत्र सहज सापडत नाही. परंतु ते शोधणे तितकेसे कठीण देखील नाही. मृग नक्षत्राच्या अगदी थोडेसे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास फिकट ताऱ्यांची एक रेषा दिसेल. हे तारे फिकट असले तरी, त्याच्यामध्ये एक तेजस्वी तारका आपणास आढळेल, तिच आर्द्रा.

आर्द्रा या नावाचा अर्थ ओलावा. आज ज्याप्रमाणे मृग नक्षत्र सुरू झाल्यावर (सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश) पावसाळा सुरू होतो. तसेच, सुमारे तेराशे वर्षांपूर्वी हे भाग्य आर्द्रा नक्षत्राच्या वाट्याला होते. म्हणजे, सूर्याने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला की, पावसाळा सुरू होई आणि सर्वत्र पाणी म्हणजे ओलावा आढळे. म्हणूनच या नक्षत्राचे नाव आर्द्रा असे पडले असावे. काही ठिकाणी आदिवासी या आर्द्रेस ‘आडदरा’ असे म्हणतात. कारण, उन्हाळ्यात उघडे पडलेले डोंगर आणि दऱ्या या आर्द्रेच्या पावसामुळे हिरव्यागार वनश्रीने झाकले जातात. हिरव्या पालवीने ते नजरेआड होतात म्हणून त्यास ‘आडदरा’ असे म्हटले जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!