Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकसंपत्ती.... शैक्षणिक संस्थेची

संपत्ती…. शैक्षणिक संस्थेची

अर्चना कुलकर्णी

आमचं जळगाव…!

खानदेशातील एक टुमदार शहर..! आमच्या लहानपणापासून, नव्हे त्याही पूर्वीपासून जळगावचे शैक्षणिक वातावरण खूपच समृद्ध होते. अनेक खासगी शाळा, नगरपालिकेच्या शाळा मोठ्या स्वच्छ व सुंदरही होत्या. सर्व शाळांचे स्वतःचे विस्तीर्ण क्रीडांगण होते.

माझी शाळा, भगीरथ इंग्लिश स्कूल. आर्थिक दृष्टीने विचार केला तर माझी शाळा खूपच गरीब होती. भाड्याच्या टुमदार इमारतीत तळमजल्यावर मुख्याध्यापकांचे कार्यालय, शिक्षकखोली, सहा वर्गखोल्या तर पहिल्या मजल्यावर दहा-बारा वर्गखोल्या होत्या. पहिल्या मजल्यावरच्या इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या बाल्कनीला ठिकठिकाणी लाकडाच्या ओंडक्यांचे टेकू लावले होते, जे शाळेचे (खानदेश एज्युकेशन सोसायटीची) आर्थिक परिस्थिती पोटतिडिकीने कथन करीत होते.

आमच्या शाळेची आर्थिक परिस्थिती जरी नाजूक होती तरी, खूप चांगले मुख्याध्यापक, त्यांची शिस्त. उत्कृष्ट काम करण्याची तळमळ असणारे शिक्षक. त्यामुळे शिक्षण व संस्कार याबाबत मात्र आमची शाळा समृद्ध होती. शाळेला स्वतःचे वाचनालय नव्हते परंतु, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावण्याचे कसब भाषेच्या शिक्षकांकडे होते. स्वतःचे क्रीडांगण शाळेकडे नव्हते तरीही दुसऱ्यांच्या क्रीडांगणावर शिकवत कबड्डी व खोखोचे बलाढ्य संघ तयार करायची यशस्वी मेहनत क्रीडा शिक्षक घ्यायचे. शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील छोटीशी मोकळी जागा म्हणजे आमचे थिएटर. त्यातील सिमेंट काँक्रिटचा ओटा म्हणजे आमची रंगभूमी तरीही वक्तृत्व, गायन, नृत्य या कला विद्यार्थ्यांमध्ये जोपासण्याचे काम शिक्षकांनी नेटाने केले. आमच्या शाळेतील सर्वच शिक्षक खूप चांगले होते, ‌प्रत्येक शिक्षक आदर्श म्हणता येईल इतके चांगले होते. त्यातील उदाहरणादाखल एक इथे व्यक्त करते.

मराठी शिकवणारे जे. पी. कुलकर्णी सर. सरांची राहणी साधी, पण स्वच्छ आणि नीटनेटकी होती. त्यांचे व्यक्तिमत्व तितके प्रसन्न होते की, ते वर्गात आल्यावर अल्हाददायक वातावरण निर्माण व्हायचे. धडा अथवा कविता शिकवताना सर नेहमी संबंधित लेखक कवी यांच्या बद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल भरभरून बोलायचे. त्यांचा तास कधी संपूच नाही, असे वाटायचे. मराठी पुस्तक वाचनाची आवड सरांनी त्यांच्या शिकवण्यातून अतिशय हळुवारपणे आमच्या मनात रुजवली. मराठीचा त्यांचा गाढा अभ्यास, त्यांचे उच्चार सर्वच अप्रतिम होते. मला तर नेहमी वाटतं, त्या काळात आजच्यासारखी व्हिडीओ क्लिप सहज काढण्याची साधने असती तर, जे. पी. कुलकर्णी सरांची राहणी, देहबोली, व्यक्तिमत्व, मराठीचे उच्चार शिवाय विषय शिकवण्याची हातोटी याची व्हिडीओ क्लिप आम्ही नक्कीच काढली असती. ती व्हिडीओ क्लिप आजच्या शिक्षकांसाठी कसे रहावे, कसे बोलावे, कसे शिकवावे, याबाबत ‘मास्टर क्लिप’ झाली असती, हे नक्की.

आमचे गणिताचे शिक्षक, कै क. वा. देसाई सर..! त्यांची गणित शिकवण्याची पद्धत खूपच सरस होती. त्यांनी कधी फळा भरून गणिते लिहिली नाहीत. गणिताची प्रत्येक पायरी आम्हाला समजावी, यासाठी प्रश्न विचारून, पर्याय सांगून, एखादी हिंट देऊन ते आम्हाला विचार करायला लावायचे. ते बोलत असताना कुणी वहीत काही लिहायला लागले तर, खडूचा छोटा तुकडा त्याला किंवा तिला मारून ते म्हणायचे,

“आधी खोपडीत उतरवा, मग चोपडीत लिहा.”

माझ्यासारख्या नेहमी गणितात नापास होणाऱ्या मुलीला त्यांनी गणिताची गोडी लावली.

माझे वडील, कै. आर्. वाय. कुलकर्णी सर. विद्यार्थी, शाळा, शिक्षण याबाबतची त्यांची तळमळ, काम करणे मी खूप जवळून पाहिली आहे. आपल्याला पगार किती मिळतो तसेच आपण काम किती आणि किती वेळ करतो, याचा हिशोब त्यांनी कधीच केला नाही.

थोडक्यात काय तर खूप चांगले शिक्षक, त्यांचे उत्कृष्ट कार्य हीच शिक्षण संस्थेची खरी संपत्ती असते, हे आमच्या शाळेने सिद्ध केले असे मला वाटते.

(‘मुख्याध्यापकाच्या खुर्चीतून’ या प्रकाशित पुस्तकातील लेखावर आधारित)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!