Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeललितमाझं ओपन सीक्रेट!

माझं ओपन सीक्रेट!

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते

पुन्हा तुमच्या भेटीला…

साय… साय म्हटलं की, आठवतं दुधावरच्या पातेल्यातलं दूधावरचं घट्टसर आच्छादन… मऊ लुसलुशीत आणि वेगळीच दुधाळ चव असलेली ती साय…

खरंतर, आजी-आजोबा त्यांच्या नातवंडांसाठी म्हटला जाणारा हा प्रेमळ लाघवी शब्द! नातवंड म्हणजे दुधावरची साय. म्हणून असेल कदाचित, दुधापेक्षा सायीचं अप्रूप किंवा कौतुक जास्त असते.

माझ्या लहानपणी एक प्रघात होता. बहुतेक सगळ्या घरांमध्ये असायचा तो प्रघात किंवा ती पद्धत. सकाळी दूध आलं की, ते मंद आचेवर तापवायचं. म्हणजे त्याला जास्त दाट साय येते. दिवसभर सगळ्यांना प्यायला किंवा चहात वापरून उरलेलं दूध रात्री छोट्या पातेल्यात ते ओतून मोठं पातेलं घासायला घ्यायचं. पण ते घासण्याआधी त्या पातेल्यात शिल्लक राहिलेली साय आम्हा मुलांना खायला मिळायची. अगदी आम्हा तिघा भावंडांना वार लावून दिले होते. कोणत्या दिवशी कोणी दूधाचं पातेलं चाटून त्यातली साय खायची…!

हे झालं बालपणातलं कौतुक. तरीही मला साय-साखर हा पदार्थ तसाही प्राणप्रियच आहे. माझी आजी म्हणजे मामाची मोठी आई. (आम्ही आई आणि वडिलांची आई या दोघींना मोठी आईच म्हणत असत.) मामाची मोठी आई आणि अप्पांची (वडील) मोठी आई. तर, आईची म्हणजे मामाची मोठी आई मला थोडं झुकतं माप द्यायची. मी तिची पहिली नात होती ना! साय-साखर खायची सवय तिने आणि मोठ्या मामीने लावली. यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं… Age no baar! इच्छा झाली की साय-साखर खायची. जगातली सगळी सुखं त्या एका वाटीत गोळा झालेली असतात.

एक वाईट सवय मला आहे. त्यावरून घरातले सगळे हसतात मला. पुस्तक वाचताना किंवा टीव्ही, सिनेमा बघताना… इमोशनल सीन वाचून किंवा बघून मला रडू आवरत नाही. एकदा टीव्ही सीरियल बघताना मी रडत होते. माझा मुलगा अद्वैत 5-6 वर्षांचा असेल, त्यालाही माझं साय-साखरेचं वेड माहीत होतं. माझं माझं सुरू होतं… डोळे गाळणं… हुंदके देणं… डोळे पुसणं… तेवढ्यात या पठ्ठ्याने किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून साय काढली, त्यात साखर घालून ती वाटी आणि चमचा हळूच माझ्यासमोर आणलं… मला अजून रडू आलं. त्याला कळेच ना! मग मात्र मी ती साय-साखरेची वाटी गट्टम केली.

एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये एका मुलीने मला विचारलं की, तुम्ही आयुष्यात कधी चोरी केलीय का?

मी कसलाही विचार न करता ‘हो’ म्हटलं. ‘केलीय चोरी आणि अजूनही करते!’ असं मी सांगताच मोठा हास्यस्फोट झाला.

खरंय ना, चोरी तीसुद्धा साय-साखरेची करते. आता या वयात चोरूनच खावी लागते. कारण शरीराला व्याधी लागलीय… डायबिटीस! साखर आणि साय दोन्ही गोष्टी वर्ज्य!! तरीही तब्येत सांभाळून मी साय चोरून खातेच. पण आता हे सिक्रेट ओपन झालंय.

जगातला भारी पदार्थ कोणता असेल तर, तो साय-साखर!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!