नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
माझ्या आयुष्यातली हीरोइन म्हणजे माझी मोठी आई. म्हणजे आप्पांची (बाबा) आई. तशा मला दोन मोठी आई. एक आप्पांची आई आणि एक मामाची, म्हणजे आईची आई. आजची उत्सवमूर्ती आहे, आप्पांची मोठी आई, म्हणजे इंदिराबाई वसंतराव नाईक. तिच्याबद्दल नाईकांची ‘इंदिरा गांधी’ असे बरेच जण बोलायचे. आप्पाई असे माझा मुलगा तिला म्हणायचा.
काळा नाही, पण गडद सावळा रंग. खूप देखणा चेहरा. अतिशय हुशार (फक्त प्राथमिक शिक्षण; लिहता-वाचता येईल एवढंच). रोज वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, हा दंडक. राजकारणावर अगदी हिरीरीने बोलायची. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रभात फेरीमध्ये देशभक्तीपर गाणी गात फिरायची. न शिकता उत्तम हार्मोनियम वाजवायची… सकाळी उठल्यावर सर्वप्रथम चहा, मग आंघोळ, पूजा आवरून गिरगावात सगळ्या देवळांना भेट देऊन घरी. अगदी पार माधव बागेत फेरफटका असायचा. तोपर्यंत तोंडांत पाण्याचा थेंब नाही घ्यायची. देवांची भेट घेऊन घरी आली की, आधी चहा पाव खाऊन मग पाणी प्यायची. माझ्या मुलीच्या जन्मापर्यंत तिचा हाच परिपाठ होता.
हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली…
शिस्तप्रिय होतीच ती, पण एक भारी गुण होता तिच्यात… मी भारी हूड होते. मस्ती, मारामारी करण्यात एक्सपर्टच होते. जर का कोणी माझी तक्रार घेऊन घरी आलच तर, ती काही त्यांना सोडायची नाही. त्या मुलांच्या आईलाच रडवेली करून पाठवायची. कशावरून माझ्या नातीने त्रास दिला? तुझा मुलगा काय कमीचा आहे का? असे म्हणून समोरच्या पार्टीला पळवून लावायची. पण, ती मूर्ख नव्हती. तिला तिची नात कशी आहे, ते चांगलंच माहीत होतं. या सगळ्या प्रकरणानंतर ती माझ्याशी कट्टी घ्यायची. पूर्ण अबोला…!
बरं, तिला एक सवय होती. दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर ती केळी खायची आणि घरातल्या सगळ्यांना ती प्रसाद दिल्यासारखा तुकडा हातावर ठेवायची. आता हा सुद्धा आमचा रोजचा परिपाठ. पण जेव्हा ती अबोला धरायची तेव्हा केळ्यांचा तुकडा मला मिळायचा नाही. ती माझी शिक्षा असायची.
हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना!
एकदा मोठी आई चार दिवस आत्याकडे राहायला गेली होती, तेव्हा खेळताना काहीतरी कुरबुर झाली. एक मुलगा त्याच्या आईला घेऊन आला. झालं तेव्हा आई पुढे आली आणि कसलाही विचार न करता मला मस्त धोपटलं. तेव्हापासून कानाला खडा लावला. मोठी आई नसताना वाडीत मस्ती करायची नाही. जबरदस्त मार मिळतो!
वय वाढत गेलं… जग बदललं नाही, पण विस्तारलं. काही गोष्टी मागे पडल्या. एक गोष्ट नेमाने केली, मुलांचा बाहेरच्या माणसासमोर अपमान करायचा नाही, पण न मारता शिक्षा मात्र करायची. मोठी आजीकडून ही एक महत्त्वाची गोष्ट शिकले. आज मोठी आई नाही… पण तिने सांगितलेल्या काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी अजूनही पाळते.


