त्याची मनापासून इच्छा होती, आईच्या शेवटच्या प्रवासात सगळं स्वतःच्या हातांनी करावं… अगदी उरलेले क्षण तिच्या पायाशी बसून घालवावे… तिच्या मस्तकावर शेवटचा हात फिरवावा… पण घरच्यांनी त्याला थांबवलं.
“तू कुठे होतास तिच्या शेवटच्या क्षणी? दूर देशात, नोकरीच्या मागे धावत होतास!”
“तुला काय हक्क आहे, आता तिच्या शेवटचं करत बसण्याचा?”
“सगळी सेवा आम्हीच केली… रात्र रात्र जागून तिची काळजी घेतली आम्ही.”
“आता प्रेम दाखवायचं? उशीर झाला रे!”
तो शांत होता… पण आतून मोडला होता. त्याला ओरडून सांगावंसं वाटत होतं –
“तुम्ही तिची सेवा केली, शारीरिक… मी तिला आठवणीत ठेवत गेलो, दर क्षणाला… तुम्ही तिचं औषध वेळेवर दिलं, मी तिचं नाव दिवसातून दहा वेळा घेतलं… तुम्ही तिच्या डोळ्यांतलं पाणी पुसलं असेल, पण माझ्या डोळ्यांत ते कायम होतं…”
हो, मी दूर होता. पण आई माझ्या अगदी जवळ होती – मनात, आठवणीत, प्रत्येक श्वासात. आईला माहीत होतं… तिचं पोरगं कुठेही असलं, ती त्याच्या मनाच्या उंबरठ्यावर राहतेय.
“तुम्ही प्रेम केलं… हो, तिची सेवा करून दाखवली. पण मी? मी प्रेम जगलो… तिच्या आठवणींमध्ये, तिच्या पत्रांमध्ये, तिच्या शब्दांच्या स्पंदनात… शेवटी मी तिचा मुलगा होतो… शेवटीही, शेवटच्या श्वासापर्यंत!
तुमच्या हातात होती तिची सेवा, पण माझ्या अंतर्मनात होतं तिचं अस्तित्व. तुमची सेवा बोलली… माझं प्रेम गप्प बसलं. तुमची सेवा शब्दांत मांडता आली, पण माझं प्रेम मला सिद्ध करता आलंच नाही! माझं प्रेम मोजता आलं असतं, तर कदाचित सिद्ध झालं असतं. सेवा ‘दिसली’, म्हणून स्वीकारली गेली; प्रेम ‘जाणवलं’ नाही, म्हणून दुर्लक्षित झालं. हाच तो हिशोब मला मांडता नाही आला…”
हेही वाचा – बिघाड
आईचं प्रेम – हिशोबाच्या वहीत मावणं शक्यच नाही…
आईचं प्रेम म्हणजे उधारी नाही, ती तर कायमची ठेव आहे…
ती रक्कम नाही, की जी वेळोवेळी तपासून बघावी लागते…
जे हिशोब ठेवून जगतात, त्यांचं प्रेम कधीच ‘पूर्ण’ होत नाही!
“हे नातं नाळेच होतं… ते कधीच तुटत नाही! नाळेचं प्रेम कधीच मोजता येणार नाही. ती जशी तुमची आई होती, तशी ती माझी पण आई होती… असताना आणि नसताना, ती नेहमीच आई राहणार आहे! शेवटच्या क्षणी मी तिच्या पायाशी नव्हतो, पण आजही माझं मन तिच्या चरणांशीच लोटलेलं आहे. कारण ती आई होती… न सांगता समजून घेणारी, जवळ नसूनही जवळ असणारी! आई आणि मुलाचं नातं हे जगावेगळं असतं, एक न संपणारा धागा, जो जन्मभर जोडलेला राहतो…”
हेही वाचा – थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…
“मला आयुष्यभर हीच खंत राहील, तिचा शेवट माझ्याजवळ व्हायला हवा होता, पण तो अधिकारही नाकारला गेला. शेवटच्या क्षणी तिच्या पायाशी बसणं, तिच्या डोळ्यांत डोळे मिळवणं, तिच्या हातात माझा हात ठेवणं — काहीच शक्य झालं नाही. फक्त इतकंच राहिलं की, ती गेली… आणि माझ्या आत काहीतरी तुटून गेलं. माझं प्रेम होतं, जबाबदारी नव्हे… पण प्रेमावरही हक्क सिद्ध करावा लागतो, असं कळायला खूप उशीर झाला.
तू गेलीस, पण माझ्या जीवनात तुझ्या असण्याचं माप निश्चितच अजूनही आहे, शेवट कधीच नसतो! ते प्रेम हवं तेवढं असतं… फक्त कधीच सिद्ध होत नाही.”


