Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeअवांतर...अन् अडलेलं लग्न लागलं

…अन् अडलेलं लग्न लागलं

सुप्रिया महाबळ

अडचणीच्या वेळी कोण कधी धावून येईल, हे सांगता येत नाही. कधी कधी ओळख नसतानाही अचानक कोणाचा तरी मदतीचा हात पुढे येतो. काहीवेळेस अल्पशा ओळखीवरही समोरची व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. जणूकाही त्यासाठीच ती नवी ओळख निर्माण झाली असावी! प्रत्येकवेळी आपल्यालाच कोणी भेटलं पाहिजे, असं नाही. या भूमिकेत अदलाबदल होऊ शकतो. कधीतरी अडचणीच्या प्रसंगी आपणही दुसऱ्यांचा आधार बनू शकतो.

एकदा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दक्षिण भारताच्या सहलीला गेलो होतो. आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे, प्रवास घडताना वेगवेगळे अनुभव गाठीशी येतातच, शिवाय, त्यातून आपल्याला शहाणपण येतं. आमच्या या सहलीतही एक मजेशीर, आगळावेगळा अनुभव आला.

दक्षिण भारताची सहल आटोपून परतीच्या प्रवासात होतो. मराठवाड्यातील उमरगा नामक गावात मोटार चालकाने रात्रीच्या पहिल्या प्रहरी जेवणाकरिता गाडी थांबवली. आम्ही भावंडे आणि वडिलांनी गरम पराठे- बटाटा भाजी असे सहभोजन केले. आईला मात्र तो मेन्यू न आवडल्याने तिने फक्त दूध घेतले आणि ती सहज आजूबाजूला फेरफटका मारायला गेली होती. हॉटेलशेजारच्या एका छोट्याशा झोपडीत कसली तरी गडबड सुरू होती अन् लग्नासाठी वऱ्हाडी सज्ज झाले होते. तो दिवस कार्तिक शुद्ध द्वादशीचा होता… आणि तयारी होती, बाळकृष्ण आणि तुळशीच्या लग्नाची!

हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट

असा उत्सवाचा दिवस असतानाही वधूपिता चिंतित होता. लग्नाची तयारी झाली होती, पण ब्राह्मणच नव्हता. आता ब्राह्मण कसा शोधायचा? याची त्याला चिंता होती. माझ्या आईला पाहताच, त्याच्या आशा पल्लवित झाल्या. आईच्या चेहऱ्यावरून त्याने ओळखले की, ही ब्राह्मण स्त्री दिसते. म्हणूनच, आईला विनंती करण्याचा विचार त्याच्या मनात आला असावा. त्यानुसार, त्याने आईला चार मंत्र म्हणण्याची विनंती केली.

क्षणभर आईला हसू फुटले आणि ती वडिलांना विचारायला आली. वडिलांनीही शुभकार्याबद्दल मागचा-पुढचा विचार न करता ताबडतोब संमती दिली. मग आईने पुढाकार घेतला. श्री गजाननास आवाहन करून सोहळ्यास पाचारण केले. गंध-अक्षता, फुले वाहून आणि यथाविधी मंगलाष्टके म्हणून वधू- वरांचे लग्न लावले. अतिशय उत्साहात लग्नसोहळा पार पडला आणि कुंकुमार्चित अक्षता टाकताना यजमान दाम्पत्याला गहिवरून आले.

हेही वाचा – अशा प्रकारे कोर्टात जायची ‘घडी’ आली!

पोह्यांचा प्रसाद घेऊन आम्ही सर्व गाडीकडे परतलो. तिथे ते दाम्पत्यही होते. त्यांचे मन भरून आले… त्यांनी कृतज्ञतेने वडिलांचे पाय धरले आणि त्या सश्रद्ध ग्रामस्थांना पाहून आम्ही सर्वच जण गहिवरलो. आज एवढा काळ लोटला तरी, त्या दाम्पत्याचे चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे भाव अजूनही विसरता येत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!