Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeललित…आणि 18 वर्षांची प्रतीक्षा संपली

…आणि 18 वर्षांची प्रतीक्षा संपली

मंदार अनंत पाटील

साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? व्हिसा तयार झाल्यावर आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश बापट आणि मिसेस अश्विनी बापट यांची लंडन ट्रिप ठरली आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला. कारण, आई अगदी घरच्या लोकांबरोबर अगदी डोअर टू डोअर येणार होती. मग क्षणाचाही विलंब न करता तिचे विमानाचे तिकीट बुक केले. आई येणार म्हणून घराची रंगरंगोटी करून घेतली आणि आईला आम्ही कामावर गेल्यावर कंटाळा येऊ नये म्हणून पुस्तक आणि मराठी चॅनलही लावून घेतली.


दोन्ही बाजूची तयारी अंतिम टप्प्यावर आली होती. भाऊ मनोजने आईकरिता नवीन अँड्रॉइड फोनच घेऊन दिला आणि माणिक ताईने तिला Whatsapp वर मेसेज कसा करायचा तेही शिकवले होते. मी आणि पल्लवीने सुचवून बघितले की, सलवार-कमीज घालायची प्रॅक्टिस कर म्हणजे इथे सोपे जाईल; पण त्याबाबतीत तिची फारशी तयारी नाही दिसली. पण मी थर्मल-वेअर घालून बघितले आहे ( मुंबईच्या हवामानात!) आणि मला जमले आहे, असे निक्षुन सांगितले गेले. थोडक्यात मी लंडनच्या तापमानाला सामोरे जायला तयार आहे, असाच संकेत होता. या सगळ्या धामधूमीत ती, मनोज, संदीप, वृंदा माई आणि माणिक ताई आणखी एका दिव्यातून जात होते… ते म्हणजे, घर बदलणे! कारण आमची 55 वर्षं जुनी वास्तू अरुण कमल आता नवीन रूप धारण करणार होती आणि पावसाळयाअगोदर तात्पुरती निवासाची जागा अगदी पार्ल्यामध्येच मिळाली होती. पण या तीन-चार खमक्या शिलेदारांनी अगदी ते काम पण बिनबोभाट पार पाडले आणि मग आई, मनोज आणि वृंदा माई परत लंडन ट्रीपच्या मिशनवर लक्ष केंद्रीत करू लागले. इकडे आमच्याकडून सर्वकाही तयारच आहे… आता आतुरता आहे आगमनाची!

18 जुले 2024…. अखेर तो दिवस उजाडलाच… 18 वर्षांची प्रतीक्षा आज संपणार होती. पण कालच एअरलाइन्सकडून ई-मेल आला की, खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण एक तासाने लांबणीवर पडणार होते. लगेच मनोज आणि प्रकाश बापटला कल्पना दिली की, सकाळी फार लवकर एअरपोर्टवर जाऊ नका. पण बापट कुटुंब पुण्याहून येणार होते. त्यामुळे ते सकाळी सात वाजताच हजर झाले. इकडे आई, वृंदा आणि मनोज हेपण वेळेतच पोहोचले. चेक इन, इमिग्रेशन व्यवस्थित पार पाडले आणि विमानात सीटवर स्थानापन्न झाल्याचा मेसेज प्रकाशने केला होता, जो मला यूके वेळेनुसार मिळाला. मीसुद्धा एअरलाइन्सच्या वेबसाइटवर रेग्युलर अपडेट घेतच होतो. आणि नजर सारखी घड्याळावरच होती. कामात लक्ष लागणं शक्यच नव्हते.. साधारणपणे 4 वाजता एअरपोर्टला जायचे ठरविले होते, पण आधीच निघालो.

हिथरो एअरपोर्टला पोहोचलो आणि विमान लँड झाले असे समजले. साधारणत: इमिग्रेशन आणि बाकी प्रोसेसला एक-दीड तास लागायची शक्यता होती, म्हणून तिथेच बाहेर बसकण मारली. आता लक्ष फक्त दरवाजाकडेच होते. तेथे बरेच लोक त्यांच्या नातेवाईंकांना उत्साहाने वेलकम करत होते. काहीजण हार-तुरे घेऊन तर काहींचा बांध फुटत होता… मी भावूक होत होतो, माझेपण मन उचंबळून येत होतं… डोळे अधीरपणे दरवाजाकडे लागून राहिले होते.

…आणि शांत पावलं टाकीत, अगदी विलेपार्ले मार्केटमध्ये फेरफटका मारून घरी परत येत असल्याच्या अविर्भावात आई आली! मी आपले जॅकेट आणि गरम कपड्याची कानटोपी घेऊन आलो होतो. कदाचित थंडी वाजेल! तिच्या चेहऱ्यावर तेच हसू… मी पाया पडल्यावर नेहेमीप्रमाणे हात जोडून आशीर्वाद दिला, म्हणाली – प्रवासात काहीच त्रास नाही झाला. थंडी तर अजिबातच वाटत नाही.

बापट कुटुंबीयांचे आभार मानून लगेचच आम्ही पार्किंगकडे निघालो. कारण आईकरिता घरी जायला मर्सिडीझ बेंझ गाडी अरेंज केली होती… वाटेत सगळ्या नातेवाईंकांना आई सुखरुप पोहोचली, असा मेसेज आणि फोटो पाठविला. वेगातच गाडी घराकडे नेली. आईला वेलकम करायला आणि आल्यावर गरम गरम जेवण वाढायला पल्लवी वाट बघत होती. आम्ही अर्ध्या तासातच घरी आलो.

पहिले काही क्षण तर आई खरंच आली आहे, यावर विश्वासच बसत नव्हता. पण हळूहळू ती पण रिलॅक्स झाली. थोडंसं जेऊन आणि प्रवासाचा शीण आला होता म्हणून पॅरॅसिटमोची गोळी घेऊन ती लवकरच झोपून गेली…

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!