- मानसी देशपांडे
“कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान…” हे मंगलाष्टकाचे सूर म्हणजे वधूसाठी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, अशा स्वरूपाचे असतात. कारण, अंतरपाट सरला की गळ्यात माळ पडल्यावर अचानक एक नवीन जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटते. प्रसिद्ध लेखक व. पु. काळेंनी किती छान म्हटलं आहे, “संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चुल पेटवायची थांबवायचं नसतं. दरी निर्माण झाली म्हणजे आपण खोल जायचं नसतं, तर ती दरी पार करायची असते…” हीच शिकवण प्रत्येक आई मुलीला देतेच. आज अचानक माझ्या मनात एक विचार आला, लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना तिथे मुलीची आई उपस्थित नसते. का बरं? बहुदा, सनईच्या सुरांनी हृदय गलबलते. ती मंगलाष्टकं आता काहीच क्षणांवर मुलीची पाठवणी येऊन ठेपली आहे, असं जणू सुचवत असतील. शिवाय सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी प्रार्थना ती माऊली परमेश्वराजवळ करतच असते…
मुलीचं लग्न म्हणजे आई-वडिलांसाठी एक सुखद सोहळाच असतो, नाही का! मुलगी सुद्धा आनंदात असतेच, पण जेव्हा ती बोहल्यावर चढते त्यावेळी मात्र हृदयातली धडधड तिलाच कळू जाणे. यावर गाण्याची ओळ अगदी साजेशी अशी आहे,
“लग्नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी…”
‘सनई’ हे तसं म्हटलं तर, एक शुभप्रसंगी वाजवले जाणारे वाद्य. पण या वाद्यातील सुरांचा आणि मुलीच्या तसेच जास्त करून तिच्या वडिलांच्या मनातील भावना यांचा खूप जवळचा संबंध व. पुं.नी दाखवला आहे, “लग्न सोहळ्यात मुलीच्या बापाची भूमिका सनई बजावीत असते. मांगल्याच्या बरोबरीने ते सूर करुण का वाटतात? तर मुलीच्या बापाला मुलीच्या विरहाचं दुःख प्रकट करता येत नाही. त्याच्या डोळ्यातलं पाणी सनईच्या रुपानं वाहत असतं…” ही वेळ खरंच संमिश्र भावनांनी ओतप्रोत भरलेली असते. आई रडून मोकळी होते, पण वडील जास्त रडू शकत नाहीत. कारण, वडिलांच्या मनात तेव्हा,
“घेऊ कसा निरोप तुटतात आर्त धागे,
हा देह दूर जाता मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे…”
हेच सुरू असते. सनईचे सूर असो, आई-वडिलांच्या मनातील भावना असो, व. पुं.नी मांडलेल्या विचारच पुरेसे ठरतात. जे जे विचार व. पुं.नी व्यक्त केले आहेत ते सर्व प्रत्येक आई-वडील अनुभवत असतात. म्हणून तर हा सोहळा प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहतो… थोडक्यात व.पु. म्हणजे काय तर, या ओळी,
“पार्टनर रुपी सखी, दोस्त तो रंग मनाचे अचूक हेरतो
प्रेममयी स्वर शब्दांनी छेडून, अवघे जगणे महोत्सव करतो…”