जयवंत देसाईंची गाडी ‘हसमुखराय अँड कंपनी’ समोर थांबली. साठ वर्षांचे देसाई खाली उतरले आणि पेढीच्या पायऱ्या चढले. त्यानी पाहिले शेठजी आपल्या खुर्चीवर नव्हते. शेठजीच्या बाजूच्या खुर्चीवर हरीभाऊ बसत. हरीभाऊ हे शेटजींचे दिवाणजी… व्यवहारावर लक्ष ठेवणारे! हरीभाऊ आतबाहेर करत होते… पेढीतील नोकरांवर ओरडत होते… हातातील ऑर्डर्स पुऱ्या करत होते… हमाल धान्याची पोती उचलत होते… बाहेर नेऊन ढकलगाडीवर ठेवत होते. विजय कॅशिअर पैसे, चेक घेत होता, बिल फाडून देत होता.. नेहेमीचे पेढीवरचे दृश्य होते हे!
देसाईच्या समोर हरीभाऊ येताच देसाई म्हणाले, “शेटजी दिसत नाहीत आज?”
“त्त्यांचा मुलगा यायचा आहे आज पॅरिसहून… त्याला आणायला विमानतळावर गेलेत… काय ऑर्डर आहे तुमची?”
“शनिवारी तुम्ही माल पाठवलात… त्यात दोन पोती साबुदाणा दुसऱ्याच ब्रँडचा पाठविलात… मी नेहेमी अकबरचा साबुदाणा मागवतो… आमचे कस्टमर तोच मागतात.”
“त्यावेळी अकबर साबुदाणा नव्हता, म्हणून दुसरा…”
“पण आमच्या गोरेगावात दुसरा ब्रँड चालत नाही… म्हणून ती दोन पोती मी परत आणलीत, तेवढी उतरून घ्या…”
“एकदा पाठवलेला माल परत घ्यायचा नाही, असे शेटजीनी सांगितलंय…”
“’अरे, असं कसं? मला अकबरचाच साबुदाणा हवाय…”
“तुम्ही परत आणलेला माल मी घेऊ शकत नाही.”
“ठीक आहे… मी शेटजींना फोन करतो…”
“शेटजी आपला फोन घरी विसरून गेलेत…”
देसाईंनी सहजच गोडाऊनमध्ये डोकावलं… त्याना अकबर साबुदाण्याचा भरपूर स्टॉक दिसला!
“ठीक आहे… मी चालतो…”
जाता जाता कॅशियर विजयला देसाई म्हणाले, “शेटजींना सांग, गोरेगावचे देसाई येऊन गेले.”
विजयने मान हलवली. देसाईंना राग आला… या पेढीसोबत गेली तीस वर्षे व्यवहार आहे. स्टँडर्ड माल आणि वाजवी दर हे यांचे वैशिष्ट्य अन् आपला व्यवहार चोख! कधी उधारी नाही. माल पोहोचला की पैसे बँकेत भरायचे… असे असून आपल्याला हे उत्तर? ठीक आहे… कदाचित शेटजींकडे खूप पैसे जमा झाले असतील, त्यांना गिऱ्हाईकांची पर्वा नाही…
देसाईंनी गाडी वळवली आणि त्याच धानबाजारात मुकेशच्या पेढीसमोर लावली… मुकेशशेठ आश्चर्यचकित झाला… गोरेगावचे देसाई आपल्या पेढीवर? आपण कितीवेळा या कस्टमरला आपल्या पेढीवर ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्त्यांचे खाते हसमुखकडे!
“आवो, आवो, देसाईशेठ… आज कैसा आना हुआ?”
“तुम्हारे पास अकबर साबुदाना है क्या?”
“है ना… कितना चाहिए?”
“दो पोती… मगर मेरे पास दुसरे ब्रँड के दो पोती साबुदाना हैं… वह लेने का और मुझे अकबर के दो पोती देने का.. रेट डि्फरन्स मैं देता हूं…”
मुकेशच्या मनात आलं, “ही दोन पोती मी कुणालाही देऊ शकेन… पण गोरेगावचं देसाई स्टोअर्स म्हणजे मोठी पार्टी. एकदा आपल्याकडे आली म्हणजे आली…”
“हां… हां शेटजी, कोई बात नहीं…”
मुकेशने नोकराला सांगून देसाईच्या गाडीतील दोन पोती साबुदाणा घेतला आणि त्यांच्या गाडीत दोन पोती अकबर साबुदाणा ठेवला…
“देसाई भाऊ… आनी काय पाठवू?”
देसाईंनी हसमुखची ऑर्डर मुकेशकडे दिली… बिल मिळताच त्या रकमेचा चेक लिहून दिला.
मुकेशने देसाईसाठी पीयुष मागवलं. मोठी डायरी भेट दिली… देसाई निघाले तेव्हा मुकेशशेठ त्यांना गाडीपर्यंत सोडायला आले…
“चलो शेटजी… कुछ ऑर्डर हो तो फोन करो… चेक आराम से दो, कोई जल्दी नहीं…”
हसून देसाईंनी मान हलवली आणि गाडी सुरू केली.
दुपारनंतर शेटजी पेढीवर आले… त्यांनी रोजच्या ऑर्डर्स चेक केल्या. कुणाला माल पाठवायचा राहिलाय हे पाहिले… गोडाऊनमध्ये आज कुठून माल आला ते पाहिले. कुणाचे पेमेंट आले… चेक आले.. पेमेंट करायचे राहिले, हे पाहिले. मग त्यांनी हरीभाऊंना हाक मारली.
हेही वाचा – निपाणीच्या उरुसात हरवलेली गंगी…
“हरिभाऊ… कौनसी चीज मंगानी हैं?”
“स्टार चावल और गेहूं… खडीसाखर… धनिया…”
“ठीक… आज के चेक गये बॅंक में?”
एवढ्यात कॅशिअर विजय म्हणाला, “’गोरेगावचे देसाई आले होते…”
‘हां हां… बराबर… आज सोमवार. देसाई सोमवार को आते हैं… मगर उनका ऑर्डर नहीं आज?”
विजय म्हणाला, “त्यानी दोन पोती साबुदाणा रिटर्न आणला होता.. त्याना अकबर साबुदाणा हवा होता..”
“फिर? उनको दिया की नहीं?”
“नहीं. हरीभाऊ त्यांना म्हणाले, शेठजीनी कोणताही माल रिटर्न घेऊ नका, असे सांगितले आहे… त्यामुळे त्यांना राग आला. त्यानी आज ऑर्डर दिली नाही…”
शेटजी चिडले. त्यांनी हरीभाऊंना जोरात विचारले, “हरीभाऊ.. गोरेगाव के देसाई का माल रिटर्न लिया नहीं?”
हरिभाऊ घाबरले… हळू आवाजात म्हणाले, “तुम्हीच सांगितलंय शेटजी… एकदा बिल केलेला माल रिटर्न घेऊ नका म्हणून…”
“अरे भाई, वह ऐसे-वैसे ग्राहकों के लिए… जो लोग टाइम पर पेमेंट करते नहीं, उनके लिए… मगर देसाई स्टोअर्स अपना बेस्ट कस्टमर है… लास्ट 30 साल से हमारे पेढी पर आता है… बाकी लोग उनके पीछे है… मगर मैं उनको दुसरी जगह जाने नही देता… ये तुमने क्या किया हरीभाऊ… एक बार वो मुकेश जैसे पेढी पर गये… तो गये…”
“’मला वाटलं… मला वाटलं, शेटजी…”
“मला वाटलं… मला वाटलं क्या? इतने साल से यह पेढी में काम करते हैं… लेकिन अबतक धंदा कैसा करना यह समजता नहीं तुम्हें… जाओ कल सुबह देसाई के घर और उनकी माफी मांगो…“
हरीभाऊंनी मान खाली घातली… ‘गेली 30 वर्षे आपण या पेढीवर काम करतोय… शेटजी नसतील तेव्हा सगळा व्यवहार आपणच पहातोय.. लाखो रुपये बँकेत भरतोय.. लाखाच्या ऑर्डस देतोय.. पण शेटजीनी कधी अविश्वास दाखवला नाही की, हिशेब चेक केला नाही… पण आज गोरेगावच्या देसाईंची फक्त दोन पोती परत घेतली नाही म्हणून शेटजी एवढे चिडले!’ दिवसभर हरिभाऊ नर्व्हस होते…
इकडे शेटजी पण नाराज होते… रात्री घरी गेल्यावर त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं की, काहीतरी बिनसलं आहे, म्हणून आज आपला नवरा गप्पगप्प आहे. नेहेमीसारखा मूडमध्ये नाही… पत्नीने त्यांना कारण विचारलं. ते म्हणाले, “आज एक चांगली पार्टी लांब गेली… चांगला मराठी दुकानदार… अशी पार्टी जवळ यायला खूप वर्षे लागतात!”
हेही वाचा – निपाणीच्या उरुसात हरवलेली गंगी ‘आईविना भिकारी’
दुसऱ्या दिवशी सकाळी देसाईंच्य घरची बेल वाजली. त्यांच्या पत्नीने दार उघडले.
“देसाई साहेब आहेत काय? मी हरीभाऊ… हसमुखराय आणि कंपनी…”
“या आत या… देसाई योग करत आहेत… बसा.”
हरीभाऊ आल्याचं पत्नीने आत जाऊन देसाईंना सांगितलं. देसाईनी योगासने थांबवली आणि ते हॉलमध्ये आले… त्यांना पहाताच हरीभाऊ उठले आणि त्यांचे पाय धरले.
“अहो हरीभाऊ… काय हे! उठा… उठा…”
“नाही साहेब… तुम्ही क्षमा केल्याशिवाय मी पाय सोडणार नाही…”
“कसली क्षमा हरीभाऊ? उठा उठा…“
देसाईनी हरीभाऊंना उठवले.
“काय झालंय हरीभाऊ? आणि तुम्ही एवढ्या लांब गोरेगावला कसे?”
“देसाई साहेब… काल मी तुम्हाला साबुदाणा पोती बदलून दिली नाहीत, त्यामुळे शेटजी चिडलेयत. कधी चिडले नाहीत, आजपर्यत एवढे चिडलेत…”
“अहो… जाऊद्या… झाले ते झाले…”
“नाही देसाई साहेब… माझे चुकलेच… मी इतर गिऱ्हाईक आणि तुमची बरोबरी केली. शेठजी म्हणतात, देसाई स्टोअर म्हणजे आपले एक नंबर गिऱ्हाईक आहे. त्यांना दुखवता कामा नये… काल तुम्ही दुसरीकडे तुमची ऑर्डर दिली, त्यामुळे शेटजीना वाईट वाटले..”
“अहो हरीभाऊ… मी करतो फोन शेटजींना.”
‘नाही साहेब, मी खाली टॅक्सी उभी केली आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्ही आला नाहीत तर, शेटजींना वाटेल, देसाईंचा राग नाही गेला! तुम्ही कसेही करून चला.. परत मी तुम्हाला टॅक्सीने सोडतो…”
देसाईंनी खूप सांगून पाहिले, पण हरीभाऊ ऐकनात. शेवटी देसाई हरीभाऊंसह टॅक्सीत बसून निघाले. टॅक्सी मारिन लाइन्सला पोहोचली… तोपर्यंत शेटजी घरीच असणार म्हणून हरीभाऊंनी टॅक्सी शेटजींच्या घरी घेतली. हरीभाऊ समवेत देसाई आल्याचे पाहून शेटजी खूश झाले…
“आवो… आवो… देसाईसाब, आप आये तो मुझे अच्छा लगा!”
“अहो शेटजी… कशाला हरीभाऊंना पाठवलंत?”
“ऐसा है देसाई साब.. हम बनिया है, बेपार करते है… मगर हमें आदमी की पहचान है… तुम्हारे जैसे मराठी लोग हमारे कस्टमर है, इसका हमें गर्व है… तीस सालसे हमारी तुम्हारी पहेचान है… जब मैं घाटे में गया था… तब आपने मुझे पाच लाख रुपये भेज दिये थे… ये हरीभाऊको नहीं मालूम… बाद में मैंने सब पैसा दे दिया… मगर उस वक्त मेरे पीछे खडा रहनेवाले देसाईसाब आप ही थे! आप गोरेगाव जैसे मराठी एरिया में अच्छा धंदा करते हो.. हम सबको बोलते हे.. हमारा गोरेगाव में एक दुकान हैं.. और कल हमारे दुकान में तुमने जो दो पोता साबुदाना वापस लाया था.. उसको बदल के देने को ना कहा गया… आमाला वाईट वाटलं देसाई साब…”
“जाऊ द्या हो, झाले ते झाले…”
“झाले ते झाले नाही साब… हम बनिया लोग मुंबई में व्यापार करते हैं… वह तुम्हारे जैसे प्रामाणिक मराठी लोकांमुळे. मैं इतने साल से धंदा कर राहा हूं… मगर एक भी मराठी कस्टमर ने मुझे नही फंसया! पैसा देर से देंगे, मगर फसायेंगे नहीं… कल मुकेश को तुम्हारा ऑर्डर गया, मुझे दुःख हुआ…”
“छोडो शेटजी… एक आठवड्याचीच ऑर्डर गेली, पण परत मी तुमच्याच पेढीवर येणार! कारण गोरेगावमध्ये तीस वर्षांपूर्वी मी नवीन दुकान सुरू केले, तेव्हा तुमच्या पिताजींनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला उधारीवर माल दिला… मी त्यांना हळूहळू पैसे दिले… मग माझी परिस्थिती सुधारली… आता मला कोणीही क्रेडिट देईल… पण त्याकाळी तुमच्याच पेढीवरून मला माल क्रेडिटवर मिळाला, हे मी कसे विसरेन?”
शेटजी पुढे आले आणि त्यांनी देसाईंना मिठी मारली..
“असं असतं देसाई साब.. मराठी आदमी कभी जुने संबंध भूल नहीं जाता.. इसलिये एक मराठी गिऱ्हाईक लंबा गया, तो मुझे दुःख होता है…”
“नाही, शेटजी तुम्ही आहात बनिया, मला माहीत आहे ते, काळजी करू नका… दुकानात गेलो की, पुढच्या आठवड्याची ऑर्डर पाठवून देतो…”
“ये सुन कर मुझे अच्छा लगा… देसाई साब.. आखिर तुम्हारा हमारा रिश्ता…”
“तो तसाच राहील शेटजी…”
मोबाइल – 9307521152 / 9422381299


