रविंद्र परांजपे
मागील लेखात आपण मानसिक ताणतणावांचे शरीर-मनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ काय करायला हवे, याबाबत जाणून घेणार आहोत.
मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन
मानसिक ताणतणाव हे सर्व मनोकायिक समस्यांचे मूळ कारण आहे. मानसिक ताणतणावांमुळे व्यक्तीचे जीवन वेदनामय होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन ताणतणावमुक्त असावे, असे वाटत असते. यासाठी ताणतणावांचे सुव्यवस्थापन करणे नितांत आवश्यक आहे.
ताणतणाव सुव्यवस्थापन
मानसिक ताणतणाव येऊ नये आणि काही कारणास्तव आलाच तर, त्यास यशस्वीरीत्या कसे तोंड द्यायचे, यासाठी आपण केलेला विश्लेषणात्मक अभ्यास आणि प्रयत्नपूर्वक उचललेली पावले, यांचा समावेश मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन या प्रक्रियेत करता येईल.
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव
सर्वप्रथम आपल्याला मानसिक ताणतणाव आहे, हे वास्तव आपण स्वीकारायला हवे. नंतर ताणतणाव कशामुळे आला आहे, याचे कारण शोधायला हवे. एकदा का कारण लक्षात आले की, उपाय करणे सुकर होते. ताणतणाव निवारणार्थ नानाविध उपाय उपलब्ध आहेत. या सर्व उपलब्ध उपायांमधून आपल्याला अनुकूल, सोईस्कर आणि फायदेशीर उपाय शोधायला हवेत. तद्नंतर पुढची पायरी म्हणजे, हे उपाय जीवनात प्रत्यक्षात अमलात आणायचे.
ताणतणाव निवारणार्थ उपलब्ध उपाययोजनांबद्दल आपण विचार केल्यास आपल्या सहज लक्षात येईल की, आपणास आपल्या दैनंदिन जीवनात यथायोग्य बदल करूनच ताणतणावांचा सामना करणे आणि त्यावर मात करणे शक्य होणार आहे.
आता आपण आरोग्यदायी संतुलित जीवनशैली याबाबत जाणून घेऊ या.
आरोग्यदायी संतुलित जीवनशैली
सोप्या भाषेत, जीवनशैली म्हणजे जीवन जगण्याची एकंदर पद्धत, संतुलित म्हणजे जीवनशैलीतील संबंधित बाबींचे यथायोग्य संतुलन साधणारी आणि आरोग्यदायी म्हणजे आरोग्य प्रदान करणारी, अशी ही आरोग्यदायी संतुलित जीवनशैली. वास्तविक, जीवनशैली या संकल्पनेची व्याप्ती विशाल असून त्यात प्रामुख्याने दिनचर्या, आहाराच्या सवयी, एकंदर राहणीमान, शारीरिक हालचाली, व्यक्तिमत्त्व आणि सर्व व्यक्तीसंबंध इत्यादी तसेच तत्सम बाबींचा समावेश होतो.
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता
ताणतणाव टाळण्यासाठी तसेच निवारणासाठी वरील संबंधित बाबी आणि अनुषंगिक विषय लक्षात घेऊन निरामय मानसिक आरोग्यास पूरक अशा उपयुक्त उपायांचा विचार करून त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात आवर्जून समावेश करावयास हवा.
आजच्या धकाधकीत आपण जर आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अमलात आणण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न केले तर ताणतणावरहित जीवन जगण्याची आपली वाटचाल नक्कीच सुकर होईल.
क्रमशः
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांच्या ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकात मानसिक ताणतणाव निवारणार्थ आवश्यक सुव्यवस्थापन करण्यासाठी निवडक उपयुक्त उपाययोजनांचा उपयोग याविषयी त्यांनी सर्वांगीण सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे. पुस्तकासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774
chan lihile ahe…