मयुरेश गोखले
ढग गहिवरून आले होते… कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होणार होती… श्रीरंगने लाल शर्ट घातला होता, जो तिने गिफ्ट म्हणून आणला होता. शर्टची बाही फोल्ड करता करता श्रीरंगला आठवले की, तिला श्रीरंगाची शर्टची बाही फोल्ड करण्याची स्टाईल खूप आवडायची! त्याने घड्याळ घातले, ते तिने त्याला वाढदिवसाला गिफ्ट केले होते. घड्याळ, पर्स, कंगवा, गॉगल… श्रीरंगच्या वापरात असणारी प्रत्येक गोष्ट तिनेच प्रेमाने आणली होती. श्रीरंगला तिची आठवण येताच तो भूतकाळात गेला…
सहज घडलेल्या भेटीचे प्रेम कधी झाले, ते दोघांना कळलेच नाही. खूप भेटी झाल्या, कितीतरी सूर्यास्त दोघांनी सोबत अनुभवले. कधी भांडले, रुसले, अबोला धरला… पण त्यातही प्रेम होतं. घरच्यांनी पण लग्नाला संमती दिली आणि यांचा संसार सुरू झाला. बाहेर फिरायला जाणे, मुव्ही पाहणे, शॉपिंग, जेवण हे सर्व एन्जॉय करत दिवस जात होते. श्रीला मोठ्या कंपनीत नोकरी होती. हळूहळू श्री आपल्या ऑफिसच्या कामात व्यग्र होत गेला… आणि त्यांना निवांत वेळ असा मिळणे कठीण झाले.
तिला पाऊस खूप आवडायचा. डोंगरापलीकडून गच्च पाण्याने भरून काळेकुट्ट ढग येताना दिसले की, तिला खूप आनंद व्हायचा. पावसाचे टपोरे थेंब कोसळू लागले की, ती किती तरी वेळ त्यांच्याकडे बघत राहायची. ‘श्री असता तर किती मजा आली असती,’ याचा विचार करत त्याची वाट पहायची.
एका संध्याकाळी असेच काळे ढग गच्च भरून आले. सोसाट्याचा वारा पण वाहू लागला. वारा आपल्यासोबत दूर कुठेतरी पाऊस पडतोय, याची साक्ष देत होता. झाडे वाऱ्यासोबत डोलत पावसाची वाट पाहत होती आणि थोड्याच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचे टपोरे थेंब टिनच्या पत्र्यावर पडल्याचा आवाज वाढतच होता. झाडावरची पाने थेंब झेलत तृप्त होत होती आणि ती गॅलरीत उभी राहून पावसाचे थेंब बघत श्रीरंगाची वाट पाहात होती. तो आल्याशिवाय तिचा पाऊस रंगणार नव्हता.
हेही वाचा – धुळवड… आयुष्यात नव्याने रंग भरणारी!
श्रीसोबत एकदा अशा भन्नाट पावसात लाँग ड्राइव्हवर जावे… टपरीवर गरम चहा प्यावा… असं तिला मनापासून वाटत होतं. पण श्रीरंग आला तोपर्यंत रात्र झाली होती. तो फ्रेश झाल्यावर ती म्हणाली की, “श्री चल ना रे, मस्त लाँग ड्राइव्हवर जाऊ… मला ना अशा पावसात तुझ्यासोबत भिजायचं आहे… टपरीवर गरम पकोडे आणि चहा घ्यायचा आहे… चल ना!”
श्री लगेच चिडून म्हणाला की, “मूर्ख आहेस का? मी आता इतका थकून, काम करून आलोय आणि तुला हे असं सुचतंच कसं? माझा मूड नाहीये!”
ती म्हणाली, “अरे, ठीक आहे… रागवतोस काय असा! राहू दे तू थकला असशील तर!”
ती हिरमुसली. दुपारीच तिने श्रीसाठी एक शर्ट घेतला होता रेड कलरचा. तो तसाच कपाटात राहिला. तिने विचार केला की, रात्री झोपताना श्रीला सरप्राइज देऊ! पण आता तिचा मूड नव्हता. दोघेही तसेच झोपले.
बाहेर पावसाची रिप रिप सुरूच होती आणि तेवढ्यात जोरात वीज कडाडली… श्रीरंग एकदम भानावर आला. त्याला हॉस्पिटलला जायचे होते. तेवढ्यात ढगाने आपला धीर सोडला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचे टपोरे थेंब टिनावर पडल्याचा आवाज वाढतच होता. झाडावरची पाने थेंब झेलत तृप्त होत होती. त्या धो धो पावसात श्रीने कार काढली आणि तो हॉस्पिटलला पोहोचला. त्या दिवशी तिला पावसात फिरायला नाही म्हणणारा श्री आज अशाच पावसात तिला भेटायला हॉस्पिटलला आला होता. एक वर्ष झाले होते ती कोमात जाऊन… ज्या दिवशी तिने रेड शर्ट आणला त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी पायरीवरून पाय घसरून तिच्या डोक्याला मार लागला होता अन् ती कोमात गेली होती. बेडवर शून्यात नजर असलेल्या तिला श्री विनवण्या करीत होता… “बघ, तू आणलेला लाल शर्ट घातलाय! तुला माझ्यासोबत भिजायचं आहे ना, चल ना, उठ लवकर…” पण तिच्याकडून काहीच उत्तर येत नव्हते…
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
आकाशात मेघ गहिवरून आले होते आणि श्रीचे मन सुद्धा गहिवरून आले होते. ढगांचा धीर सुटला आणि पाणी जमिनीवर रिते करून ते ढग हलके होऊन वाऱ्यासोबत उडून गेले. पण श्रीच्या डोळ्यातील पाऊस काही संपत नव्हता…
मोबाइल – 9423100151


