आराधना जोशी
यंदा 9 जुलैला ई टीव्ही मराठीचा (Etv Marathi) 25वा वर्धापन दिन साजरा झाला. या ई टीव्हीच्या पहिल्या दिवसापासूनच्या प्रवासात मी रिपोर्टर म्हणून सहप्रवासी होते. ई टीव्ही मराठीच्या त्यावेळच्या मुंबई ब्युरो चीफ जयश्री मॅडमनी विश्वास दाखवून राजकीय बीटवर काम करण्याची संधी मला दिली होती. त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आजची आठवण माजी उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याशी निगडीत आहे.
दिवस नेमका आठवत नाही, पण साल होतं 2000. ई टीव्ही मराठी चॅनल नुकतंच सुरू झालं होतं. माझ्या दिवसभरातल्या बातम्यांचं काम आटोपून मी ऑफिसला आले आणि जयश्री मॅडमनी मला बोलावून घेतलं. एक निमंत्रणपत्रिका माझ्यासमोर ठेवली आणि “उद्या सकाळी ऑफिसला न येता परस्पर रंगशारदाला जा. तिथे तुला कॅमेरामन आणि बाकी टीम भेटेल. आपल्याला कार्यक्रमाचं वार्तांकन करायचं नाही तर, या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी सर उपस्थित राहणार आहेत, त्यांची मुलाखत घ्यायची आहे. ती घेऊन मग तू ऑफिसला ये,” असं मॅमनी सांगितल्यावर माझा आ वासला. उपपंतप्रधान पदावरच्या व्यक्तीची स्पेशल मुलाखत आणि मी घेणार! आपण स्वप्नात तर नाही नं? असा क्षणभर विचार मनात आला, मनातल्या मनात हसूही आलं. नंतर अनेक प्रश्नांनी डोकं काढायला सुरुवात केली. मुळात प्रचंड सुरक्षा व्यवस्थेमध्ये फक्त आडवाणी सरांना किंवा त्यांच्या सेक्रेटरीला मुलाखतीसाठी विनंती करणं आणि त्यांनी यासाठी होकार देणं काहीसं अशक्य वाटतं होतं. शिवाय, मराठी चॅनलसाठी ते का मुलाखत देतील? जयश्री मॅडमना मी हे सगळं विचारल्यावर त्या फक्त हसल्या आणि म्हणाल्या, “एक काम कर. आडवाणी सर आले की, फक्त आपला बुम त्यांना दिसेल अशा पद्धतीने ठेव आणि ‘सर ई टीव्ही, ई टीव्ही’ असं जोरात ओरड. आडवाणी सर नक्की तुला मुलाखत देतील.”
हे ऐकल्यावर माझ्या डोक्यात काहीही प्रकाश पडला नाही. मुळात तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी इतर चॅनेलवाले पण असणार. त्यांच्या गदारोळात मी एकटीने ओरडणं हे किती विचित्र दिसेल, असे भाव चेहऱ्यावर उमटले होते. मॅडमच्याही ते लक्षात आलं. त्यांनी मला धीर देत सांगितले, “मी आता जे बोलले ते करून बघ. सर नक्की बोलणार तुझ्याशी. मात्र त्याचं कारण मी नंतर सांगेन.”
‘ठीक आहे. बघूया, उद्या काय होतं ते…,’ असा विचार करून मी मान डोलावली.
हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स
दुसऱ्या दिवशी सकाळी घरून थेट रंगशारदावर पोहोचले. माझी बाकीची टीमही तिथे मागोमाग पोहोचली. कार्यक्रमाच्या ठिकाणी चौकशी केली तर, समजलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या दिवशी काही कारणांनी रंगशारदा हॉटेलमध्ये आले होते आणि तिथेच ठाकरे आणि आडवाणी यांची बैठक सुरू होती. ते ऐकल्यावर सभागृहातील सगळा सेटअप घेऊन मी हॉटेलकडे धावले. बहुदा 16व्या मजल्यावर ही बैठक सुरू होती. त्या मजल्यावर लिफ्टसमोरच्या लॉबीमध्ये आणखी काही चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रचंड प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात होते. साधारणपणे अर्ध्या तासाने आडवाणी हे बाळासाहेबांना भेटून कार्यक्रमाला जायचं म्हणून लॉबीत आले आणि कुठून कसं माहिती नाही, पण मी हातात ईटीव्हीचा बूम घेऊन “सर, ई टीव्ही, ई टीव्ही” असं जोरात ओरडले आणि काय आश्चर्य आडवाणी सरही जागेवरच थांबले. मागे वळून त्यांनी कुठून आवाज आला, याचा अंदाज घेतला आणि आपल्या सुरक्षा रक्षकाला माझ्याकडे पाठवलं. “चलिये, सर ने आप को बुलाया हैं,” असं त्याने सांगितल्यावर बाकीच्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते.
आमची टीम सरांसमोर गेल्यावर त्यांनी आपल्याबरोबर लिफ्टमध्ये येण्यास सांगितलं. 16व्या मजल्यावरून खाली येऊन रंगशारदा सभागृहात जाईपर्यंत आडवाणी सरांची हिंदीतील छोटीशी मुलाखत घेता आली. मुलाखतीच्या शेवटी सगळे मुद्दे विचारले नं? काही राहिलं तर नाही नं? अशी चौकशीही त्यांनी केली आणि मग ‘यांना गाडीपर्यंत सोडून या,’ असं त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी एकाला सांगितले.
त्या दिवशी फक्त आपल्याच चॅनलला मुलाखत मिळाली, या आनंदात आणि उत्साहात जयश्री मॅडमना फोन केला. त्या हसत म्हणाल्या, “मला माहिती होतं की, फक्त आपल्यालाच मुलाखत मिळणार ते.” यामागे काय गौडबंगाल आहे ते मात्र लक्षात येत नव्हतं. शेवटी ऑफिसला गेल्यावर आधी जयश्री मॅडमना भेटले आणि यामागचं नेमकं कारण काय? असं विचारलं.
हेही वाचा – प्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट
त्याचं कारण सांगताना जयश्री मॅडम म्हणाल्या, “1998मध्ये कोइंबतुर येथे निवडणुकीच्या निमित्ताने दौऱ्यावर असताना एक बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी आडवाणी लक्ष्य असावेत, असा अंदाज होता. मीटिंगसाठी तिथे जात असताना ई टीव्हीच्या प्रतिनिधीने बाईट घेण्यासाठी त्यांना थांबवले होते. त्यामुळे सुदैवाने स्फोट झाला त्यावेळी ते तिथे नव्हते. तेव्हापासून ई टीव्हीमुळे आपले प्राण वाचले, असं ते मानतात आणि त्यानंतर कधीही ई टीव्हीच्या प्रतिनिधींना मुलाखतीसाठी किंवा बाईटसाठी नकार देत नाहीत.”
हे ऐकल्यावर आज आपल्याला स्पेशल मुलाखत का मिळाली, याचा उलगडा तर झालाच पण देशाच्या उपपंतप्रधानांना भेटण्याची संधीही मिळाली, यासाठी ई टीव्हाच्या कोइंबतूर प्रतिनिधीला मनोमन धन्यवाद म्हटलं.