स्मिता मनोहर
“भेटी लागी जीवा लागलीसे आस…”
कधीपासून मनात होतं की, एकदा तरी वारीला जायचं… अर्थात, चालत पूर्ण वारी करणं मला तरी शक्य नव्हतं, पण थोडं अंतर का होईना जावं आणि तो अनुभव घ्यावा, असं सारखं मनात येत होतं. या वर्षी अचानक एका व्हॉट्सएप ग्रुपवर वारीसंबंधी मेसेज आला, आणि आम्ही तीन मैत्रिणींनी वारीला जायचे ठरवले, आम्हाला अजून तिघी येऊन मिळाल्या, त्यात माझी भावजय विद्या अर्थात रेवती महाबळ पण तयार झाली, आणि 21 तारखेला दुपारी 2 वाजता आम्ही सर्वजणी ठाण्याहून निघालो.
ठाण्याहून गाडीने जाताना संपूर्ण वारीमय वातावरण झाले होते. कित्येकजणींची आमच्यासारखी पहिलीच वारी होती… त्यामुळे उत्साह, आनंद सगळ्याजणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यातही अनेकजणी ओळखीच्या सुद्धा होत्या, म्हणूनच खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद मिळाला तो वेगळाच!
अशा आनंदी वातावरणात आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाडीमध्ये सगळ्यांनी मिळून विठ्ठलाची गाणी, अभंग म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष वारीत सामील होण्याची वेळ आली, ‘माऊली’ लिहिलेल्या टोप्या सगळ्यांना देण्यात आल्या. कारण वारीत चालायला लागल्यावर चुकामुक होऊ शकते, हे गृहीत धरून ती काळजी घेण्यात आली होती. तशी वारीदरम्यान आम्हा सहाजणींची चुकामुक झालीच, पण तिघी-तिघींचा ग्रुप असल्याने काळजी नव्हती. मुख्य म्हणजे, पांडुरंग होताच की आमची काळजी घ्यायला!
उपास असल्यामुळे जागोजागी साबुदाण्याची खिचडी, केळी, राजगिरा चिक्की, चहा याचे मोफत वाटप सुरू होते. वारकऱ्यांची श्रद्धा आणि समाजाचे त्यांच्या प्रति असलेले प्रेम पावलोपावली दिसत होते. वारकरी विठोबाच्या सेवेस निघाले होते आणि सामान्य माणूस वारकऱ्यांमध्ये विठोबा शोधत होता.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
आमचा मुक्काम बाणेरला होता. सकाळी ठरल्याप्रमाणे वारीमध्ये सामील होण्यासाठी निघालो आणि खूप गर्दी असल्याकारणाने आमची बस थांबवली. आम्ही सगळे तिथेच उतरलो आणि चालायला सुरुवात केली. पुणे-सासवड या मार्गावर मधेच एखाद्या दिंडीत सामील होत होतो… ते सगळे भजन करण्यात, अभंग म्हणण्यात आणि विठ्ठलाचा जयघोष करण्यात तल्लीन होते… आणि झपाझप पावले टाकत होते… आम्हाला त्या वेगाने चालणं शक्य नव्हतं. गर्दी पण खूप होती. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी त्या मार्गावरून जाणार होती. पण तरीही आम्ही वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. एका महिलेने तिच्या डोक्यावरील तुळशी वृंदावन माझ्या डोक्यावर ठेवले… मला खूप आनंद झाला! हे कसे झाले ते कळले नाही, पण मनातील इच्छा विठ्ठलाने पूर्ण केली.
आम्ही तसेच पुढे पुढे चालत होतो आणि फुरसुंगीला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी थांबणार होती, तिथे जाऊन पोहोचलो. पालखी पोहोचायला थोडा वेळ होता, त्यामुळे आम्ही पण पालखीची वाट पहात थांबलो होतो. तिथे विसाव्यासाठी काही वारकरी महिला येऊन बसल्या. त्यांनी त्यांचं तुळशी वृंदावन खाली ठेवले, बसताना त्या चालून-चालून खूप थकल्या आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. त्यांचे पाय चेपून द्यायला मी पुढे झाले. आधी त्यांनी नकार दिला, पण मी म्हटले, ‘या सेवेची संधी तुम्ही मला द्या.’ तशा त्या तयार झाल्या, पण अगदी थोड्यावेळेसाठी.
असाच एक-सव्वा वर्षाचा मुलगा आपल्या आईच्या कडेवर होता. अचानक त्याने मागून माझ्या टोपीला हात लावला, मला वाटलं टोपी खाली पडतेय की काय! मी पटकन मागे वळून पाहिलं, तर तो गोजिरवाणा मुलगा होता. मी लहान होऊन त्याच्याशी त्याच्याच भाषेत बोलले आणि माझी टोपी त्याच्या डोक्यावर घातली. त्या मुलाला एवढा आनंद झाला, आणि खुदकन हसलाही. त्याचा तो आनंदी चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोरून हलत नाही. मी त्याच्या आईला म्हटलं की, त्याला झालेला हा आनंद पाहून मलाच खूप समाधान वाटतंय. त्यानेही छोटे धोतर आणि विठोबाचा फोटो असलेला माऊली लिहिलेला झब्बा घातला होता, जणूकाही छोटा विठूरायाच होता. म्हणूनच, वारीत मला छोटा विठोबा भेटल्याचा आनंद होतोय.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आली. अर्थातच, पालखीचे लांबूनच दर्शन झाले, आणि आम्ही परत चालत निघालो, साधारण सहा ते सात किलोमीटर चाललो. पण या दरम्यान वारकऱ्यांची विठ्ठलाप्रती श्रद्धा, प्रेम दिसून आले. त्यांची कार्यक्रमाची नियोजनबद्ध मांडणी दिसली. एक ठराविक वेळापत्रक आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी… खूप शिकण्यासारखे आहे. या वारीमुळे अशी वारकरी मंडळी जवळून पाहायला मिळाली, आणि अत्यंत समाधानाने आणि आनंदाने आम्ही घरी परतलो.