निवेदिता मराठे
सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वाधिक प्रिय मोदक. त्यामुळे उकडीच्या मोदकासह नानाविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवला जातो. उकडीच्या मोदकांप्रमाणेच तळणीचेही मोदक केले जातात. याशिवाय, केशर मोदक, मावा मोदक, अंजिर मोदक, गुलाब मोदक तसेच चॉकलेट मोदकही उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण पाहूया माव्याच्या मोदकाची रेसिपी.
साहित्य
- खवा (मावा) – पाव किलो
- पिठीसाखर – स्वादानुसार (साधारण ¼ कप)
- केशर – चिमूटभर
- कोमट दूध – 1 ते 2 चमचे (केशर भिजवण्यासाठी)
- वेलची पूड – पाव चमचा
- पिस्ता – थोडेसे (गार्निशसाठी, ऐच्छिक)
- तूप – अर्धी वाटी
हेही वाचा – Recipe : गणपतीसाठी नैवेद्य… खिरापत आणि पंचखाद्य
कृती
- नॉन-स्टिकच्या कढईत मावा मध्यम आचेवर परतायला ठेवा.
- मावा सतत ढवळत रहा. मावा हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर माव्याचा चांगला खमंग वास सुटायला लागेल.
- दोन चमचे कोमट दूधात भिजवलेले केशर परतलेल्या माव्यात घाला.
- आणखी दोन मिनिटं मंद आचेवर हे मिश्रण ठेवा. त्यानंतर ते गॅसवरून उतरवा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.
- मग त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालून एकजीव करा.
- मोदक साच्याचा वापर करा मोदक साच्यावर थोडं तूप लावा.
- मिश्रण साच्यात घालून हलक्या हाताने दाबा.
- साचा अलगद उघडा आणि तयार मावा मोदक बाहेर काढा.
सजावट
मोदक एक थाळीमध्ये घेऊन पिस्ता, बदाम, केशर घालून सजवू शकता.
टीप
- मिश्रण खूप गरम असताना साखर घालू नका; त्यामुळे ते सैल होईल.
- मावा मोदक फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस टिकू शकतात.
- तुम्ही यात ड्रायफ्रूट्स भरून ‘ड्रायफ्रूट्स मोदक’ बनवू शकता.
तयारीसाठी लागणारा वेळ : साधारणपणे 10 मिनिटे
एकूण वेळ : जवळपास अर्धातास
हेही वाचा – Recipe : ऋषीची स्वादिष्ट भाजी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.