दुपारचा दीड वाजत आला होता, आज सुमनला सकाळची धुणं-भांड्यांची काम आटोपून घरी जायला जरा वेळच झाला होता. चार वाजता तिला परत सिन्हा बाईंकडे किटी पार्टी असल्यामुळे कामावर जायचे होते, तिला सध्या काळजी लागली होती ती, घरी एकटा असलेल्या आपल्या पोराची, दीपकची! सुमनचा नवरा रिक्षा चालवायचा, त्यामुळे त्याची घरी येण्याची अशी ठराविक वेळ नव्हती. दीपकचे सगळे काम सुमनलाच करावे लागत असे. दीपक, सुमनचा मुलगा तेवीस, चोवीस वर्षांचा होता. आता एवढ्या मोठ्या मुलाची कसली काळजी करायची? बाब त्याच्या वयाची नव्हती, तो सामान्य मुलांसारखा नसल्यामुळे काळजीची होती. तो वयाने आणि शरीराने जरी वाढला होता तरी, बुद्धीने विकसित नव्हता. तो अॅबनॉर्मल होता. त्याचे मन आणि बुद्धी अगदी चार-पाच वर्षांच्या मुलासारखी होती. त्याला आपल्या शरीराचे अजिबात भान नसायचे, कपडे घालून देण्यापासून ते अगदी त्याला आंघोळ घालून देण्यापर्यंतची सगळी कामं सुमनला करावी लागत होती. त्याला समज अशी नव्हतीच.
तो सगळ्यांच्या टिंगलटवाळीचा विषय होता. दिसायला जरी बरा असला तरी, ओंगळवाणा असल्यामुळे त्याच्याजवळ फारसं कोणी येत नसे. लोकांच सोडा पण त्याचा बापही त्याच्याकडे ढुंकून पहात नसे. त्याची सगळी जबाबदारी पूर्णपणे सुमनवरच होती… तो कसाही असला गलिच्छ, गचाळ, अजागळ, अर्धवट तरी तिचा पोटचा गोळा होता, ती आई होती त्याची! सुमन भरभर चालत घरात शिरली. तिला घरचे सगळे काम आटोपून परत जायचे होते.
तिने पटकन चुलीवर पाणी गरम करायला ठेवले, पाणी गरम होईतोवर तिने घराच्या दोन छोट्या खोल्या आवरून घेतल्या… घर कसले, पडवीवजा झोपडीच होती ती! नंतर गरम पाणी बादलीत काढून तिने दीपकला आंघोळ घालण्यास बसवले. पण आज तो नेहमीसारखा सामान्य वाटत नव्हता. त्याच्या डोळ्यात चमत्कारीक भाव होते. आज दीपक सहजासहजी सुमनला ऐकत नव्हता. सुमनला त्याच्या असल्या वागण्यात काही विशेष जाणवल नाही, तो असा हट्टीपणा कधीकधी करायचा. तिच्या डोक्यात फक्त दीपकचे आवरून परत सिन्हा बाईंकडे कामावर जाण्याचा विचार सुरू होता, त्यामुळे तिने दीपकला रागावून जबरदस्तीने आंघोळीला बसवले आणि ती त्याला आंघोळ घालायला लागली. त्यासरशी त्याने तिचा हात धरून “नको त्या जागी” लावायला सुरुवात केली… त्यासरशी सुमन एकदम दचकली! ती भानावर आली… आज तिची तिलाच लाज वाटली, ती जरी दीपकची आई होती तरी, ती प्रथम एक स्त्री होती. आज तिला पहिल्यांदा दीपकचा खूप राग आला. संताप अनावर होऊन तिने त्याला खूप मारले, पण दीपकला त्यातले काहीच कळत नव्हते. आज शरीरधर्माने आपले काम बजावले होते. निसर्गनियमानुसार त्याच्यातील नर, शरीराने जागृत केला होता. दीपकला एवढी समज असती तर, तो वेडा राहिलाच नसता!
आईने कशाला मारले, हेदेखील त्याला कळले नाही, मुकाट्याने आईजवळ येऊन तिच्या हातातील टॉवेलने अंग पुसायचा त्याचा प्रयत्न चालला होता. सुमन मात्र गलितगात्र होऊन त्याच्याकडे नुसतीच पाहात बसली होती.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
कसंबसं स्वतःला सावरून सुमनने दीपकला स्वच्छ केले, त्याला कपडे घालून पलंगावर बसवले आणि त्याला जेवू घातले. नंतर ती घराला कुलूप लावून सिन्हा बाईंकडे कामाला गेली. आज तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. काही केल्या तिच्या डोक्यातून दीपकच्या कृतीचा विचार जात नव्हता, कोणाला सांगायची देखील सोय नव्हती. ती रात्री उशिरा घरी आली तर, तिचा नवरा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आणि सुमनची कसलीही चौकशी न करता तिने सिन्हा बाईंकडून आणलेला डबा स्वतःच फस्त केला. पलंगावर लोळागोळा होऊन पडलेल्या दीपककडे रागाने एक कटाक्ष टाकून तो अंगणात जाऊन झोपला. सुमनला त्याला दुपारची गोष्ट सांगायची होती पण तिचा नवरा ऐकण्याच्या अवस्थेतच नव्हता, त्यादिवशी सुमन खूप रडली, पण तिला सावरायला कोणीच आलं नाही.
दुसऱ्या दिवशी सुमनने आदल्या दिवशीची गोष्ट नवऱ्याला सांगितली, तसा तो संतापून उठला आणि दीपकला लाथाबुक्क्यांनी तुडवू लागला… दीपकला प्रतिकारदेखील करता येत नव्हता. तो नुसता एखाद्या ढोरासारखा ओरडत होता. त्याची ती केविलवाणी अवस्था पाहून शेवटी सुमनच आडवी आली आणि तिने नवऱ्याला थांबवले. तसा दीपक एखाद्या लहान निरागस मुलाप्रमाणे तिच्या कुशीत शिरला आणि रडू लागला. त्याच्या डोळ्यातील गरम अश्रू सुमनच्या हातावर पडले आणि त्या अश्रूंनी तिचे मन पिळवटून टाकले. पण तिला दीपकला आवरणे भाग होते, कारण त्याच्या त्या एका कृतीने तो पुरुष असल्याचे सिद्ध केले होते!
सुमनला काय करावे, तेच सुचत नव्हते. दीपक सुमनच्या मांडीवर डोकं ठेवून रडत रडत झोपी गेला होता. त्याचा बापही अंगणात बाजेवर घोरत पडला होता. झोप फक्त सुमनलाच येत नव्हती.
असेच सात-आठ दिवस गेले, दीपकला मार बसल्यानंतर तो शांत झाला आहे, असं सुमनला वाटलं… पण नाही, त्याच्यातील त्या विकृतीने परत डोकं वर काढलं होतं, तो पहिल्यापेक्षा जास्त सुमनला त्रास देऊ लागला. त्याला तिचा स्पर्श समजत होता, पण आता आई म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून! त्याच्या शरीराला नैसर्गिक लिंगभेद समजायला लागला होता. सुमन त्याच्यासमोर एकटीच दिसत असल्यामुळे आणि ती त्याला जास्त जवळची असल्यामुळे तिचा त्रास वाढला होता. सुमन त्याला मार मार मारायची, पण तो रात्री लहान बाळासारखा कुशीत शिरून झोपला की सगळं विसरायची. परंतु दिवसेंदिवस जसजशी त्याची विकृती बळावली, तशी सुमन मनोमन धास्तावली. तिला आता दीपकसोबत एकटं राहण्याची भीती वाटू लागली होती. तिच्या नवऱ्याला तिच्या या लाचार परिस्थितीशी काहीच घेणंदेणं नव्हते. तिला कुठेतरी मन मोकळं करायचं होतं.
दिवसेंदिवस दीपक जास्त आक्रमक होत चालला होता, सुमनला आता स्वतःपेक्षा जास्त तिच्या शेजारी राहणाऱ्या लहान मुलींची काळजी वाटत होती. सुमन तरी दीपकला मारून मुटकून गप्प करायची, पण त्याने जर लोकांच्या पोरीबाळींवर अतिप्रसंग केला तर काय करायचे? हा प्रश्न तिला जास्त सतावत होता.
तिच्या मनातील भीती एक दिवस खरी ठरली. ती कामावर गेली असताना तिच्या शेजारची मुलगी सहज दीपकला पाहायला मोठ्या खिडकीतून घरात डोकावली तर, दीपकने तिला गच्च पकडून ठेवलं. घाबरल्यामुळे ती मुलगी मोठमोठ्याने रडायला, ओरडायला लागली, त्यासरशी तिचे आई-वडील धावत तिथे आले आणि दीपकला त्या अवतारात पाहून संतापले. त्या मुलीच्या वडिलांनी जे हातात मिळेल त्याने दीपकला मारले. संध्याकाळी सुमन घरी आल्यावर तुमची पोलिसांत तक्रार करतो म्हणून धमकावून गेले. तो सगळा प्रकार खरच लाजिरवाणा होता.
आता सुमनला आपली ममता बाजूला ठेवून दीपकला शिक्षा देणे अनिवार्य होते. दुसऱ्या दिवशी ती मनाशी एक निर्धार करूनच उठली. तिने सकाळीच दीपकला घेऊन पोलीस स्टेशन गाठले आणि ठाणेदार साहेब तसेच त्यांच्या पूर्ण स्टाफसमोर आपली कर्मकहाणी सांगितली. तिचा नवरा काय करतो म्हणून पोलिसांनी विचारले तर, ती बोलली, “साहेब, तो रिक्षा चालवतो, दिवसाला शंभर-दीडशे कमावतो, अर्धे पैसे दारूत गमावतो आणि उरलेसुरले तर घरात देतो. मी आपली लोकांची धुणीभांडी करून यांना पोसते.” तिची सगळी परिस्थिती समजल्यावर तिथे उपस्थित असलेल्यांची मन हेलावली.
तिच्या नवऱ्याला तिथे बोलावून घेतल्यानंतर विचारपूस केली तर तो निर्लज्जपणे म्हणाला, “साहेब, सुमनलाच जास्त पडलं होतं या पोट्टयाचं. हा झाला तेव्हापासूनच असा आहे, मी हिला म्हटलं की, दुसरं मुल होऊ दे, तर ही यालाच ‘बाबू, सोन्या’ करत बसली. हा देवाचं रूप आहे, यालाच आपण वागवू म्हणाली… मंग आता काय वागवं म्हणावं, आपल्या करणीची फळ भोगतीया. मी काय करणार याच्यात?” त्याने अस म्हणताच तिथे उभ्या असलेल्या एका अधिकऱ्याने त्याच्या कानफटात मारली, त्यासरशी तो चवताळून सुमनला म्हणाला, “इथं मला बोलावून कशाला आपली इज्जत दाखवतिया? मी म्हणलं तेच खरं आहे, हे पोलीस काय करणार या दीपकचं? यांच्याकडबी याच्यावर उपाय नाही आहे, हे सोंग आपलं आपल्यालाच निभवावं लागणार आहे.”
ते सगळं ऐकून तिथे जमा असलेल्या सगळ्यांचीच मन सुन्न झाली. खरंच त्यांच्याकडे तरी या समस्येवर काय तोडगा होता? हे सर्व होत असताना दीपकच्या गावी काहीच नव्हतं, तो आपल्याच दुनियेत होता. सुमनला रहावलं गेलं नाही, ती बोलती झाली, “साहेब, नशिबाने काय भोग मांडून ठेवलेया पाहा, एक पोरगं दिलं ते असं. ज्याला स्वतःच्या राहण्याची, खाण्यापिण्याची अक्कल नाही, पण त्याच्यातलं जनावर मात्र जागेवर आहे, त्याला बाकी काही समजत न्हाई, पण समोरची बाई समजते. त्याला “देवरूप” मानून मी लहानाचं मोठं केलं, त्याचं सगळं अगदी हागण्या-मुतण्यापासून ते आंघोळ घालून देण्यापर्यंत सगळं सगळं केलं. याचंच करण्यात आयुष्य जाईल म्हणून नवऱ्याने म्हटलं तरीबी मी दुसरं मुल होऊ दिलं नाही. यालाच देव मानलं, पण याच्यासोबत नशिबाने एक राक्षसपण जन्माला घातला आहे, हे मला त्यावेळेस समजलं नाही. याच्यातल्या देवासोबत मी एका सैतानालापण मोठ करत होते, हे मला आत्ता समजलं. याने पहिल्यांदा मला जेव्हा आई न समजता बाई म्हणून पाहिलं, माझा हात याने याच्या शरीराच्या नको त्या ठिकाणी लावला तेव्हाच मला समजलं की, हा आता देव न्हाई राहिला. याच्यातला सैतान आता जागा होणार. मला त्या दिवशी याच्या अशा वागण्याने रात्रभर झोप आली नाही, पण काय करावे ते समजत नव्हते. मी एक दिवस घरी नसताना याने शेजारच्या लहान मुलीसोबत तोच प्रकार करायचा प्रयत्न केला, तेव्हा मी, याच्या बापाने, त्या पोरीच्या बापाने लाथाबुक्क्यांनी तुडवला याला. पण हा माझा पोटचा गोळा आहे. कसाबी असला तरी माझा खूप जीव आहे याच्यावर. मारून तर टाकू शकत नाही, आई आहे ना मी! पण दुसऱ्या कोणी याला मारण्याअगोदर तुम्ही तरी याचा काहीतरी निर्णय करा. मला याचं काय करावं, ते समजलं न्हाई म्हणून तुमच्याकडे आले. मला तुमच्याकडे बोलून लई हलकं वाटतया आत्ता. मला काही मदत करता आली तर पाहा.”
तिचं ते बोलणं ऐकून ते सगळेच अधिकारी, कॉन्स्टेबल्स भारावले. तिथले एक अनुभवी वरिष्ठ अधिकारी तिला दिलासा देत म्हणाले, “बाई, तुम्हाला पटत असेल तर बघा, या तुमच्या मुलाला तुम्ही मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या संस्थेकडे सोपवून देऊ शकता.” सुमनला ते कितपत समजलं ते तिचं तिलाच माहिती, पण साहेब काहीतरी चांगलं करायला सांगत आहेत, हे मात्र तिला समजलं. तिने दीपकच्या भल्याकरिता लगेच होकार दिला. त्या साहेबांनी एका त्यांच्या माहितीतल्या अशा संस्थेला फोन लावून बोलावून घेतले आणि सुमनची सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. दोन दिवसांनी सुमनला, ‘तुमच्या घरी त्या संस्थेचे लोक येतील’ म्हणून सांगितले.
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
त्या दोन दिवसांत सुमनने दीपकला नवीन कपडे आणले, त्याला चांगलं-चांगलं गोडधोड करून खाऊ घातले… आपल्या कुशीत त्याला घट्ट बिलगुन घेत झोपली. तिचा जीव एकीकडे तो जाणार म्हणून आक्रंदत होता आणि दुसरीकडे त्याचं काहीतरी कल्याण होईल म्हणून आनंदलापण होता… तिची द्विधा मनःस्थिती होती. सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी संस्थेची माणसं दीपकला घेण्याकरिता आले. त्यादिवशी दीपकला मात्र आपल्यासोबत काहीतरी वेगळं होतेय, इतकं जाणवलं होतं. तो त्या माणसांना जवळ येऊ देत नव्हता, सुमनच्या पाठीमागे सारखा लपत होता. एकाने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर, त्याने त्याच्या हाताला इतका जोरात हिसका दिला की, तो माणूस खाली पडला. दीपक आटोक्यात येत नाही, हे पाहून त्यांनी सुमनलाच गाडीमध्ये बसायला सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की, दीपक तिच्या मागोमाग गाडीत जाऊन शांतपणे बसला. तो गाडीत बसल्याबरोबर त्याला दोन माणसांनी घट्ट धरून ठेवले आणि सुमनला गाडीतून उतरायला सांगितले. ती उतरल्याबरोबर त्यांनी गाडी लटक केली आणि गाडी निघाली. दीपक गाडीच्या मागच्या काचेजवळ उभा राहून मोठमोठ्याने रडत होता, सुमनच्या दिशेने हात पसरून बघत होता. सुमनला आपल्या देवत्वाची साक्ष देत होता, पण सुमनला आपल्या डोळ्यातील अश्रूंमुळे दीपक धुसर दिसत होता. त्याच्या शरीरात वसलेल्या राक्षसाला आता शिक्षा मिळणार होती.
पण सुमनचा देव मात्र आपले देवपण सिद्ध करायला टाकीचे घाव सोसायला सुमनपासून लांब निघाला होता. कदाचित, त्याच्यातल्या माणसालादेखील देवत्व प्राप्त होऊन तो सुमनकडे परत आला असता.


