Tuesday, March 17, 2026

banner 468x60

Homeललितलग्नाची बोलणी अन् बापूचा रुसवा

लग्नाची बोलणी अन् बापूचा रुसवा

ॲड. कृष्णा पाटील

परवा बाप्या म्हणजेच बापूच्या लग्नाची बैठक सुरू होती. मुलीला मुलगा पसंत पडला होता. मुलाला मुलगी पसंत पडली होती. सर्व बघाबघी झाली होती. आता लग्न ठरवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मुलीचं स्थळ बाप्याच्या मामानेच आणलं होतं. मामाच्या सगळीकडे ओळखी, त्याच्यामुळेच स्थळ चालून आलं होतं. मामा लग्नाला मध्यस्थी होता. बाप्याच्या भावकीतली चार माणसं गोळा झाली होती. मुलीकडील चार-पाच माणसे आली होती. बाप्याच्या घरात लग्नाची बोलणी सुरू होती…

देण्या-घेण्याचा विषय निघाला. बाप्याचा मामा मुलीकडच्या लोकांना म्हणाला, “तुम्हाला जेवढं शक्य असंल तेवढं करा. आमची कोणतीही सक्ती नाही.”

मुलीकडचे लोक म्हणाले, “आम्ही मुलगी आणि नारळ देणार. आमची परिस्थिती नाही, हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे.”

मामा म्हणाला “काही हरकत नाही. आम्ही कुठे जोर-जबरदस्ती करतोय?”

एवढ्यात मुलीचा चुलता म्हणाला, “मुलगा काहीच बोलत नाही. त्यांना थोडं बोलायला सांगा.”

हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?

मामाने बाप्याकडे पाहिलं… तर बाप्या रुसून बसलेला. बाप्या नुसताच अंथरलेल्या फाटक्या सतरंजीच्या दोऱ्याबरोबर खाली मान घालून खेळत होता. कुणाबरोबर एक नाही की, दोन नाही. मामाने बाप्याला हळूच खुणवले. त्याला आतल्या खोलीत येण्याची खूण केली. बाप्याने बरोबर ओळखलं. बाप्या आणि मामा आत गेले. आता मामाला खरोखर काय ते सांगावं म्हणून बाप्या म्हणाला, “मामा, तुम्ही काय करायला लागलाय? ज्याच्याकडं खुटा ठोकाय जागा न्हाय, तो सुद्धा मुलीला थोडेफार सोनं घाला म्हणतू. आपली तर परिस्थिती चांगली हाय. दोन एकर जमीन हाय. मग अशी फुकट का करायची? मुलगी पण एक नंबर न्हाय. दिसायला ती अशी तशीच हाय. तरीही तुम्ही सांगताय म्हणून मी पसंत केलीया.”

मामा म्हणाला, “बापू, अरे हल्ली मुलांची लग्न होत नाहीत. तुझ्या नशिबाने तुला मुलगी मिळाली आहे. कशीही असू दे… चांगला संसार कर. या देण्या-घेण्याच्या भानगडीत पडू नको. नाहीतर, आहे ते पण लग्न मोडून जाईल.”

मामाने एवढे सांगितले पण बाप्याचा रुसवा तसाच… मामाचं ऐकेल तर बाप्या कसला? मामाला तो पुन्हा म्हणाला, “काहीही करा. पण मुलीला दोन तोळं तरी सोनं घातलं पायजे, अशी अट टाका. तुम्ही बोलत न्हाय म्हणून. न्हायतर पावणं न्हाय म्हणणार न्हाईत.”

हेही वाचा – सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!

मामाच्या रागाचा पारा चढत होता. एक तर, बाप्या म्हणजे असाच उपटसुंभ होता. त्याला नोकरी नव्हती. त्याचा कुठला व्यवसाय नव्हता. बापाच्या माघारी कशीतरी शेती करत होता. बापाची नऊ एकर जमीन. त्यापैकी याने बरीच विकली होती. राहाण्यासाठी घर नव्हते. होती ती पत्र्याचे शेडच! पण बाप्याला कसला अभिमान? मुलीकडून काहीच घ्यायचं नाही म्हणजे तो आपला अपमान आहे, असं त्याला वाटत होतं.

मामाने त्याला घराच्या बाहेर बोलवलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “तुझा बाप मरून किती वर्षे झाली?”

बाप्या म्हणाला, “झाली की बारा वर्ष.”

मामाने पत्र्याकडे बोट करून दाखवले. बाप्याला म्हणाला, “घरावरचे पत्रे वाऱ्याने उडून जाऊ नयेत म्हणून तुझ्या बापाने जे दगड ठेवले आहेत ते दगड सुद्धा तुला बदलायचे झाले नाहीत. इतकं तुझं कर्तृत्व मोठं! मोठा आला कर्तृत्ववान. गप्प-गुमान सगळ्या गोष्टीला तयार हो. नसेल तर तुझं तू लग्न कर जा.” मामाचं बोलणं ऐकून बाप्या जाग्यावर आला. त्याच्या मुंग्याच झडल्या. खाली मान घालून तो आत बैठकीत येऊन बसला. मोठ्या जोमाने म्हणाला “तुम्ही म्हणताय ते मला सर्व पसंत हाय. मुलगी आणि नारळ स्वीकारायला आमी तयार हाय.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!