नितीन फलटणकर
मनोहर यांनी आज जरा उशिरानेच डोळे उघडले होते. रोज पहाटे 5 वाजता उठून फिरायला जाणे, हा त्यांचा शिरस्ता होता. त्यांनी घडाळ्याकडे पाहिले. 8 वाजले होते. अंगात जरा कणकण वाटत असल्याने ते तसेच पलंगावर कुस बदलत विचारात मग्न होते. आज आपण उठूच नये, असे त्यांनी मनाशी ठरवले. पण नळाला पाणी आल्यावर उठावेच लागणार, या विचाराने त्यांचा मूड गेला. आतापर्यंत त्यांचे उशीवर डोके होते, आता त्यांनी डोक्यावर उशी घेतली. चादरीचा माग घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला खरा, पण इतकावेळ त्यांच्या पायाशी निपचीत पडलेली चादर त्यांच्यापासून जणू दूर जाण्याच्या प्रयत्नात असल्याच्या थाटात अर्धी पलंगावर तर अर्धी खाली घसरली होती. दोन-तीन वेळा मनोहर यांनी चादरीला जवळ करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही त्यांच्याजवळ येण्यास तयारच नसल्यागत आणखीच खाली खाली सरकत होती. त्यात आता पलंगाला मच्छरदाणी लावण्यासाठी जोडलेल्या हुकाने तिला साथ देण्यास सुरुवात केल्याने ती जागची हालायचे नावच घेत नव्हती.
मनोहर चिडले; पण काहीच पर्याय नसल्याने त्यांनी रागावर नियंत्रण मिळवत लढाई आधीच तलवार म्यान केल्याच्या आविर्भावात मिचमिचत्या डोळ्यांनी उशी खालून डोके वर काढले आणि हलकेच हासत पुन्हा उशी खालच्या जादुई दुनियेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घडाळ्याचा काटा पुढे पुढे सरकत होता. अचानक मनोहरांच्या लक्षात आले आज कुणीच घरात दिसत नाही? आई, कुंदाची आई, कुंदा…? मनोहरांना हायसे वाटले. लग्न झाल्यापासून त्यांना असा एकांत कमीच मिळत असल्याने त्यांनी पुन्हा हा विचार नको, असं मनाशीच ठरवलं.
हेही वाचा – कन्फेशन कॉल…
कुंदाची आई म्हणजे मनोहर यांच्या सौ. जोत्स्ना! एकदा लग्नाची गाठ जुळल्यानंतर ती सात जन्मापर्यंत कायम रहाते, यावर मनोहर यांचा लग्नानंतरच विश्वास अधिक दृढ झाला होता. मनोहर ऑफिसला निघाल्यानंतर सौ. त्यांना बाहेरच्या दारापर्यंत सोडायला जात. एकदा तर, नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मनोहर मित्रांसोबत जेवायला बाहेर गेले होते. तिथे योगायोगाने ज्योत्स्ना देखील पोहचल्या होत्या. तेव्हापासून मनोहर मित्रांसोबत बाहेर जेवायला गेले नाहीत. आज याला 25 वर्षं तरी झाली असतील.
सौ. नुसत्या भेटायला आल्या असत्या तरी एकवेळ चालले असते हो, पण चक्क त्या मनोहर यांना डबा घेऊन आल्या. तोही थोडा थोडका नाही. चक्क चार ताळ्यांचा डबा. मेनू आजही आठवला तरी, मनोहर मोठा आवंढा गिळतात. आळूचं फदफदं, पिठल्याच्या वड्या, दहीभात, एका डब्यात गुदमरून पडलेले कांदा, लिंबू… त्याखाली त्यांच्या ओझ्याने अगदीच पांगळे झालेल्या टोमॅटोच्या फोडी… दोन तळलेल्या मिरच्या आणि खीर! त्या दिवसापासून मनोहर मित्र नावाच्या जमातीपासून वेगळे झाले, ते आजतागायत. आपल्यातील फितूर कोण होता? कुणी ज्योत्स्ना यांना ते कोणत्या हॉटेलात जेवायला जाणार याची टिप दिली? हे मनोहर यांच्यासाठी न उलगलेले कोडेच ठरले. मागील 25 वर्षांपासून मनोहर केवळ यावरच विचार करताहेत. तो एकदा हाती लागला रे लागला की, मग त्याला कोणती शिक्षा द्यायची यावर मनोहरने बसल्या बसल्या एक प्रबंधही खरडून काढला होता. सौंकडे त्यांनी एकदाच खबऱ्याचे नाव विचारण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर आजतागायत मनोहरांच्या मनात लाटण्याची धास्ती आहे. शेजारच्या शिर्के काकांनी तो युद्धाचा प्रसंग पाहिला होता. सौंच्या हातात लाटणं आणि मनोहरच्या हातात बचावासाठी लोखंडी तवा. त्या चिलखतामुळं मनोहर यांच्या डोक्यावर टेंगूळ वगळता कोणतीही इजा झाली नव्हती. तेव्हापासून मनोहरांचा लोखंडी तव्यावर जीव जडलेला.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
हे सगळं आठवताना खूप वेळ गेला. पण कदाचित घडाळ्याची किल्ली संपल्याने ते 8 वरच थांबले होते. मनोहर यांनी जराशी खिडकी उघडली. बाहेर फांदीवर त्यांना एक कावळा दिसला. घराच्या खाली खूप गर्दी जमल्याचा भास त्यांना झाला. कुणी ओळखीचं दिसतंय का, हे पहाण्यासाठी मनोहरांनी खिडकीत नाक खूपसून थोडं डोकं बाहेर काढलं. दिनकर, रमेश, सूर्यकांत आणि ऑफिसातल्या सुनैनाही त्याला दिसल्याचा भास झाला. एवढी गर्दी का झाली असेल? पाणी भरायला? पण रमेश, दिनकर माझ्या घरापुढे येऊन पाणी का भरतील? मनोहरने पुन्हा डोळे चोळले. आपण स्वप्नात तर नाहीत ना, या विचारात त्यांनी शर्ट शोधण्याचा प्रयत्न केला. पण रात्री त्यांनीच तो धुण्यासाठी भिजवला होता, हे त्यांच्या लक्षात आले. ते तसेच, हाफ पँट आणि बनियनवर बाहेर जायला निघाले… तर दार सताड उघडे. दारात समोर काही तरी अंथरलंय आणि त्यावर कुणीतरी झोपलंय… त्याच्या शेजारी उदबत्ती आणि धूप लावले आहे. मनोहरची आई त्या झोपलेल्या माणसाच्या डोक्यावरून हाथ फिरवतेय. पदर डोळ्याला लावून ती सारखी रडतेय. कुंदा झोपलेल्या व्यक्तीच्या पायाशी सौंच्या मांडीवर बसली आहे. काहीच कळत नसल्याने ती तिथे जमलेल्या लोकांकडे बघतेय. जोत्स्ना तिला मांडीवरून खाली उतरवत त्या व्यक्तीच्या कानाजवळ गेली. काहीतरी पुटपुटली… ती म्हणाली, ‘तो दिनकर होता, माझ्या खबऱ्या.’ चादर बाजूला केल्यावर दिसले, झोपलेली व्यक्ती होती मनोहर…! घडाळ्यात दुपारचे 2 वाजले होते. फांदीवरचा कावळाही उडाला होता…


