अनिता बाळकृष्ण वैरागडे
मागील लेखात आपण पाठीवर आणि पोटावर करण्याची आसने पाहिली. आसन हे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवन जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज असते, तशीच योग विद्या सुद्धा अत्यंत आवश्यक असते. आता या लेखात आणखी काही आसने आणि त्यांचे शरीराला होणारे फायदे पाहूयात.
मकरासन
मकरासन करताना पोटावर झोपून दोन्ही हात हनुवटीवर लावायचे आणि पायात थोडेसे अंतर ठेवायचे. नंतर ते गुडघ्यामध्ये दुमडायचे आणि दीर्घ श्वास घेऊन पाय कमरेच्या खालच्या भागावर लावायचे. या आसनाचे अनेक फायदे आहेत. मेरूदंड मजबूत होतो, पाठदुखी दूर होते. शिवाय, सायटिकासाठी सुद्धा अत्यंत लाभदायक आहे.
शलभासन
हे आसन करण्यासाठी पोटावर झोपायचे. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे किंवा ओटीपोटीच्या खाली ठेवायचे. हनुवटी जमिनीवर ठेवायची आणि थोडी वर उचलायची. नंतर श्वास घेत पाय उचलायचे, काही सेकंद श्वास सामान्य ठेवून थांबून श्वास सोडत पाय जमिनीवर ठेवायचे. आरोग्याच्या दृष्टीने या आसनाचेही अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे, पचनक्रिया सुधारते आणि फुफ्फुसे मजबूत होतात. सायटिकासाठीही अत्यंत उपयोगी आहे.
हेही वाचा – Yoga is lifestyle : पाठदुखी दूर करणारी आसने
नौकासन
नौकासन पोटावर आणि पाठीवर, अशा दोन्ही बाजूंनी करता येते. प्रथम आपण हे आसन पोटावर कसं करायचं ते बघू. पोटावर झोपून दोन्ही हात खांद्याच्या बरोबरीने वर उचलायचे आणि पाय सुद्धा काही अंतरावर वर उचलायचे. हात आणि पाय वरती उचलताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि पुन्हा जमिनीवर ठेवताना श्वास सोडायचा. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते. पोटाचे स्नायू मजबूत होतात तसेच शरीर लवचिक बनते. हे आसन पोटांच्या अनेक विकारांवर अत्यंत फायदेशीर आहे.
नौकासन पाठीवर करताना हळूहळू दोन्ही पाय जमिनीपासून काही अंतरावर वर उचलायचे. तर, दोन्ही हात समोरून वर उचलायचे. दोन्ही हात आणि पाय वर उचलताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि काही सेकंद थांबून हळूहळू श्वास सोडत पाय आणि हात जमिनीवर ठेवायचे. या आसनाचे देखील अनेक फायदे आहेत. मेरूदंड मजबूत होतो. पोटांच्या अनेक आजारावर फायदेशीर आहे. हाताचे स्नायू बळकट होतात.
अशाप्रकारे आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये थोडा वेळ स्वतःसाठी काढून योग, आसने, प्राणायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. जसा श्वास घ्यायला ऑक्सिजनची गरज असते तसेच आपल्या जीवनाला योगची गरज आहे.
क्रमश:
हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा