पराग गोडबोले
आज पुण्याची फेरी होती, ऑफिसच्या कामासाठी… मागच्या वेळी घाटात बराच वेळ अडकलो होतो, त्यामुळे या वेळी विषाची परीक्षा नको परत, म्हणून आधीच ट्रेनचं तिकीट काढून ठेवलं! इंद्रायणी नेहेमीप्रमाणे दुथडी भरून वाहत होती, त्यामुळे त्या गाडीचा योग नव्हताच नशिबात… मग लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम, अशा लांबच्या गाडीचं मिळालं तिकीट.
गाडी सकाळी साडेसात वाजता कल्याण, साडेदहाला पुण्यात! ऐसपैस बसून जाण्यासाठी मस्त AC 3T चं तिकीट काढलं. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या कुर्सीयानात बसून, अवघडलेला प्रवास करण्यापेक्षा हे खूप छान… किमतीनं हे तिकीट जास्त पडतं, पण प्रवास आरामाचा आणि सुखाचा होतो!
साडेसातची गाडी पकडायला, बायकोच्या धोशामुळे साडेसहालाच घरून निघालो. जेमतेम दहा मिनिटांचा प्रवास संपवून, स्टेशनवर माशा मारायचा उद्योग करावा लागणार होता. घरातली दुन्दुभी ऐकत बसण्यापेक्षा, माशा मारत बसणं केव्हाही जास्त सुखावह…
हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!
नेहेमीप्रमाणे ठाकुर्ली स्टेशनला पोहोचलो आणि रोजच्या सवयीप्रमाणे, मुंबईला जाणाऱ्या फलाटावर जाऊन उभा राहिलो… दोन मिनिटांतच गाडी आली, बाह्या सरसावून झेप टाकली गाडीत आणि आत जाऊन उभा राहिलो. रोजचीच सवय ही!
एवढ्या लवकरही बसायला जागा नाहीच मिळाली. गाडी सुटली, डोंबिवली आलं आणि मला जाणवलं, काहीतरी चुकतंय बाप्पा!
क्षणार्धात वीज लखलखली डोसक्यात आणि आपण पुण्याला जायला निघालोय, याची जाणीव झाली. हाय रे कर्मा!
मी उलट्या दिशेला निघालो होतो आणि कल्याणला पोहोचायच्या ऐवजी डोंबिवलीला पोहोचलो होतो… भराभर पोतडी उचलली आणि उतरायचा प्रयत्न करायला लागलो, पण दैवगती अशी, की उतरूच शकलो नाही, गर्दीमुळे!
आता, ‘अगला स्टेशन कोपर…’ लोकांना लोटत, ढकलत, शिव्या-शापांचा धनी होत कसाबसा कोपरला उतरलो. उतरून आधी घटाघटा पाणी ढोसलं आणि उतरायला मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानले… या सगळया लफड्यात सात वाजले होते. तेवढ्यात समोरच्याच फलाटावर कल्याणला जाणारी गाडी आली आणि मी धावतपळत ती गाडी पकडली…
श्वास फुलला होतो, घामाघूम झालो होतो, पण आता गाडी मिळेल पुण्याची, याची आशा होती. पण दुर्दैवाचे दशावतार अजून संपले नव्हते. कल्याणच्या आधी सिग्नलला गाडी थांबली आणि पलीकडच्या बाजूला माझी पुण्याची गाडी येताना दिसली!
हेही वाचा – ऋचा… आयुष्याच्या नव्या डावाची सिद्धता!
परत पोटात गोळा आला. तेवढ्यात माझी लोकल हलली आणि न थांबता, सुसाट कल्याणला पोहोचली. पुण्याची गाडी अजूनही धापा टाकत होती सिग्नलला…
उतरून, परत एकदा धावत सुटलो धनाधन. मी आणि पुण्याची गाडी एकाच वेळी फलाटावर… डबा ठाऊक होता, पण समोर दिसला त्या डब्यात शिरलो आणि डबा शोधत, धापा टाकत स्थानापन्न झालो… गाडी सुटली होती आणि अपेक्षेप्रमाणे बायकोचा फोन वाजला…
“मिळाली का गाडी?” आता काय सांगू तिला माझी कर्मकहाणी? सकाळी सकाळी शिव्या खायची अजिबात इच्छा नव्हती… “हो, मिळाली ना!” एवढंच बोलून गप्प बसलो आणि “थोड्या वेळाने फोन करतो,” म्हणून फोन ठेवला…


