Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » समाधान देणारी बुडालेली उधारी…
    ललित

    समाधान देणारी बुडालेली उधारी…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 21, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, डॉक्टर सुबोध, अपघातानंतरची माणुसकी, जखमी शामराव, आप्तांची बेईमानी, शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा, शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न, कर्जबाजारी शेतकरी, शेतकऱ्याकडची उधारी, उधारीचे दीड लाख
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    भाग – 2

    लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून सुबोध आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला. त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी अंतरावर असताना सुबोधला दिसलं की, रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे. सुबोधला रहावलं नाही, त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली. त्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली. बापरे! प्रकरण गंभीर दिसत होतं. तो पटकन खाली वाकला आणि त्याची नाडी तपासली. नाडी सुरू होती. पटकन ॲक्शन घेतली तर, वाचूही शकला असता. त्याने उठून त्या मुलाच्या म्हाताऱ्या वडिलांकडे पाहिलं. तो हात जोडून उभा होता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात होत्या. त्या म्हाताऱ्याच्या मदतीने त्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं आणि गाडी सुसाट चालवत शहरातील एका हॉस्पिटलमध्ये आला. रस्त्यात डॉक्टर मित्र शेखरला फोनवरून सर्व माहिती दिली.

    या घटनेनंतर सुबोध परत आपल्या दवाखान्यात व्यग्र होऊन गेला. दहा-बारा दिवसांनी त्याला शेखरचा फोन आला,

    “सुबोध, तू आणलेला तो ॲक्सिडंट झालेला पेशंट, शामराव पाटील, अरे त्याचं ऑपरेशन करायचंय, पण त्याचे नातेवाईक पैसे संपले, असं म्हणताहेत. काय करू?”

    “साधारण किती पैसे लागतील शेखर पूर्ण ट्रीटमेंट, रूमचं भाडं, मेडिसिन्स वगैरेला?”

    “अडीच लाखाच्या आसपास…”

    “ठीक आहे तू कर ऑपरेशन. बाकीच्या दीड लाखाचं काय करायचं ते बघतो मी…” तो मनाविरुद्ध बोलून गेला.

    ज्या ज्या लोकांना त्यानं पैसे उधार दिले होते, त्यांची लिस्ट केली. मग बायकोच्या नातेवाईकांना सोडून सगळ्यांना फोन लावायला सुरुवात केली. मृत्यूच्या दाढेत असलेल्या एका मित्राच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचं सांगून ताबडतोब पैसे देण्याची विनंती केली. पण कुणालाच त्याच्या मित्राच्या जीवाशी देणंघेणं नव्हतं. सगळेच पैसे न देण्याचे बहाणे सांगत होते… त्याच्याच पैशासाठी त्याला भीक मागावी लागत होती आणि घेणारे त्याला खेळवत होते. थकून त्याने फोन ठेवला. ज्या लोकांना दुसऱ्याच्या प्राणांचीही पर्वा नाही त्यांच्या अनावश्यक गरजांसाठी आपण उसने पैसे द्यावेत, याचा त्याला भयंकर संताप आला. स्वतःला शिव्या देतच तो झोपायला गेला.

    हेही वाचा – उधारी अन् तरुणाच्या जीवाचे मोल!

    दुसऱ्या दिवशी परत शेखरचा फोन आला. त्याला काय उत्तर द्यावं, या विचारात असतानाच त्याला एक कल्पना सुचली. फोन उचलून तो म्हणाला,

    “शेखर असं कर ना, तुझ्याकडे माझे तीन लाख बाकी आहेत, त्यातले दीड लाख तू वापरून घे. दीड लाख तू मला पुढच्या वर्षी दिले तरी चालतील…”

    पलीकडे एकदम शांतता पसरली. मग क्षणभराने शेखर म्हणाला,

    “ते पैसे नंतर दिले असते मी सुबोध. तुला तर माहीतच आहे, माझ्या आसपास बरेच ॲक्सिडंट हॉस्पिटल आहेत, त्यामुळे माझी कमाई काही तुझ्याइतकी नाही आणि ओळखपाळख नसलेल्या लोकांसाठी तू तरी का स्वतःचे पैसे वाया घालवतोयस? करतील ते त्यांचं कसंही… तुला वाटतं का ते तुला पैसे परत करतील म्हणून?”

    ” मग तू मला फोनच का केला? हाकलून द्यायचं असतं त्यांना. झक मारुन आणले असते त्यांनी पैसे…”

    सुबोध चिडून म्हणाला, तशी शेखरची बोलती बंद झाली. मग सुबोधच नरमाईच्या सुरात म्हणाला,

    “हे बघ शेखर सात-आठ वर्षं झालीत तुला पैसे देऊन. मी कधी तुला बोललो? कधी तुझ्याकडे पैसे मागितले? आताही मी तीन लाख मागत नाहीये. शामरावसाठी जे वरचे दीड लाख अजून लागताहेत, तेच फक्त मी मागतोय!”

    शेखरने लवकर उत्तर दिलं नाही. मग म्हणाला,

    “ठीक आहे, करतो मी अँडजस्ट. पण माझ्याकडे दोन वर्षं तरी पैसे मागू नकोस…”

    “ओके… डन… आणि तुला सांगू का शेखर, मला हा परोपकाराचा आणि मदतीचा किडा चावलाय म्हणून मी उठसूठ कुणालाही मदत करत असतो. काय करू स्वभावच आहे माझा. कुणाचं दुःख पाहावत नाही मला. नाही तर, तुला एका फटक्यात पाच लाख कशाला काढून दिले असते मी?”

    ही मात्रा बरोबर लागू होणार होती. शेखर शब्दही काढू शकला नाही.

    एक महिन्यानंतर सुबोधला शेखरचा फोन आला. शामराव पाटीलला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. शामराव आणि त्याच्या कुटुंबाला सुबोधची भेट घेण्याची इच्छा होती. ‘त्यांना तुझ्या घरी पाठवू की, क्लिनिकमध्ये?’ असं विचारत होता. सुबोधने त्याला, तो स्वतः शेखरच्या हॉस्पिटलमध्ये येत असल्याचं सांगितलं.

    दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच सुबोध शेखरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. शामरावच्या हाताला आणि पायाला अजूनही प्लास्टर होतं. त्याच्याभोवती बसलेलं त्याचं कुटुंब सुबोधला पहाताच उठून उभे राहिले. शामरावच्या वडिलांनी हात जोडले तर, धाकटा भाऊ पाया पडायला लागला. सुबोधने त्याला उठवलं तर, तो रडायला लागला…

    “डॉक्टर साहेब तुमचे खूप उपकार आहेत. तुमच्यामुळे माझा भाऊ आज आम्हाला डोळ्यासमोर दिसतोय!”

    ” अरे बाबा, मी निमित्त आहे. त्या देवानेच हे घडवून आणलं…”

    “दादा, तुमीच आमचे देव!” शामरावचे वडील म्हणाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. “दादा समद्या नातेवाईकाकडे भीक मागत फिरलो. एकानेबी एक रुपया काढून देला न्हाई… आणि तुमी ना आमच्या जातीचे ना पातीचे, ना नात्यातले ना गोत्यातले, आम्हाले ओळखतबी न्हाई तरी तुम्ही दीड लाख काढून दिले. मंग सांगा तुमी देव नाही तर काय आमचे. सुनबाई पाया पड, या दादांच्या. त्यांच्यामुळे तुह्यं कुकू साबुत हाये…”

    शामरावाची बायको पाया पडायला लागली, तसा सुबोध एकदम बाजूला होत म्हणाला, “अहो, नको नको. शामरावांची काळजी घ्या. नवीन जन्म मिळालाय त्यांना!”

    “डाँक्टरसाहेब तुमचे पैसे व्याजासहीत आम्ही लवकरच परत करू,” शामरावचा भाऊ म्हणाला.

    “अरे, व्याज कमावण्यासाठी थोडीच मी तुम्हाला पैसे दिले आणि मला काही घाई नाही. तुमच्या फुरसतीने पैसे परत करा. शामरावांना चांगलं ठणठणीत बरं होऊ द्या, मग परत करा. ओके? बरं मी निघू? काळजी घ्या.”

    त्या सर्वांना नमस्कार करुन सुबोध बाहेर पडला. मगाशी, “पैसे परत केले नाही तरी हरकत नाही,” हे ओठावर आलेलं वाक्य बोललो नाही, याबद्दल त्याने देवाचे आभार मानले.

    सहा-सात महिने झाले तरी शामरावच्या भावाचा फोन आला नाही, तेव्हा सुबोधच्या लक्षात आलं की, ही उधारीही आपली बुडाली आहे. त्याच्याकडे शामरावच्या भावाचा फोन नंबर होता, पण का कुणास ठाऊक त्याला फोन लावून पैसे मागायला त्याचं मन धजावेना. शामराव शेतकरी होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या तो वर्तमानपत्रात वाचत होताच. आपण पैशासाठी तगादा लावावा आणि शामरावाने त्या काळजीपोटी आत्महत्या केली तर? त्या विचाराने तो शहारायचा… ‘जाऊ दे. देतील तेव्हा देतील. नाही दिले तर नेहमीप्रमाणे बुडाले, असं समजू,’ या विचाराने तो चूप बसला.

    एक दिवस तो सकाळी क्लिनीकमध्ये येऊन बसला. नेहमीप्रमाणेच पेशंटनी दवाखाना तुडूंब भरला होता. देवाच्या फोटोची पूजा करून पहिल्या पेशंटला तो आत बोलावणार तेवढ्यात रिसेप्शनिस्ट दरवाजा ढकलून आत आली.

    “सर, ते सोयगाव बुद्रुकची माणसं आलीयत. तुम्हाला फक्त भेटायचं म्हणताहेत…”

    “सोयगाव बुद्रूक?” त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडेना!

     “काय नाव त्यांचं?”

    “शामराव पाटील…”

    एकदम त्याच्या लक्षात आलं… “ओके, ओके, पाठव त्यांना.”

    शामराव आणि त्याचे वडील आत आले, “नमस्कार डाँक्टर साहेब…” शामराव हात जोडून म्हणाला.

    “या… या… नमस्कार. अरे वा, ठणठणीत बरे झालेले दिसताय!”

    “साहेब, सगळी तुमची कृपा आहे,” सुबोधचे हात हातात घेत शामराव म्हणाला. सुबोध हसला. न बोलता त्याने देवाच्या फोटोकडे हात केला आणि हात जोडले.

    “कर्ता-करविता तो आहे…” त्याने असं म्हंटल्यावर त्या दोघांनीही देवाला हात जोडले.

    ” बोला. सगळं ठीक आहे ना?”

    “दादा, तुमचे पैसे द्यायला आलतो…” म्हातारा म्हणाला आणि त्याने शामरावाला इशारा केला. तसं शामरावाने खिशातून पैसे काढून टेबलवर ठेवले. सुबोध डोळे विस्फारुन त्या पैशांकडे बघत राहिला. आजपर्यंत त्याने अनेक जणांना त्यांच्या संकटसमयी पैशाची मदत केली होती. पण अनेक वेळा मागूनही कुणीही त्याला इमानदारीने पैसे आणून दिले नव्हते. किंबहुना परतच केले नव्हते. काम झालं की, लोक उपकार विसरतात, हेच तो आजपर्यंत पाहात आला होता. याला म्हणतात उपकाराची खरी जाण…

    ” मोजून घ्या डाँक्टरसाहेब. पूर्ण दीड लाख आहेत.”

    ” राहू द्या. तुमच्यावर विश्वास आहे माझा. खूप खूप धन्यवाद…” असं म्हणत सुबोधने ते पैसे ड्रॉवरमध्ये टाकले.

    “चला येऊ दादा?” म्हातारा हात जोडत म्हणाला

    “अहो थांबा. चहा घेऊन जा”

    सुबोधने रिसेप्शनिस्टला बोलावून तीन चहा पाठवायला सांगितलं.

    “काय म्हणतं यंदाच पीकपाणी? चांगलं उत्पादन झालेलं दिसतंय…”

    सुबोधने असं म्हणताच दोघांचे चेहरे काळवंडले.

    “साहेब शेतकऱ्याचं नशीब इतकं कुठं चांगलं आहे? तीन वर्षांत झालं नाही, असं जोरदार पीक यंदा झालं होतं. पण कापणीला आलेलं सगळं पीक अवकाळी पावसानं खराब करून टाकलं,” शामराव म्हणाला. सुबोधने पाहिलं म्हातारा उपरण्याने भरून आलेले डोळे पुसत होता.

    “अरे बापरे! बरोबर… पंधरा दिवसांपूर्वी तीन-चार दिवस पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. आता हे काय पावसाचे दिवस आहेत?”

    मग अचानक काहीतरी सुचून त्याने विचारलं, “हंगाम पूर्ण वाया गेला म्हणताय मग हे पैसे कुठून आणलेत? सावकाराकडून?”

    दोघा बापलेकांनी एकमेकांकडे पाहिलं… काहीतरी नजरांनी इशारे केले.

    “नाही साहेब. तुम्ही… तुम्ही काही बोलू नका. मी काही सांगणार नाही…” शामराव गडबडीने म्हणाला.

    “अहो सांगा ना! मी तुमच्या घरचाच आहे, असं समजा. सांगा, सांगा…”

    शामराव चूप बसला. पण म्हातारा बोलू लागला,

    “दादा नातीच्या लग्नासाठी पै-पै करून साठवले होते पैसे. शाम्याचा ॲक्सिडंट झाला. लई पैसे त्यात खर्च झाले. आधीच बँकेचं कर्ज. सावकारही समोर उभा करेना. शेतीचा तुकडा विकला तवा दवाखान्याचे पैसे भरता आले. पण काई घोर नव्हता. पीक पाणी उत्तम होतं. त्याचा पैसा आला की, नातीचं लग्न उरकवून टाकू, असं ठरवलं होतं. पण पावसाने समदं शेत उजाडून टाकलं. तुमचे पैसे तर द्यायचे होते. म्या म्हनलं नातीचं लग्न पुढे ढकलू, पण डाँक्टर साहेबांचे पैसे द्यावेच लागतीन…”

    सुबोधला धक्का बसला. त्याचे वडीलही शेतकरीच होते. त्यांचे शेतीसाठी झालेले हाल त्याला आठवले…

    “मग आता कधी होईल तिचं लग्न? आणि त्यासाठी कुठून आणणार पैसे?”

    दोघा बाप-लेकांनी परत एकदा एकमेकांकडे पाहिलं. मग शामराव म्हणाला, “बघू साहेब. पुढच्या वर्षी करू तिचं लग्न!”

    “मुलाकडचे तयार आहेत का?”

    “नाही तयार झाले तर सोडून देऊ हे स्थळ. दुसरा मुलगा पाहू…” शामराव हे म्हंटला खरा पण त्याचे भरून आलेले डोळे सुबोधच्या नजरेतून सुटले नाहीत. त्याने क्षणभर विचार केला आणि ड्रॉवरमधून दीड लाख काढून शामरावसमोर ठेवले.

    “हे घ्या शामराव. मुलीचं लग्न पुढे ढकलू नका…”

    दोघंही एकदम गडबडले. शामराव उठून उभा राहीला. त्याने ते पैसे उचलून सुबोधच्या हातात कोंबले.

    “नाही साहेब. याकरिताच मी तुम्हाला काही सांगत नव्हतो. पण आमच्या बाबांना काही राहावलं गेलं नाही… हे पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. शपथ आहे तुम्हाला आणि आम्ही आता निघतो…”

    दोघंही जायला लागले, तसं सुबोधने शामरावचा हात धरून त्याला खाली बसवलं.

    “शामराव ऐका माझं. तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी. माझ्या मुलीचं लग्न असं लांबणीवर टाकलेलं मला आवडणार नाही. हे पैसे ठेवा. मला पुढच्या वर्षी द्या. दोन वर्षांनी द्या. मी कुठे आताच मागतोय पैसे?”

    हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!

    “नाही दादा. शेतीचा काय भरवसा… दोन-तीन वर्षं तुमचे पैसे देणं जमलं नाही तर आमाले घास गिळवणार नाही. तुम्हाले हे पैसे ठेवणंच पडीन,” म्हातारा म्हणाला.

    “ठीक आहे. नका देऊ मला पैसे!” सुबोध एकदम बोलून गेला, “मला गरज नाही या पैशांची. देवकृपेने माझ्याकडे भरपूर आहे.”

    दोघा बापलेकांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग दोघांचे चेहरे नाराजीने भरून गेले.

    “डॉक्टर साहेब तुम्ही मला जीवन दिलं. तुमच्याकडूनच पैसे घ्यायचं पाप मी कसं करू?”

    “शामराव, हे पैसे मी तुम्हाला देतच नाहिये. माझ्या मुलीला देतोय…” त्याच्या हातात पैसे कोंबत सुबोध म्हणाला. हातातले पैसे शामराव बघत राहिला आणि मग एकदम बांध फुटल्यासारखा ढसाढसा रडू लागला. सुबोध खुर्चीतून उठून पुढे आला. शामरावला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर थोपटत राहिला.

    चहा आला. तो पिऊन दोघांनी त्याला नमस्कार केला आणि निघाले.

    “साहेब, मुलीच्या लग्नाला या बरं. मी लवकरच पत्रिका घेऊन येतो आणि तुम्ही आशीर्वाद दिल्याशिवाय मी तिला सासरी पाठवणार नाही. तेव्हा जरूर जरूर या…”

    दोघं गेले. सुबोध परत आपल्या खुर्चीत बसून विचार करू लागला. ज्योतिषी म्हणाला होता ते परत एकदा खरं ठरलं होतं. त्याची उधारी परत एकदा बुडीत खात्यात गेली होती. पण यावेळी ती बुडायला तो स्वतःच जबाबदार होता. पण गंमत अशी होती की, यावेळी त्याची त्याला ना खंत होती ना राग! उलट समाधानाने त्याचं मन भरून आलं होतं.

    समाप्त


    मोबाइल – 9209763049

    (ही कथा माझ्या ‘गिफ्ट-भेट ह्रदयस्पर्शी कथांची’ या पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.