सर्दी झालेलं एक बच्चू आपल्या पालकांसह ओपीडीत आलं होतं. त्याला तपासताना मला अचानक शिंक आली आणि मी भिंतीकडं तोंड करत तोंडावर एल्बो ठेऊन सलग तीनदा शिंकलो…
“डॅाक्टर, आता तुम्ही कुणाकडून औषध घेणार?” पोट्ट्यानं अचानकच खट्याळपणे प्रश्न केला.
“कुणाकडून कशाला माझं मीच घेईन की!” मीही चटकन उत्तर दिलं… त्यावर हातानं ‘सुई’ दाखवत “टुच्चूपण तुमचं तुम्हीच घ्याल का?” त्यानं चटकन हसत प्रतिप्रश्न केला… पण यावेळी त्याची आई त्याला रागावली.
मी औषध देऊन त्याला रवाना केलं खरं, तरी “खरोखरच टुच्चू घ्यायची वेळ आली तर?” या प्रश्नानं डोकं क्षणभर भंजाळलं, पण “देईल की कुणीही असिस्टंट, ब्रदर वगैरे… त्यात काय?” हे उत्तरही आपसुकच गवसलं; पण या सगळ्यात मला अचानक डॉक्टर रोगोजोव्हची आठवण आली.
साल 1961 असावं. स्थळ होतं थेट दक्षिण ध्रुवावरील नोव्होलाझारेव्हस्काया हे सोव्हिएत संशोधन केंद्र… बाहेर प्रचंड बर्फ पडला होता. सूर्य जणू कायमचा रजेवर गेल्यागत परिस्थिती होती आणि वाऱ्याचा वेग इतका की, घराबाहेर निघालेला माणूस कधीही उडून जावा…
या तळावर केवळ बाराच जण शिल्लक होते आणि त्यांच्यातही एकच डॉक्टर होता; 27 वर्षीय डॉ. लिओनिद रोगोजोव्ह!
एका अतिशय थंडगार सकाळी डॉक्टर स्वतःच पांढर्या पडलेल्या चेहऱ्यानं जागा झाला, त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होत होत्या, भयंकर मळमळत होतं, अंगात खूप ताप भरला होता आणि हालचाल अक्षरश: अशक्य झाली होती… लक्षणं स्पष्ट होती आंत्रपृच्छशोथ अर्थातच ॲपेंडिसायटिस! सामान्य लोकांच्या भाषेत ॲपेडिक्सचं दुखणं… पण इथं दक्षिण ध्रुवावर दुसरा कुणी डॉक्टर नव्हता… बाहेर जोरदार चक्रीवादळ सुरू होतं आणि कुठूनही बचावपथक येणं निव्वळ अशक्य होतं. या वातावरणात विमान काय, हेलिकॅाप्टरही तळावर उतरणं शक्य नव्हतं… इथं उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर होता आणि तोच पेशंटही होता..
हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!
स्थिती प्रचंड गंभीर होत होती. ॲपेंडिक्स जागेवर फुटलं तर मृत्यू निश्चित होता! संपूर्ण टीम त्याच्याकडं असहाय्य नजरेनं पाहात होती अन् तेव्हाच रोगोजोव्ह हळूच पुटपूटला, “बहुतेक मला स्वतःवरच शस्त्रक्रिया करावी लागेल. जीव वाचवण्याचा दुसरा मार्ग नाही.”
सर्व जण अवाक् होऊन जागीच थिजले!
खुर्च्या, टेबलं, दिवे… तळावर जे मिळेल ते वापरून एक तात्पुरतं शस्रक्रियागृह अर्थात ऑपरेशन थिएटर तयार झालं. एक अभियंता आणि एक हवामानतज्ज्ञ दोघं जण ओटी असिस्टंट अर्थात सहाय्यक बनले, ज्यांना शस्त्रक्रियेची मुळाक्षरंही माहीत नव्हती… पण त्यांचं काम होतं साधनं हातात देणं, धागा धरून ठेवणं, दिवा लावून देणं…
डॉ. रोगोजोव्हनं स्वतःच पोटावर जंतुनाशक लावलं आणि मग स्थानिक भूल देऊन स्वतःचं पोट सुरीनं चिरलं… आरशात बघत तो स्वतःच पोटाचे स्नायू बाजूला करत होता. कधी उलटीची भावना होती तर, कधी आत्यंतिक वेदना… मधेच दृश्य धूसर होत होतं तर, मधेच अचानक मूर्च्छित झाल्यासारखं वाटत होतं; स्वतःला सावरत, जागं ठेवत… “आता थांबलो तर मरेन, काम पूर्ण करायलाच हवं,” असं बजावत काम सुरू ठेवलं!
हेही वाचा – कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी
सरतेशेवटी एकदाचा त्याला सुजलेलं ॲपेंडिक्स दिसलं आणि त्यानं ते झटकन कापून बाहेर काढलं अन् कशीबशी जखम शिवली… शेवटचा टाका झाला आणि थकव्यानं बसल्या जागी तो कोसळला…
पुढच्या केवळ पंधरा दिवसांत तो तळावरच्या लोकांच्या सेवेसाठी पुन्हा तंदुरुस्त झाला, अगदी एखाद्या देवदूतासारखा!
आजही वैद्यकीय इतिहासात ही शस्त्रक्रिया सर्वात साहसी आणि अविश्वसनीय शस्त्रक्रिया म्हणून ओळखली जाते!


