Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeललितभौतिकशास्त्राचे नियम एकाच उडीत लोळवले

भौतिकशास्त्राचे नियम एकाच उडीत लोळवले

दिप्ती चौधरी

दनू इतका बिथरला होता की, मी जवळ गेल्यावर दूर जायचा… मग मला राग यायचा आणि मी मारामारी सुरू करायचो. तो अजूनच घाबरायचा. आईचा धीर सुटला आणि तिने आम्हाला वठणीवर आणण्यासाठी एका cat behavioristला पाचारण केले. तिने सुद्धा साधारणपणे त्याच पायऱ्या सांगितल्या. पण त्याव्यतिरिक्त तिने काही अजून गोष्टी सुचवल्या –

  1. मांजरांना घरात फिरताना… एकाहून जास्त मांजरे असताना, विशेषतः भिंतीवर cat हायवे तयार करावे, म्हणजे भांडण होत असेल तर पळून जायला मदत आणि वावरताना समोरासमोर येण्याची शक्यता कमी. कॅट हायवे म्हणजे भिंतीवर फळ्या मारून वर-खाली किंवा भिंतीवर आडवे जाता येईल, अशी रचना करावी.
  2. बहुदा घराचे कोपरे हे कोंडीत पकडण्यासाठी एकदम सोपे असतात. त्यामुळे मार खाणारी माऊ तिथेच सहज पकडली जाते तिथे cat tree, किंवा लपण्याजोगे, उडी मारून सटकण्यासारखे टेबल ठेवावे.
  3. बाहेर जर भटक्या माऊचा वास राहिला असेल तर, खिडकीखाली उग्र वासाचे साबण पाणी टाकून धुवून टाका.
  4. जिना बंद केला तर दनू वरच्या मजल्यावर तरी फिरू शकेल आणि थोडा खोलीबाहेर येईल आणि मग हळूहळू दोघे एका खोलीत फिरू शकतील.
  5. पीदू भलताच हुशार आहे त्याला मी आठवड्यात एकदा येऊन कुत्र्यासारख्या युक्त्या शिकवीन, त्याबद्दल मी तासाप्रमाणे पैसे चार्ज करेन!

हेही वाचा – अचानक माझं वागणंच बदललं…

एकंदरच या बयेने काहीही विशेष मदत न करता तासाच्या हिशोबाने बरेच पैसे, या फेरीचेही उकळले होते… ‘अजून पिदूला कुत्रा करून सोडायची काही गरज नाही,’ असे सांगून तिला आईने परत पाठवले.

पण जिना बंद करून दनूसाठी वरचा मजला वेगळा करायचे ठरवले. लगेच संध्याकाळी आई, पप्पा आणि दिदी कामाला लागले. मोठे पुठ्ठ्याचे खोके कापून काढले. खालून जाणारा जिना वरती पोहोचला की, त्याच्या बाजूने आडव्या L आकारात लाकडी खांब असलेला मोकळा सज्जा होता, त्या कठड्यावर चालणे, तिकडून तिरकी ये-जा करणे हा आमचा खेळ होता, त्यामुळे जिन्याचे तोंड तर पक्का बंदोबस्त करून बंद केले आणि जिन्याला लागून असलेल्या कठड्याच्या लाकडी खांबामधील रिकामी जागा सुद्धा पुठ्ठ्याने बंद केली. आमच्यासाठी आणलेल्या लाकडी चौकटीच्या लोखंडी जाळीने जिन्याच्या तोंडाशी दार केले. त्याची उंची थोडी कमी वाटल्याने पुठ्ठे चिकटवून उंच केले. जिन्याचा कठडा, जिथे सज्जाच्या कठड्याला काटकोनात मिळतो, तिथेही दोन्ही कठड्याखालील लाकडी खांबामधील जागा बंद केली आणि थोडी उंची वाढवली.

जिन्याचा दरवाजा कडेकोट वाटत असला तरी, तो सज्ज्याचा काटकोन थोडा अजून उंच केला पाहिजे, असे आईला वाटत होते. तीन तास घाम गाळून, घरातील सगळी सेलोटेप, दोऱ्या, पुठ्ठे, तारा आणि मिळेल ती सामग्री संपवून सगळे जण दमले होते. त्यामुळे पप्पांनी आईला ऐकवले की, पिदू इतकी उंच तिरकी उडी मारू शकणार नाही, भौतिकशास्त्राचे काही नियम असतात!

हेही वाचा – आता तर दिदीने फतवा काढला…

इकडे सगळे बंद केल्याने दनूही थोडा फुशारला आणि बाहेर येऊन फिरत होता. हा पूर्ण वेळ मी शांतपणे खालच्या खिडकीच्या कठड्यावर लोळत, चारही तंगड्या वर करून, उलटा होऊन यांच्या कारभाराचे निरीक्षण करत होतो. जसे यांचे आटपत आले आणि कचरा उचलून हे निघाले मी खालून वर पाहणी करण्यासाठी निघालो…

अर्ध्या जिन्यात आम्ही एकमेकांना ओलांडले…

आपल्या तीन तासांच्या मेहनतीचा बंदोबस्त एकदम चोख असल्याची खात्री असल्याने हे तिघेही माझ्याकडे लक्ष न देता खाली निघाले… ते शेवटच्या पायरीपर्यंतही पोहोचले नव्हते आणि…

धाऽऽऽडकन् आवाज आला….

सज्जावरची तटबंदी आणि भौतिकशास्त्राचे नियम हे दोन्ही एकाच उडीत लोळवले, एवढेच नव्हे तर, मी दनूचे मानगूट पकडून त्यालाही लोळवले होते…


क्रमशः

(पिदू या बोक्याची आत्मकथा)

diptichaudhari12@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!