आराधना जोशी
साहित्य
विशेष आहार माहिती : शाकाहारी
पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी
- सुक्या लाल मिरच्या – 12 ते 15 (कमी तिखट खाणाऱ्यांनी मिरच्या अजून कमी केल्या तरी चालतील)
- सालं काढलेल्या लसूण पाकळ्या – 15 ते 20 (पाकळीच्या आकारानुसार घ्या)
- जिरे – दीड टीस्पून
- तेल – फोडणी पुरते (साधारणपणे 1 टेबलस्पून)
- मीठ – चवीनुसार
- पाणी – अर्धा ते पाऊण लीटर
तयारीस लागणारा वेळ :
- लसूण पाकळ्या सोलून ठेचून घेण्यासाठी – 5 मिनिटे
- सुक्या मिरचीचे तुकडे करून त्यातील बिया बाजूला करण्यासाठी – 5 मिनिटे
- एकूण वेळ – 10 मिनिटे
हेही वाचा – Recipe : देवीसाठी त्रयोदशगुणी विडा (तांबूल)
कृती
- कढईमध्ये तेल गरम करून घ्या. मग त्यात जिरे घाला.
- जिरे तडतडले की त्यात ठेचलेला लसूण घाला.
- लसणाचा रंग किंचित बदलेपर्यंत तो तेलात परतून घ्या. म्हणजे लसणाचा कच्चा वास जाईल.
- आता यात लाल सुक्या मिरचीचे बिया काढलेले तुकडे टाका आणि जरा परतून घ्या.
- मिरची फोडणीत चांगली परतून झाली की, कढईत अर्धा लीटर पाणी घाला.
- पाण्याला एक उकळी आली की, त्यात चवीनुसार मीठ घालावे.
- एखादे मिनिट पाणी उकळवून गॅस बंद करावा.
- खुड मिरचीचे पाणी तयार आहे.
टीप
- या पाण्यात बाजरी किंवा ज्वारीची भाकरी चुरून किंवा खानदेशी खिचडीसोबत खाऊ शकता.
- घरात एखादेवेळी भाजी नसली तर खानदेशात अनेकदा हे पाणी केले जाते. काही ठिकाणी याला मिरचीचे सार असेही म्हणतात.
- काही ठिकाणी फोडणीत हिंग, मेथी दाणे आणि हळदही घातली जाते. मेथी दाण्याची पावडर घातली तरी चालेल किंवा लसूण, जिरे आणि 8 ते 10 मेथी दाणे असे एकत्र खलबत्त्यात कुटून ते फोडणीत घातलं तरी चालेल.
- चवीत थोडा बदल हवा असेल तर, आवडीनुसार लिंबाचा रस या पाण्यात घालतात. याने मिरचीचा तिखटपणाही कमी होतो.
हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.



