अस्मिता हवालदार
व्यंकटेश माडगूळकर यांची अनेक पुस्तके, कथासंग्रह, ललितलेखन, कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ‘करुणाष्टक’ हे त्यांच्या आईचं चरित्र आहे. त्यांच्या कुटुंबाची कथा यात असली तरी सहा मुलगे आणि दोन मुलींच्या आईभोवतीच कथानक गुंफले आहे. आठ मुलांना वाढवणाऱ्या आईची ही कथा वाचताना अनेकदा डोळे पाणावतात. समर्थ रामदासांनी ‘करुणाष्टका’तून श्रीरामांची आर्त आळवणी केली आहे. ‘तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता’ असे म्हणून रामाची प्रार्थना केली आहे. असाच धावा आईने मुले वाढवताना अनेकदा केला आहे. या पुस्तकात आलेला काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. भारताचे स्वातंत्र्य, गांधीहत्या हे प्रसंग यात येतात. पुस्तकातली रेखाटणे स्वतः लेखकाने केली आहेत. अत्यल्प रेषांतून काढलेल्या अर्थगर्भ आकृती, आपल्या मनात व्यक्तिरेखा स्पष्ट करतात.
माहेरी संपन्नता पाहिलेली आई विवाह करून सासरी आली, त्यावेळी सासरही खाऊन-पिऊन सुखी होते. सासरे कर्तृत्ववान होते. नंतर पतीच्या नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागले. सासरे गेल्यावर लक्ष्मीने पाठ फिरवली. आर्थिक ओढाताण सुरू झाली.
वडिलांना जेलरच्या पदावर बढती मिळाली, पण त्यांच्या साध्या स्वभावामुळे ते पद त्यांना झेपले नाही आणि त्यांनी सरकारला विनंती करून पुन्हा कारकुनाचे पद मागितले. यावर आई एवढेच म्हणाली, माझ्या नशिबी लक्ष्मी नाही.
प्लेगची साथ आल्यावर रानात झोपडे बांधून राहायची वेळ आली. प्रशस्त झोपडी बांधण्याइतका पैसा नसल्याने लहानशी झोपडी बांधावी लागली. लेखकाची शाळा सुरू नसल्याने रानोमाळ भटकण्याची संधी मिळाली. त्यांनी निसर्गावर, प्राण्यांवर जी पुस्तके लिहिली आहेत, त्याचे मूळ इथे असू शकते. या पुस्तकातही सतत निसर्गाचे वर्णन येत राहते. उदा. मलूल झालेले आकाश, सुतक पाळणारा वारा…
प्लेग संपल्यावर मिळालेल्या घरात आई खूश होती, कारण पहिल्या घरासारखी इथे नागाची, भूतांची भीती नव्हती… शेजार होता. मोठा भाऊ शिकायला बाहेर पडला तेव्हा आई म्हणाली, “लहान भावंडाना गरिबीच्या गाळातून बाहेर काढ. तुझ्यावर मोठे ओझे आहे.” आईने अविवाहित काकांच्या बरोबर दुसऱ्या मुलाची पाठवणी केली आणि म्हणाली की, तुम्हाला सोबत होईल आणि माझा भार हलका होईल. आता घरात लेखक आणि एक भाऊ उरले. आईने मुलांची इतकी दुखणी काढली जितकी क्वचित कुणी काढली असतील, असे लेखक म्हणतो. धाकट्या भावाच्या डोक्यात झालेल्या कृमी रात्ररात्र बसून वेचणाऱ्या आईचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते.
“माझ्या आईचा जीवनप्रवास हा परिस्थितीच्या वाळवंटातून केलेला खडतर आणि लांबलचक प्रवास आहे. त्यात डोक्यावर आग ओतणारा सूर्य आहे. अचानक आडवं येऊन मार्ग खुंटविणारी वाळूची टेकाडं आहेत. धुळीची वादळं आहेत. तहानतहान आहे. हिरवळ आहे आणि पाणी आहे. पुष्कळ काहीबाही आहे…’’ अशा शब्दांत लेखकाने या कथनाचे सार सांगितले आहे.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
आजीचा मृत्यू आणि बहिणीच्या वेळचे आईचे गर्भारपण याबद्दल लेखक म्हणतो, एक जीर्ण पान गळून पडलं, एक नवा कोंब तत्काळ फुटला. जीवनाचा हा महानद केवढा विशाल आणि कसा घोंघावत वाहात असतो. एकदा ते विहिरीत पडले असताना त्यांना आई आठवली. आई असती तर, तिने उडी मारली असती आणि घोरपडीसारखी विहिरीच्या भिंतीना चिकटून वर चढून गेली असती… इतका विश्वास त्यांना तिच्या प्रेमावर होता.
साखरगडच्या वाड्यात या कुटुंबाने चांगले दिवस पाहिले. देवीचे पन्ना रत्न शोधून देणारा लखोबा लक्षात राहतो तसेच मोठा भाऊ मॅट्रिकला नापास झाल्यावर आई त्याला नाही नाही ते बोलली आणि तो कायमचा घर सोडून गेला हेही! धाकट्या दीराचं लग्न करून देऊन जबाबदारी पूर्ण केली. नंतर गांधी हत्येनंतर गावकऱ्यांनीच त्यांचं घर जाळलं. तेव्हा माणसाच्या खऱ्या रूपाच दर्शन झालं. जमाव हा रामायणातल्या कबंध राक्षसासारखा असतो. डोकं नाही, छातीवर डोळा – तोही एकच… पाय नाहीत. दोन्ही हात मात्र सहस्र योजनं पोहोचू शकतील असे लांब… अशा शब्दांत या प्रसंगाचं वर्णन केलं आहे.
वडील खचून गेले, पण आईने शून्यातून पुन्हा संसार उभा केला. तिला पहिल्या घराची आठवण यायची. लेखक लिहितात – तीळाभोवती साखरेचे कण जमा होऊन काटेरी हलवा होतो तसे घराच्या आठवणींचे आणि घराचे असते… आईचे सासरे नास्तिक होते, कर्मकांडांवर विश्वास नव्हता. देवीसाठी कर्मकांड फार होऊ लागली, तेव्हा त्यांनी तिला विहिरीत विसर्जित केली. त्या काळाचा विचार करता हे फार धाडसाचं कृत्य वाटतं.
आईने आठ भावंडांची चिंता सतत वाहिली. अनेक भोग भोगले. स्वभावाने गरीब असलेल्या मोठ्या मुलीला क्रूरतेने छळणारे सासर, तिच्या पतीच्या मृत्यूपश्चात तिला करायला लागलेला सहा मुलांचा सांभाळ, धाकट्या मुलीच्या लग्नात आलेल्या अडचणी, तिचे अपत्यविहीन असणे, नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर नैराश्यग्रस्त झालेली ती, तिने केलेली आत्महत्या… लेखकाने संयत भाषेत लिहिले आहे.
मोठे भाऊ म्हणजे ग. दि. माडगुळकर यांचे नाव त्यांनी लिहिले नाही; पण वाचताना सहज समजून येते. त्यांच्यावर असलेले लेखकाचे प्रेम आणि गदिमांचे कुटुंबावरचे प्रेम फार सुंदर व्यक्त केले आहे. आईच्या एका मुलाचा दीड वर्षांचा असताना झालेला मृत्यू चटका लावतो. एका मुलाच्या शिक्षणासाठी तिचे स्त्रीधन असलेले घर ती विकते. एका मुलाच्या शेतीसाठी स्वतःची शेती मनावर दगड ठेवून विकते. शेवटचे आठ हजार रुपये त्याच्याच अडीअडचणीला खर्च झाल्यावर ती हळहळते… म्हणते, आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुद्धा मुलांपुढे हात पसरावे लागतील. आदर्श माता पुरस्कार घेण्यासाठी ती व्यासपीठावर बसलेली असताना मोठ्या मुलाच्या मृत्यूची बातमी येते आणि पुरस्कार न घेताच उतरावे लागले. आईचे दुःख कुठेही बटबटीत होऊ न देता समर्पक शब्दात लिहिले आहे. कमी शब्दात सोप्या भाषेत प्रसंगाचे सार्थ वर्णन करणे, ही लेखकाची शैली आहे. आई गेल्यावर धावपळ करून सुद्धा अंतिम दर्शन झाले नाही, याची बोच त्यांनी व्यक्त केली आहे. आई गेल्यावर कुटुंबाचे बंध सैल होतील, असे वाटून लेखक लिहितात, ‘बांधल्या पेंढीचा आळा आता सुटला आहे.’
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
आई गेल्यावर माणसाचं बरंच काही जातं…, इतक्या मोजक्या शब्दात त्यांनी कथन संपवले आहे. आपल्या मनात हे वाक्य रेंगाळत राहते. राख चावडताना मिळालेला अस्थीचा तुकडा आणि काचेच्या लाल बांगडीचा तुकडा एवढेच शिल्लक राहते.
‘चक्रवत परिवर्तन्ते सुखानि च दुखानि च’
आयुष्य असेच आहे. आईवर कितीतरी लेखन आजवर झाले आहे, पण हे प्रांजळ, समर्थ लेखन वेगळेपणामुळे भावनिक आव्हान देऊन हळवे करते.