Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeअवांतरबरसणारा पाऊस अन् सहलीचा चिंब आनंद

बरसणारा पाऊस अन् सहलीचा चिंब आनंद

यश:श्री

मे महिना अर्धा सरल्यावर सर्वांनाच पावसाचे वेध लागतात अन् हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचे समजल्यावर पावसाचे तुषार अंगावर उडाल्यासारखे वाटते. यावर्षी पावसाचं आगमन लवकरच झालंय. उन्हाचा चटका वाढलेला असतानाच बरसणाऱ्या थेंबानं एक आल्हाददायक अनुभव सर्वांना दिला. तसं पाहिलं तर पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? आकाशात काळे ढग जमले आणि गार वारे वाहू लागले की, सर्व ताणतणाव क्षणात निघून जातात. आता जलधारा कोसळणार आणि मन मोहून टाकणारा मातीचा सुगंध सर्वत्र दरवळणार… अशा वेळी आठवते कविवर्य बा. भ. बोरकर यांची कविता –

टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले

हाच मातीचा सुगंध घेण्यासाठी मन आतुर होते… पावसाचा शिडकावा मन प्रफुल्लित करतो. नेहमीचे धकाधकीचे आयुष्य तसेच एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या तळपत्या उन्हामुळे हा शिडकावा मनही शांत करतो.

शाळा कॉलेजच्या उन्हाळी सुट्टीत लांब कुठेतरी जाण्याचे बेत आखले जातात, तर सुखद गारव्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांत पर्यटनस्थळे फुल्ल होतात. पण निसर्गप्रेमी मात्र पावसाळ्याची वाट पाहत असतात. पावसाळ्याला बऱ्यापैकी सुरुवात झाली की, हे निसर्गप्रेमी, काही अधूनमधून आवडीने सहलीला जाणारे तसेच खास पावसात भिजायला जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचे एक वाक्य आठवते, पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी, प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. (‘फॅण्टसी एक प्रेयसी’)

हेही वाचा – भीक आणि भिकारी

पावसाळ्यात डोंगरकपारींनी पांघरलेली हिरवीगार शाल, मधूनच अवखळत खाली कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी अन् त्यात डुंबण्यासाठी वर्षासहलींचे नियोजन केले जाते. कधी घरच्यांबरोबर किंवा नातेवाईकांसोबत, तर कधी शाळा, कॉलेज, ऑफिसच्या ग्रुपसोबत सहलींचा बेत आखला जातो. विशेषत:, श्रावण महिना सहलीसाठी निश्चित केला जातो. ऊन पावसाचा सुरू असलेला खेळ अन् हिरवाईने नटलेला निसर्ग पाहून मन हरखून जाते. श्रावणातल्या सणावारांच्या निमित्ताने असलेल्या सुट्ट्या किंवा अशा सुट्ट्या लागून आलेला वीक-एंड म्हणजे सोने पे सुहागा! अशा वेळी बालकवींची कविता आठवते –

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे…

माथेरान, पळसदरी, चिंचोटी, वज्रेश्वरी, गोराई, अर्नाळा, अलिबाग, लोणावळा, खंडाळा, खोपोली-कर्जतमधील सोलानपाडा, पाली भूतीवली आणि आषाणे डॅम, पुण्याचा बुशी डॅम अशी अनेक ठिकाणं, ज्ञात आणि अज्ञात, येत्या महिन्याभरात गर्दीने फुलून जातील. अलीकडच्या काळात कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्याबरोबरच ते फोटो काढून सोशल मीडियावर अपलोडही केले जातात.

हिरवाई पांघरलेले निसर्गाचे रूप एवढे विलोभनीय असते की, फोटोमध्ये ते पाहणाऱ्याला खुणावते. दरवर्षी नियमितपणे वर्षासहलीला जाणारे काही ग्रुप नवनवीन ठिकाणांच्या शोधात असतात. काही ग्रुप नियमितपणे एकाच ठिकाणी दरवर्षी वर्षासहलीला जातात. पण नंतर तिथे गर्दी वाढत गेल्यावर जागा बदलली जाते. काही हौशी ग्रुप इंटरनेटवर नवनवीन ठिकाणे शोधतात… मग नवे ठिकाण, नवा जल्लोष…!

गेल्या काही वर्षांत वॉटरफॉल रॅपलिंग आणि फ्लाइंग फॉक्स वॉटरफॉल रॅपलिंग हे प्रकार लोकप्रिय झाले आहेत. गिर्यारोहणाचा रोप आणि हानेंस यांच्या साहाय्याने रॅपलिंगच्या तंत्राचा वापर करून धबधब्याच्या प्रवाहातून खाली उतरणे म्हणजे वॉटरफॉल रॅपलिंग, आयोजन अनेक धबधब्यांवर केले जाते. रॅपलिंग करताना धबधब्याच्या पूर्ण खाली उतरणे शक्य नसल्यास फ्लाइंग फॉक्स हे रॅपलिंग आणि व्हॅली क्रॉसिंग यांचा मेळ असलेले तंत्र वापरले जाते. त्यानुसार, काही अंतर रॅपलिंग केल्यानंतर तिरके जाऊन धबधब्याच्या बाहेर उतरले जाते.

पण या ऋतुचक्रात सहभागी होत आणि निसर्गाच्या सान्निध्यात आनंदोत्सव साजरा करताना, काही गोष्टींचे भान हे पाळावेच लागते. वर्षासहलीत चिंब होताना काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यावर एक गोष्ट नजरेस पडते आणि खटकते. ती म्हणजे. निसर्गसौंदर्याचे होणारे विद्रुपीकरण! जल्लोष करताना स्वच्छतेचे भान ठेवले जात नाही, कचरा इतरत्र फेकला जातो. जेवणासाठी नेलेल्या कागदी, प्लास्टीक किंवा थर्माकोलच्या प्लेट आणि ग्लास इतस्ततः फेकल्याचे पाहायला मिळते, असा कचरा गोळा करण्यासाठी जवळ एक पिशवी ठेवणे गरजेचे आहे. पण अनेकदा तसे होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, अशा ठिकाणी जसजशी गर्दी वाढत जाते, तसतशी तिथे दुकाने वाढत जातात आणि खुलेआम लुटमार सुरू होते. अवाच्या सव्वा किमतींमध्ये खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची विक्री होते. एवढेच नव्हे तर, तेथील रिक्षा, काळीपिवळी किंवा इतर खासगी वाहनचालकही या काळात मनमानी भाडे आकारणी करतात.

हेही वाचा – पावसाळ्याची तयारी

गंभीर गोष्ट म्हणजे, अशा ठिकाणी होणाऱ्या दारूपार्ट्या. आता मद्यपान हे स्टेटस झाले आहे. या मद्यपानानंतर घातला जाणारा धिंगाणा हा चिंताजनक आहे. गैरप्रकारांबरोबरच नशेचा अंमल असतानाही, भर पावसात निसरड्या काठावर सेल्फी घेण्याचा वेडेपणा अनेकजण करतात, अन् जीव गमावून बसतात. हे सर्व पाहता, निसर्गाच्या या उदात्त रूपासमोर खुजे होण्यापेक्षा ऋतूबदलाचा मनमुराद आनंद घेऊन, आपल्या रुटीन जीवनातील हे वेगळेपणाचे मोरपिस जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून पुढल्या वर्षी पावसाच्या आगमनाची वर्दी मिळताच, या सर्व सुखद आठवणी मनात रुंजी घालू लागतील आणि पुन्हा नव्या वर्षासहलीचे मनसुबे रचले जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!