Monday, October 27, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकसर्व शिक्षकांची बौद्धिक प्रगती

सर्व शिक्षकांची बौद्धिक प्रगती

डॉ. किशोर महाबळ

प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मदत करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य शिक्षकांनी करावे, अशी अपेक्षा असते. प्रत्येक विद्यार्थी हा क्षमता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता याबाबतीत इतरांपेक्षा पूर्णतः वेगळा असतो, त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विकासात मदत करणे हे एक अत्यंत कठीण कार्य असते. यासाठी सातत्याने ज्ञानसाधना करणे, बौद्धिक क्षमता विकसित करणे हे सर्व शिक्षकांचे प्रधान कर्तव्य असते. या बौद्धिक प्रगतीचेही विविध पैलू असतील, त्या पैलूंचा आता विचार करूया.

आपली बौद्धिक प्रगती व्हावी, अशी इच्छा असणारा शिक्षक, प्राध्यापक हा काय करेल? तो, त्याला अध्यापनासाठी दिलेल्या विषयाचा नेहमीच अभ्यास करेल. वर्गात जेवढे शिकवावे लागते, तेवढेच आपल्याला आले म्हणजे पुरे, असा तो कधीच विचार करणार नाही. उलट, अध्यापनाचा विषय शालेय विद्यार्थ्यांना शिकवायचा असल्याने प्रथम अभ्यासक्रम आणि नेमलेल्या पाठ्यपुस्तकांचे व्यवस्थित वाचन करेल. सर्व धडे नीट समजून घेऊन ते विद्यार्थ्याना कसे समजून सांगायचे, त्यासाठी कोणकोणते शैक्षणिक तक्ते कसे आणि किती तयार करायचे, याबद्दल विचार सुरू करेल. त्याबरोबरच विषयासंबंधी अधिक माहिती संग्रहित करणे, विषयाबद्दलचे ज्ञान, समज आणि आकलन वाढत जाण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करणे, त्याला आवश्यक वाटेल. त्यासाठी विषयासंबंधी नवी पुस्तके, नियतकालिके यांचे वाचन करण्याचा आवर्जून प्रयत्न असा शिक्षक करेल. विश्वकोष आणि अन्य संदर्भ ग्रंथांचाही अभ्यास करेल. त्यातून आवश्यक ती माहिती मिळवेल. सर्व विषयांच्या शिक्षकांना हे सर्व करावेच लागेल; पण विषयानुसार अभ्यासात काही अन्य बाबीही समाविष्ट कराव्या लागतील.

हेही वाचा – भाषिक बुद्धिमत्तेचा शोध

विज्ञानाच्या शिक्षकांनी बौद्धिक प्रगतीसाठी आपल्या विषयाच्या अभ्यासाशिवाय शक्य तेवढे विज्ञानविषयक प्रयोगही करणे गरजेचे असते. असे प्रयोग केल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोग कसे करावेत, प्रयोगांच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे उत्तमरित्या शिकवू शकतील. विज्ञानविषयक ताज्या घडामोडींची माहितीही शिक्षकांनी आवर्जून मिळवायला हवी. त्यासाठी विज्ञानविषयक नियतकालिके वाचणे अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे विज्ञानातील विविध संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगता येतील.

भाषा विषयाच्या शिक्षकांना आपल्या बौद्धिक प्रगतीसाठी नामवंत लेखक, कवी, निबंधकारांचे उत्तम दर्जाचे साहित्य नेहमी अभ्यासणे फायद्याचे ठरेल. त्यामुळेच त्यांना भाषेवर प्रभुत्व मिळवता येईल. असे प्रभुत्व मिळविले तरच ते विद्यार्थ्यांना कविता, कथा, निबंध नीट समजावून सांगू शकतील. उत्तम लेखन कसे करावे, शब्द, वाक्यप्रचार, म्हणी यांचा योग्य उपयोग कसा करायचा, नेमक्या शब्दांत अर्थपूर्ण लेखन कसे करावे हे त्यांना शिकविता येईल. इतिहासाच्या शिक्षकांना विशिष्ट ऐतिहासीक घटना घडल्याची कारणे, त्या घटनेचे झालेले परिणाम माहीत करून घेण्यासाठी इतिहासविषयक साहित्याचे भरपूर वाचन करायला हवे. महान व्यक्तींची चरित्रे, ऐतिहासिक घटनांसंबंधीची पुस्तके, त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती यांची माहिती देणारे ग्रंथ अभ्यासले तर इतिहास कसा वाचावा, इतिहासातील घटनांचा कसा अभ्यास करायचा हे उत्तमरित्या शिकवता येईल.

नागरिकशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांना भारतीय संविधानाचा अभ्यास, देशातील आणि जगातील ताज्या राजकीय घडामोडीचा अभ्यास उपयुक्त ठरेल. नियमितपणे वर्तमानपत्रांतील विविध राजकीय घडामोडीं संबंधित बातम्या, अग्रलेख आणि अभ्यासपूर्ण लेखांचे वाचन करायला हवे, यामुळे नागरिकशास्त्र नीट शिकविता येईल आणि नागरिक म्हणून विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करता येतील, हे कळेल.

हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!

याप्रमाणेच प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आपल्या बौद्धिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले तर ते अधिक चांगले शिक्षक होऊ शकतात. प्रत्येक शिक्षकाने उत्तम शिक्षक असलेच पाहिजे. उत्तम शिक्षक आपल्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. असे शिक्षक आपल्या विषयासंबंधीचे नवे ज्ञान मिळविण्यासाठी, विषय तज्ज्ञांची भाषणे ऐकण्यासाठी उत्सुक असतात. ते प्रशिक्षण वर्ग अन् कार्यशाळांमध्ये आवडीने सक्रिय सहभाग घेतात. अभ्यास आणि संशोधन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिक्षकाने अभ्यासक, संशोधक असणे पुरेसे नसते. त्याला उत्तम अध्यापनही करता यायला हवे. चांगले अध्यापन कसे करायचे याची चर्चा करणारी, शिक्षणक्षेत्रातील अभिनव प्रयोगांची माहिती देणारी शिक्षणशास्त्र विषयक शास्त्रीय नियतकालिकेही शक्य तेव्हा स्वखर्चाने विकत घेऊन वाचणे, हेही अभ्यासू शिक्षकाला आवश्यक वाटेल. यामुळे शिक्षक आपले अध्यापन हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मनोरंजक, विषयाची गोडी वाढविणारे तसेच अत्यंत उद्बोधक करण्यात यशस्वी होतील. यामुळे विद्यार्थीही बहुश्रूत होतील.

रोजचे अध्यापन करताना आपल्या विषयाचा व्यासंग वाढविण्यासाठी वेळ कसा काढायचा, असा शिक्षकांना प्रश्न पडू शकेल. पण आवडीने शिक्षकी पेशात आलेल्या शिक्षकाला मात्र हे कधीच अशक्य आणि कठीण वाटणार नाही. उत्तम शिक्षक होणे, हे आपले कर्तव्यच आहे आणि त्यासाठी आपण आपली बौद्धिक तयारी केलीच पाहिजे, असे त्याला वाटेल. तो आपला व्यासंग नेहमीच अत्यंत आनंदाने सुरू ठेवेल आणि त्यासाठी आवर्जून वेळ काढेल. अशा शिक्षकांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे शिक्षणव्यवस्थेत असंख्य चांगले बदल होऊ लागतील.

(‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण!’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!