Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकपालकत्वाची नवी जाणीव

पालकत्वाची नवी जाणीव

आराधना जोशी

साधारणपणे 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली मी दहावीची परीक्षा दिली. शाळा विलेपार्ले येथे होती आणि मला सेंटर आलं होतं दादरला (कारण त्यावेळी रहायला तिथे होतो). पप्पा पोहोचवायला तर, आई घ्यायला येणार, अशी व्यवस्था करण्यात आली. पहिल्या पेपरला जाण्याची तयारी केली, सगळ्या गोष्टी नीट घेतल्या की नाही, याची पालकांकडून चौकशी झाली आणि अचानक पप्पांनी सांगितलं की, बरोबर एकही पुस्तक किंवा गाइड घ्यायचं नाही. मी आधीच टेन्शनमध्ये होते, त्यात हे असं फर्मान काढल्यावर तर, माझं अवसानच गळालं. पण पप्पा त्यांच्या मतावर ठाम होते. त्याचं कारण सांगताना ते म्हणाले, एक संपूर्ण वर्ष तुला याचा अभ्यास करायला मिळालं. तो अभ्यास तू नीट केला आहेस. मग शेवटच्या क्षणी परत परत वाचण्याचा प्रयत्न करणं आणि इतर विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येणाऱ्या शंका यामुळे टेन्शन उगाचच वाढेल. झालेला अभ्यासही विसरायला होईल. त्यापेक्षा शेवटच्या या क्षणांमध्ये रिलॅक्स हो, आपल्याला सगळं येतंय, हा विश्वास बाळग आणि पेपरला सामोरी जा.

पेपर संपल्यावर आई घ्यायला यायची आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये पेपरनंतर होणारी चर्चा सुरू होण्यापूर्वीच मला त्या सेंटरमधून बाहेर काढायची, कारण no postmortem यावर दोघेही पालक ठाम होते. जो पेपर देऊन झाला त्यावर चर्चा करून ‘अरे आपलं हे चुकलं’ किंवा ‘हे उत्तर अर्धवटच लिहिलं’ याचा विचार करून पुढच्या पेपरवर त्याचा होणारा परिणाम, त्यातून होणारी चिडचिड, वाढणारं टेन्शन, यासगळ्या गोष्टी त्यांना अमान्य होत्या. त्यामुळेच पेपर झाल्यानंतर तो ‘व्यवस्थित लिहिता आला नं?’ असं विचारून पालकांनी फक्त पेपरवर नजर टाकणं, यापलीकडे कोणतीही चर्चा केली नाही.

जसं दहावीला झालं तसंच बारावीच्याही परीक्षेला हीच पद्धत त्यांनी अवलंबली होती. त्यावेळीही कोणत्याही टेन्शनविना ती पूर्ण परीक्षा पार पडली होती. TY ला असतानाही पप्पा बरोबर यायचे, पहिल्या पेपरला मी त्यांना म्हटलं होतं की, आम्ही मैत्रिणी जाऊ एकत्र. पण तरीही ते प्रत्येक पेपरला सोडायला यायचे. त्यावेळी चर्चगेट सेंटर आलं होतं. तिथे जाताना समजा काही प्रॉब्लेम झाला, ट्रेन्सचा गोंधळ झाला तर, त्याचं मी टेन्शन घेऊ नये यासाठी ते सोबत यायचे. सुजाण पालकत्वाचा त्यावेळी बोलबाला नसतानाही अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी या गोष्टी केल्या होत्या.

अर्थात, हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मुलीला मोठं करण्याचा प्रयत्न केला. तिच्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरला मुलगी सकाळी मस्तपैकी कार्टून नेटवर्क बघत होती. ते बघून काही काळ तिच्या बाबाला टेन्शन आलं होतं. मला त्याने तसं बोलूनही दाखवलं, पण ती रिलॅक्स झाली, हे त्याच्याही लक्षात आलं. पेपरला जातानाही कोणतंही पुस्तक बरोबर घ्यायचं नाही, ही सूचना आजी-आजोबांनी तिला दिलेली होती. त्यामुळे सेंटरवर गेल्यानंतर बाकीची मुलं शेवटच्या तयारीत असताना ही मात्र संपूर्ण सेंटर (तिचीच शाळा), वर्ग फिरून यायची. पेपर झाल्यावरही कोणाला पेपर कसा गेला, याचीही तिने कधी चौकशी केली नाही की, आपल्याला पेपर कसा गेला याची चर्चा केली नाही. No postmortem हे तिलाही मनापासून पटलं! बारावीच्या परीक्षेच्यावेळीही आम्ही मायलेकी पेपरच्या आधी मस्त गप्पा मारत बसायचो.

आता ती मेडिकलला आहे. नुकतीच्या तिच्या फायनल्स आटोपल्या. या परीक्षेसाठी रात्री जागून अभ्यास करावा लागला; पण झोपही तेवढीच महत्त्वाची आहे, याचीही तिला जाणीव होती. त्यामुळे पाच तास झोपून मगच पेपरला ती जात होती. याउलट संपूर्ण हॉस्टेलवर मुली या काळात फक्त एक ते दोन तासच झोपत होत्या. माझ्या मुलीचं एकूण शेड्यूल बघून इतर मैत्रिणींच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं. कधी थेटपणे तर कधी आडून-आडून त्यांनी अजून जरा अभ्यासाला वेळ देत जा, असं तिला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर संपूर्ण वर्षभर अभ्यास करायला वेळ होता, त्याचा मी उपयोग करून घेतला आहे. आता काय होईल ते होऊ दे; पण जागरण करून अभ्यास करणार नाही, यावर ती ठाम राहिली. गेली तीन वर्षे ती सातत्याने चांगल्या गुणांनी पास होत आली आहे.

आपण करतोय ती अभ्यासाची दिशा योग्य आहे आणि आपल्याला मिळालेल्या वेळेचा अपव्यय न होता अभ्यास कसा करायचा, ते आता मुलीला समजलं आहे. एक पालक म्हणून याच गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. मारून मुटकून, मनाविरुद्ध अभ्यास करायला लावणं हे अर्थात आम्हाला अजिबात मान्य नव्हतं. पण आपल्याला हवी ती करिअरची साइड मिळाल्यानंतर अभ्यासाची गोडी कशी लागते ते नकळतपणे मुलीने आम्हाला पटवून दिलं. पालक असूनही मुलीने दिलेली ही शिकवण आम्हालाही सुजाण करून गेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!