सुहास गोखले
सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर तारकासमूह (Constellations) म्हणून ओळखले जाते. याआधी ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. एकूण 27 नक्षत्रे असून अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 24 नक्षत्रांची माहिती घेतली. या मालिकेतील पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांबाबत जाणून घेऊ.
पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा : काही नक्षत्रे जोडीने आढळतात. कारण या नक्षत्रांच्या जोडीमुळे एखादा वेगळा तारकासमूह तयार होत असावा. याचे एक उदाहरण म्हणजे पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा. या नक्षत्रांचा उल्लेखसुद्धा एकत्रच करण्यात येतो.
धनिष्ठा नक्षत्राच्या मदतीने जर थोडे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास चार ठळक तारकांचा एक मोठा चौकोन आढळेल. या चारही तारका तेजस्वी असल्याने हा चौकोन चटकन ओळखण्यात येतो. या चौकोनातील पुढील दोन तारका म्हणजे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र तर मागील दोन तारका म्हणजे उत्तरा भाद्रपदा.
हेही वाचा – Nakshatra Gatha : मूळ नक्षत्रासह पूर्वाषाढा अन् उत्तराषाढा
आपल्या येथे वेदकाळापासून या नक्षत्रांचा उल्लेख आढळतो. त्या काळात त्यांना ‘पौष्ठपदा’ हे नाव होते. रामायण काळापर्यंत पौष्ठपदा हेच नाव प्रचलित होते.
रेवती : एकूण 27 नक्षत्रांमधील शेवटचे नक्षत्र म्हणजे रेवती. शेवटचे नक्षत्र म्हणजे शेंडेफळ; म्हणून या नक्षत्राचा आकार लहान असायला हवा. परंतु प्रत्यक्षात मात्र या नक्षत्राने आकाशात विस्तीर्ण जागा व्यापली आहे.
आकाराने जरी हे नक्षत्र मोठे असले तरी, ते शोधण्यासाठी एखाद्या नवख्या निरीक्षकास मात्र फार त्रास होतो. कारण या नक्षत्रातील सर्वच तारका मंदप्रकाशी आहेत. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या थोडे पुढे दक्षिण-पूर्व दिशेस पाहिल्यास इंग्रजीतील ‘व्ही’ (V) आकाराचा एक फिकट तारकासमूह आढळेल. परंतु या व्हीचा आकार फार मोठा आहे आणि थोड्याशा तिरप्या अवस्थेत तो आपणास दिसतो, हेच रेवती नक्षत्र. रेवती नक्षत्राचा समावेश मीन राशीमध्ये होतो.
या तारकासमूहाचे निरीक्षण केल्यास आपणास आढळेल की, या तारकांचे दोन विशिष्ट धागे तयार झाले आहेत. हे धागे एका बाजूस मिळालेले आहेत तर दुसर्या बाजूकडील या तार्यांच्या दोरीचे तोंड एकमेकांपासून दूर गेलेले आहे. या दूर गेलेल्या दोन्ही टोकांच्या शेवटी आपणास काही तारे जवळजवळ आढळतील. त्यांनाच माश्यांसारखे कल्पिले आहे आणि या दोन माश्यांना दोन दोर्यांच्या साहाय्याने बांधून ठेवल्याची एक आकृती समजली जाते.
हेही वाचा – Nakshatra : श्रवण, धनिष्ठा आणि शततारका
आपल्या पुराण कथांमध्ये रेवती नक्षत्रासंबंधी एक कथा आढळते. आपला मुलगा हूड आणि व्रात्य निघाला याचे ऋत्वाक मुनींना दुःख होते. जातक शास्त्राचे तज्ज्ञ गर्ग मुनींनी त्यांचे दुःख ऐकून मुलाचे जातक पाहिले आणि त्यांच्या मुलाच्या दुर्गुणांचे कारण म्हणजे त्याचा रेवती नक्षत्रावरील जन्म, असे सांगितले. त्यावेळेस ऋत्वाक मुनींनी रेवतीला स्थानभ्रष्ट होण्याचा शाप दिला. रेवती नक्षत्र आकाशातून निखळून जमिनीवर पडली. जिथे पडली तिथे मोठा हादरा बसला आणि सरोवर तयार झाले. त्या सरोवरात जलरुपात राहणाऱ्या रेवतीला पुढे मुलगी झाली. या मुलीचे पुढे दुर्गम नावाच्या राजपुत्राशी लग्न ठरले, तेव्हा तिने रेवती नक्षत्रावर लग्न लावण्याचा प्रेमळ हट्ट धरला. तिचे पालन करणाऱ्या प्रमुख ऋषींनी तो मान्य केला. म्हणजेच, रेवती शापमुक्त होऊन आकाशात स्थानापन्न झाली.
रेवती नक्षत्राला खगोलशास्त्रात आणि कलगणनेत विशेष महत्त्व आहे, ते संपात बिंदूमुळे. वसंत संपात बिंदू रेवती नक्षत्रात आहे. याच अर्थ असा की, खगोलीय विषुववृत्त आणि आयनिकवृत्त या नक्षत्रात एकमेकांना छेदतात. या दिवशी सूर्य आयनिक वृत्तावरून सरकत रेवती नक्षत्रावर आला की, तो आपोआप आकाशाचे दोन समांतर भाग करणार्या खगोलीय विषुववृत्तावरही येतो. त्यामुळे या दिवशी (22 मार्च) दिवस आणि रात्र समान बारा-बारा तासांची असतात.
समाप्त
(लेखक निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.