पराग गोडबोले
भाग – !
बाबा, थांबा जरा आलेच. भराभर रस्ता ओलांडून समोरच्या दुकानात गेली लेक आणि हातात गुलाबी रंगाचा पुडा मिरवीत आली. मला म्हणाली, “पॅड संपले होते… घेऊन आलेय, ठेवा पिशवीत.” मी बघतच राहिलो कौतुकाने… किती बदललंय जग!!
दृश्य दुसरे, चित्रपटगृह. सायकलवर बसून एका माणसाला धुम्रपानाचे धोके आणि सॅनिटरी पॅडचे फायदे समजावून सांगणारा अक्षय कुमार. पूर्वी अत्यंत खासगी समजल्या जाणाऱ्या विषयावर जाहीर उद्बोधन… किती बदललंय जग!!
आज एक पुरुष समाजमाध्यमावर या विषयावर लिहू पाहतोय आणि तेही निःसंकोचपणे हेही परिवर्तनच. किती बदललंय जग!
थोडंसं मागे जाऊ. 1977-78 साल…. जॉन्सन अँड जॉन्सनने नव्यानेच पॅड्स भारतात आणले होते आणि त्याच्या विपणनाची म्हणजे मार्केटिंगची जबाबदारी होती तिथं नुकत्याच रुजू झालेल्या ‘इंद्रा नूयी’ यांच्याकडे. त्यांनी अत्यंत जबाबदारीने हे आव्हान पेललं आणि हे उत्पादन भारतात रुजवलं, वाढवलं आणि लोकप्रिय केलं. याच इंद्रा पुढे जाऊन ‘पेप्सीको’ या बलाढ्य अमेरिकन कंपनीच्या प्रमुख झाल्या.
मी वाचलेल्या ‘My life in full’ या आत्मचरित्रात त्या म्हणतात, “मी जेव्हा या उत्पादनावर काम करू लागले तेव्हा माझे सगळे सहकारी पुरुष होते. अमेरिकेत स्थिर झालेलं हे उत्पादन भारतात आणून स्त्रियांना त्याचं महत्त्व पटवून द्यायचं, हे खूप कठीण काम होतं. आमच्या जेव्हा बैठका व्हायच्या, तेव्हा पुरुषांसमोर चर्चा करताना मला थोडं कानकोंडलं व्हायचं, संकोच वाटायचा… पण मी धीर सोडला नाही. कापडी घड्या धुवून परत परत वापरण्याची भारतीय महिलांची पिढ्यानपिढ्यांची सवय मोडणे हे अत्यंत महत्त्वाचे होतं. विरोध व्हायचा, खर्चाची तयारी नसायची, जुनं ते सोनंच ही धारणा असायची, पण या सगळ्यावर मात करून आम्हाला पुढे सरकायचं होतं. घाई करून चालणार नव्हतं. कारण विषय अतिशय नाजूक होता. आम्ही शाळा आणि महाविद्यालयात मुलींना भेटायला सुरुवात केली. प्रात्यक्षिक कसं दाखवायचं, हा यक्षप्रश्न होता; पण मग लहानपणीचा टिपकागद आठवला आणि निळी शाई वापरून आम्ही प्रश्न सोडवला. कल्पक जाहिराती, आई आणि मुलगी यांचं भावनिक नातं अशा कल्पना राबवून आम्ही हळुहळू झिरपलो समाजात…”
हेही वाचा – त्वचेची काळजी कशी घ्यावी?
“Stay Free आणि Care Free ही उत्पादनं आता स्थिरावायला लागली होती, पण कोणीही दुकानदार दर्शनी भागात ती ठेवू इच्छित नव्हता. पुरूष दुकानदारांकडून हे मागायचं म्हणजे फार मोठं दडपण यायचं बायकांवर आणि मग तो दुकानदार दुकानाच्या मागच्या बाजूला जाऊन वर्तमानपत्रात बांधून ते पुडकं तिच्याकडे सोपवायचा. त्या पुढे म्हणतात, “वापरलेले पॅडस् नीट काम करतायत का नाही, हे बघण्यासाठी वापरून झालेले पॅडस् तिथेच ठेवण्याची विनंती त्या मुलींना करायच्या आणि मग त्यांचं निरीक्षण करून सुधारणा सुचवायच्या कंपनीला. खूप खडतर परिस्थिती आणि आव्हानात्मक वातावरणात काम केल्यानंतरच ही संकल्पना समाजात रुजली. मुलींचा आणि स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणारी ही परिवर्तनाची कठीण परीक्षा होती… स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधणारी!
1977 ते 2025 या कालखंडात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि आज कापडी घड्या नामशेष झाल्यायत. जागृती झाली आहे आणि स्त्रियांचं आरोग्य तसंच तिच्या गरजा समाजाला उमगू लागल्यात. आजची स्त्री कुठलाही संकोच न बाळगता दुकानात मागणी करतात किंवा सुपरमार्केटच्या फळीवरून पॅडचं पॅकेट उचलून घेतात. दर्शनी भागात हे ठेवण्यास आता कोणाचाही विरोध नसतो आणि सरकारच्या पाठिंब्यावर आता ग्रामीण भागात सुद्धा ही उत्पादनं किफायतशीर दरात उपलब्ध होऊ लागली आहेत. नॅपकिनची जाहिरात लागली की चॅनेल बदलण्याचे दिवस सरलेत आता. संकोच मावळलाय पार…
हेही वाचा – Skin care : उत्पादने वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेचा pH जाणून घ्या
तसं बघायला गेलं तर पाळी या विषयाबाबत समाजात आता खूप जागरूकता आली आहे. पाळीचे सोहळे होण्याचे दिवस मागे पडून ती एक निसर्गदत्त उदात्त प्रक्रिया आहे, हे आपल्याला उमगलंय आणि हेच एका प्रगत आणि विकसित समाजाचं लक्षण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही संकल्पना रुजवणाऱ्या आणि त्यासाठी संघर्ष करणाऱ्या इंद्रा नूयी यांच्यासारख्या असंख्य ज्ञात आणि अज्ञात महिलांना माझा प्रणाम. स्त्रीचं आरोग्य टिकलं तरच समाजाचं आरोग्य टिकणार, ही तर काळ्या दगडावरची रेघ. आपण यशस्वी होतोय त्यात, नक्कीच!
parag.godbole1@gmail.com
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.