प्रिय अरुण यास,
खरेतर तुझी माझी मैत्री कशी झाली ते आठवत नाही. कधीतरी ती शाळेत पाचवीत असताना झाली आणि काही दिवसांत घट्ट होत गेली. शाळेचे रंगीबेरंगी दिवस संपले. कॉलेजही झाले. तू दुकान टाकले. व्यापार, धंदा करू लागला. मी नोकरीला लागलो. मैत्री टिकून होती. पण अर्थातच पूर्वीसारखा वेळ नसायचा. तुला धंदा वाढवायचा होता… मला नोकरीत प्रमोशन…
नेमका गैरसमज कुठे झाला माहीत नाही. कदाचित माझ्याकडून चूक झाली असावी. पण त्या किरकोळ गोष्टीचा मी पर्वत केला आणि तुझ्याबद्दल मनात अढी ठेवली. त्याच दरम्यान तुझे लग्न ठरले. तू स्वतः पत्रिका द्यायला आला. मी वरवर हसून स्वागत केले, पण तुझ्या लग्नाला जाणार नाही, हे आधीच ठरवले होते. लग्न बाहेरगावी होते. आदल्या रात्री लग्नाचे वऱ्हाड निघणार, तेव्हा तू कोणालातरी मला घ्यायला पाठवले. मी गेलो नाही, तेव्हा तू स्वतः मला घ्यायला आला. मी आजारी असल्याचा बहाणा केला आणि आलो नाही. माझा खोटेपणा तुला लक्षात आला असेल. तरी तू काही बोलला नाहीस. परत परत आग्रह करत राहिला… मी गेलो नाहीच.
हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!
काही दिवसांनी माझे लग्न ठरले. मीही रितीप्रमाणे तुला आमंत्रण दिले. तू येणार नाही, हे मला माहीत होते. माझेही लग्न बाहेरगावी होते. तुझ्या लग्नाच्या वेळी तू जसा आला, तसा मीही आलो तुला बोलवायला… वऱ्हाड निघण्याच्या वेळी… उगाच कोणी म्हणायलो नको की, मी बोलावले नाही! तू नाही म्हणाला… आता येऊ शकत नाही. काहीतरी व्यापाऱ्याला माल देणे जरुरी आहे. रात्री तो येणार आहे. मी वरवर आग्रह केला. तू येणार नाही, हे माहीत होते.
लग्नगावी पोहचलो. सर्व विधी होऊन दुपारी मंगलाष्टक सुरू झाल्या… आणि अचानक माझ्या बाजूला घामाघूम झालेला तू येऊन उभा राहिला. मी आश्चर्याने बघतच राहिलो… एवढ्या गडबडीतही मी तुला हात दिला.
हेही वाचा – तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…
पुढे कळले की, खरोखरच व्यापारी रात्री आला होता… त्याला माल देऊन तू जी गाडी मिळेल त्या गाडीने निघाला आणि दोन-तीन गाड्या बदलत पोहोचलास. एक छोट्या कृतीने तू मैत्री कशी निभावावी, हे दाखवून दिलेस!
गोष्ट इथेच संपत नाही. एकदा मोटरसायकलने जात असताना एक खड्डा चुकवण्याच्या नादात गाडीवरचा कंट्रोल गेला, जोरात पडलो. डोळ्यापुढे अंधारी आली. डोळे उघडले तर, मी हॉस्पिटलमध्ये आणि तू शेजारी बसलेला! कोणीतरी व्यापाऱ्याने मला पडताना पाहिले आणि लगेच तुला फोन केला… तू हातातले काम टाकून धावत आलास… पुढे ॲम्ब्युलन्स मागवणे ॲडमिट करणे आणि मला शुद्ध येईपर्यंत तिथे बसून राहणे… हे सगळे तू केले. खरेतर, घरी फोन केला असता तरी, तुझी जबाबदारी संपली असती… पण तू थांबलास. अगदी मला डिस्चार्ज मिळेपर्यंत…
मित्र कसा असावा तर, तुझ्यासारखा असावा.
आज तुझ्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा…
तुम जिओ हजारो साल…
तुझाच!
——


