दतात्रय पांडुरंग मानुगडे
भाग – 4
दिवस पुढे पळत होते. शनिवार, रविवार सुट्टी मिळाली की, मी मिरजेला जात असे आणि बाबांना भेटत असे… मी त्यांच्यापुढे उभे राहिलो की, लगेच म्हणायचे, “आओ बेटा…” मी आल्याची चाहूल त्यांना कशी समजत होती, हे मला माहीत नाही!
एक आठवड्यानंतर बाबा मला एकदम नवीन कपड्यांमध्ये दिसले… डोळ्यांचे पारणे फिटले. मी त्यांच्याबद्दल घालून दिलेले नियोजन परफेक्ट चालले होते, त्यांना सकाळी नाश्ता, संध्याकाळी जेवण, रोज आंघोळ मिळत होती… मी तसे दुकानदारांना सांगून ठेवले होते, “तुम्ही पैशांची काही काळजी करू नका.”
त्यांच्याजवळ बसणाऱ्या माणसांना मी विचारलं, “ आता बाबा बोलतात का तुमच्याबरोबर…?”
“एवढं आमचं नशीब नको का? पण बाळ, तुझं नशीब चांगलं आहे… तू गेल्यापासून रोज आम्ही त्या बाबाशी बोलतो, परंतु ते बाबा एक शब्द सुद्धा बोलत नाहीत! आम्ही त्याचं काय घोडं मारलंय, ते देवालाच माहीत…” त्यातील एक जण म्हणाला.
“तसं काही नाही… बाबा चांगले आहेत, तुमच्याबरोबर सुद्धा बोलतील… आता त्यांना दिसत नाही. तरीपण मी आल्याची चाहूल लागताच, ते माझ्याशी बोलले, ते तुम्ही सुद्धा ऐकले आहे…” मी म्हणालो.
“मग बाबांना आमच्याबरोबर बोलायला सांगा की!” अन्य एक जण म्हणाला.
“चला, बघतो प्रयत्न करून…”
आम्ही सर्वजण बाबांच्या जवळ गेलो आणि मी म्हणालो, “बाबा गेले किती दिवस ही माणसं तुमच्याबरोबर बसलेली असतात, त्यांच्याबरोबरही बोलत चला की…”
“मला कोणाशी बोलायचं नाही. ती माणसं माझ्या ओळखीची नाहीत… फक्त तू माझ्या ओळखीचा आहेस! त्यांच्याबरोबर बोलायची मला परवानगी नाही,” बाबा म्हणाले.
“मग घ्या की, परवानगी…” मी म्हणालो.
“देणारा देत नाही परवानगी… तो ज्याच्यासाठी परवानगी देतो, त्याच्याबरोबर मी बोलतो!”
“बाबा तुमचं गाव कोणतं?” मी विषय बदलला.
“मला गाव नाही… विश्व हेच माझं घर…” बाबा म्हणाले.
“तुम्हाला कोण नातेवाईक आहेत का?”
“आहेत ना! तू एक आणि वरचा…”
“पण, वर कोण असतं? मला सांगा की बाबा…,” मी विचारलं.
“ज्याला रूप नाही, ज्याला वास नाही, ज्याला आकार नाही… तोच…” बाबा म्हणाले.
“म्हणजे? मला समजलं नाही!”
“तुला एवढ्या लवकर समजणार नाही, तुला मी जरूर सांगेन… पण आत्ता नाही,” बाबा एवढंच म्हणाले.
“बाबा, जेवण, आंघोळ व्यवस्थित मिळते ना?” मी विचारलं.
“हो… सब अच्छा है, मेरे को खाना मिलता है, सुबह नाश्ता मिलता है… कपडा और अंघोळ भी मिलता है, मेरा बेटा… सबकुछ मेरे लिए अच्छा किया… लेकिन थोडे दिन में मैं बहुत लंबा गांव को जानेवाला है…” बाबा असं काहीतरी गूढ म्हणाले.
हेही वाचा – मीरासाहेब दर्ग्याचे आजोबा…
“कोणत्या गावाला जाणार आहात, बाबा?” मी आणखी एक प्रश्न केला.
“गांव लंबा हैं… यह गांव का नाम मैं अभी नहीं बता सकता, मैं तुमको बाद में बताएगा,” बाबा म्हणाले.
“बाबा, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे…” मी उत्सुकता दाखविली.
“ऐसा कैसा? मेरा और परमेश्वर का करार हुआ है, वो करार थोडा दिन मे पूरा होने वाला है. तू नही आ सकता… तू आने के लिए अभी बहुत टाइम है… वह बाद में बताएगा, अभी नहीं!” बाबा म्हणाले.
बाबा हिंदीत बोलत होते अन् मी मराठीत बोलत होतो. मी काय बोलतो आहे, हे त्यांना पूर्णपणे समजत होते. मी बाबांना विचारलं, “बाबा, तुमको मराठी भाषा आती है?”
“क्यों नही आयेगा? मेरे को सब भाषा आती है…” बाबा उत्तरले.
“मग तुम्ही खूप शिकलेले असावेत, असं मला वाटतं.”
“मैं बहुत सीखा… मेरा मास्टर बहुत बडा… निसर्गा का हेडमास्तर है, उन्हींने मेरे को सीखाया…” बाबा म्हणाले.
“तुमच्या आई-वडिलांचं नाव काय?”
“मेरा माँ का नाम धरती हैं और बाप का नाम आकाश!”
“हे असं कसं?”
“वह ऐसा ही रहता है…” बाबा म्हणाले.
बाबा हिंदीत बोलतात… बाबांच्या जवळ बसलेली सर्व माणसे ऐकत होती. बसलेल्या माणसांना समजले की नाही माहीत नाही. शक्यतो त्यांना समजले असावे! परंतु मला समजले नाही. आईचे नाव धरती आणि वडिलांचे नाव आकाश हे कसे असू शकते? बसलेल्या माणसांना मी विचारलं, “बाबा काय बोलतात हे तुम्हाला समजलं का?”
“होय, सारे समजले. ही व्यक्ती साधीसुधी नसून, एक दिव्यशक्तीची व्यक्ती आहे, हे आज केवळ तुमच्यामुळे समजले! रात्रीच्या वेळी हे मिरज शहर शांत झोपले की, हे बाबा दर्ग्यात जातात म्हणे… हे बाबा दर्ग्यात जाऊन मिरासाब बाबांना भेटून येतात, असंही सांगितलं जातं. बाबा रात्री बारानंतर काही माणसांना दिसतात, असे आम्ही ऐकून आहे. यात खरं काय आणि खोटं काय, हे माहीत नाही… परंतु केवळ बाळा तुझ्यामुळे एक समजले ही व्यक्ती फार मोठी आहे…” शेजारच्या एकाने सांगितले.
हेही वाचा – माणुसकीचा खरा अर्थ…!
मी दिवसभर बाबांजवळ होतो. जेवण, चहा नाश्ता देत होतो… बाबा मधेच म्हणाले, “बेटा, तुने खाना नहीं खाया?“
“नाही बाबा, तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवतो…“
“तू किधर खाना खाने वाला हैं.“
“हॉटेलमध्ये… पण तुम्ही अगोदर जेवून घ्या…”
मी बाबांजवळ भाजी, भात, वरण, चपाती, पाणी ठेवले. बाबा शांतपणे जेवू लागले… काही मिनिटांपूर्वी बाबा बोलून गेले की, आईचं नाव धरती आणि वडिलांचे नाव आकाश! नाव विचारलं तर ते सांगत नाहीत. गेल्या आठवड्यात ते म्हणाले, “या जगात कोणालाच नाव नाही. ही सारी माणसे बिन-नावाची आहेत. शरीराचे नाव घेऊन काय करायचे. माणसाचे शरीर हे पंचतत्वात विलीन होणार आहे, असे गरुड पुराण सांगतं. आलेला माणूस एक दिवस जाणार आहे… पण तो कधी जाणार आहे? कोणत्या तारखेला जाणार आहे? त्या दिवशी कोणता वार असेल? अमावस्या असेल का पौर्णिमा असेल?… हे काही सांगता येत नाही…”
जेवण झाल्यावर ते मला लगेच म्हणाले, “बेटा, खाना खाने को जाओ… और रात के टाइम मेरे पास रहना नहीं, तुम कराड चले जाओ… कल आते हो, तो आ जाओ… अभी रात को चले जाओ…।“
मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवण करून आल्यानंतर त्यांच्या आजूबाजूलाच फिरत राहिलो. मी फक्त बोलायला त्यांच्याजवळ जात असे… बोलणं संपलं की, लांब उभे राहात असे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना शंका येऊ नये, एवढंच कारण त्यामागं होतं. फक्त आणि फक्त येथे बसायला येणाऱ्या लोकांनाच फक्त माझी ओळख आहे. सायंकाळचे चार वाजून गेले होते… मी बाबांचा निरोप घेतला आणि मिरज स्टेशनला येऊन गाडीत बसलो. कारण उद्या पुन्हा मी बाबांच्या कडे येणार होतो… तेवढीच सेवा होईल. मलाही त्यांचा एक सारखा ध्यास लागला आहे. मी काम करतो खरे, पण सारे लक्ष बाबांकडेच असते… त्यांचे आणि माझं काय नातं आहे, माहीत नाही. पण जीवनामध्ये अशी माणसं भेटणं दुर्मीळच! त्यांची भाषा फार विक्षिप्त असते कुणाला न कळणारी…
क्रमश: