नेहा नाडकर्णी
हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी आपली कारकीर्द एडिटर म्हणून सुरू केलं, पण आपल्या सर्वांना ते जास्त परिचित आहेत ते दिग्दर्शक म्हणून… हृषिकेश मुखर्जी! 1957 ते 1998 या आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी निखळ मनोरंजन करणारे एकापेक्षा एक असे तब्बल 42 चित्रपट दिग्दर्शित केले. आमच्या पिढीतील, आमच्या आई-बाबांच्याही पिढीलाही आनंद देणारे हे चित्रपट होते. जे काही करायचे ते सर्वोत्तमच एवढाच ध्यास हृषिदांचा होता…!
प्रत्येक चित्रपट एक मध्यमवर्गीय मूल्य असलेला, कुठलाही अभिनिवेश न बाळगता स्त्री-स्वातंत्र्याचे विचार, सर्वसामान्यांच्या मनातील विविध गंड यावर भाष्य असलेला… चित्रपटातील खलनायक म्हणजे परिस्थिती, मोह, राग, अहंकार हेच. चित्रपट बघताना लहान-मोठे सगळे एकत्र बसून बघू शकतील असे आणि बघता बघता कधी चित्रपटाचा भाग होऊन जातो, ते कळत देखील नाही. चित्रपटही परत परत बघावेसे वाटणारे… याचे मोठे श्रेय कलाकार, चित्रपटाची कथा, संगीत या सगळ्यांची यशस्वीपणे मोट बांधणाऱ्या दिग्दर्शक हृषिदांचेच!
त्यांनी सर्वप्रथम दिग्दर्शित केलेला चित्रपट 1957 चा “मुसाफिर”. संपूर्ण चित्रपट एकाच घरात घडतो. एका मागोमाग एक येऊन गेलेले तीन भाडेकरूंची ही कथा… त्यांचा एकमेकांशी काहीही संबध नाही… त्या काळात असा चित्रपट बनवला जाणे हे दिग्दर्शकाचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. एका चित्रपटात एकापेक्षा जास्त स्वतंत्र कथा, पहिल्या कथेत पळून जाऊन लग्न केलेलं जोडपं… त्यांची आईवडिलासोबत असलेली घट्ट वीण (कलाकार सुचित्रा सेन), दुसरी कथा सासरे ज्यांचा मोठा मुलगा नुकताच गेला आहे आणि त्याची पत्नी प्रेग्नंट आहे आणि धाकटा मुलगा जो अजून मार्गी लागायचा आहे… यातील सासरे-सून, दीर-वाहिनी इतके सुंदर नातेसंबंध दाखवले आहेत (कलाकार नझीर हुसेन, निरूपा रॉय, किशोर कुमार – यातील प्रसिद्ध गाणं ‘मुन्ना बडा प्यारा, मम्मी का दुलारा…’) तिसरं कथानक माजी प्रियकर, भाऊ आणि एक दिव्यांग छोटा मुलगा यांचं आहे. पूर्ण चित्रपटात मागे वाजणारे आर्त स्वरातील व्हायोलीन आणि व्हायोलीन वाजवणारा माजी प्रियकर दिलीप कुमार…
हा चित्रपट तिकीट बारीवर चालला नाही, पण हा प्रयोगच नवीन होता. पहिलाच चित्रपट अपयशी (आर्थिकदृष्ट्या) ठरला तरी, 1957चा हिंदीतील तिसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र या चित्रपटाने पटकावले.
हृषिदांनी दिग्दर्शिक केलेला दुसरा चित्रपट यशस्वी ठरला, तो म्हणजे, 1959 सालचा ‘अनाडी’! संगीत शंकर जयकिशन… गायक लता मंगेशकर, मुकेश… अभिनेते राज कपूर, नूतन, शुभा खोटे आणि मिसेस डिसाची भूमिका अजरामर करणाऱ्या ललिता पवार. निव्वळ अप्रतिम चित्रपट… तुफान चालला! त्याला सर्वोत्तम चित्रपट म्हणून 1959 सालचा राष्ट्रपती पुरस्कार (रजत) मिळाला. नंतर 1960 साली ‘अनुराधा’ चित्रपट आला. संगीत प्रसिद्ध सतारवादक रवी शंकर… गायिका लता मंगेशकर… कलाकार बलराज सहानी, लीला नायडू आणि हृषिदांचे आवडते मित्र डेव्हिड (जे 1957च्या ‘मुसाफिर’पासून 1981च्या ‘खुबसुरत’पर्यंत एका मिश्कील भूमिकेत दिसत राहिले.) ‘अनुराधा’ची कथा साधीच… खेड्यात प्रॅक्टिस करायचे ठरवलेला ध्येयवेडा तरुण अन् शहरातील धनाढ्य व्यक्तीची कलाकार असलेली मुलगी यांचा विवाह होतो. सुरुवातीला सगळं चालेल म्हणणारी अनुराधा अन् नंतर तिच्या कलेची घुसमट होते आहे, याची जाणीव करून देणारा मित्र… अशी ही कथा.
हृषिदांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पंडितजींनी दोन दिवसांत गाणी तयार करून दिली होती. जी आज सुद्धा मनात रुंजी घालतात. ‘हाय कैसे दिन बिते कैसे बिते रतीया पिया जाने ना’ आणि ‘हाय रे वो दिन क्यो न आये’ या दोन्ही गाण्यांतील आर्तता अगदी आपल्यापर्यंत पोहचते… अर्थात स्वर लतादीदींचा. बलराज सहानी फक्त डोळ्यांनी बोलतात संवादाची गरजच भासत नाही. सायकलवर बसून सतत रुग्णसेवा करणारा… त्यांना काय औषध दिले म्हणजे बरं वाटेल… आणि या साथी कशामुळे होतात याच्या मुळाशी जाणारा… त्यावेळची परिस्थिती खरोखर तशीच होती. 1961च्या बर्लिन आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला गोल्डेन बेअर नॉमिनेशन मिळाले होते. 1960 साली राष्ट्रपती सर्वोत्तम चित्रपट (सुवर्ण) पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता.
हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह
1960-61मध्ये ‘छाया’ हा चित्रपट आला, पण तिकीट बारीवर फारशी चमक दाखवू शकला नाही. सुनील दत्त, आशा पारेख, निरुपा रॉय, नझीर हुसेन या कलाकारांनी जीव ओतून काम केले होते, सलील चौधरींचे संगीत असलेला हा चित्रपट गरीब आणि श्रीमंतांमधील दरी दर्शविणारा आहे. अनाडी चित्रपटासारखीच हृषिदांची व्यक्तिरेखांची अदलाबदल इथेही आहे. अनाडीत आरती आणि आशा (नूतन आणि शुभा खोटे) तर, इथे राही आणि अरुण (एकच व्यक्ती कवी आणि शिक्षक)… हृषिदांचे ‘मिशीप्रेम’ या चित्रपटात पहिल्यांदा दिसले नंतर ते पुढे पार गोलमालपर्यंत चालले… यातील गाणी मात्र आज सुद्धा आपण गुणगुणतो..
इतना न मुझसे तू प्यार बढा
की मी एक बादल आवारा…
सन 1960-61 साली ‘मेम दिदी’ हा चित्रपट ‘लेडी फोर अ डे’ (1933) आणि पोकेत्फुल ऑफ मिराकाल (1961) यावरून प्रेरित होऊन तयार केला होता. संगीत सलील चौधरी यांचे होते आणि अभिनेते (आजच्या भाषेतील सीनियार सिटिझन्स) जयंत (अमजद खान यांचे वडील), डेव्हिड, ललिता पवार या त्रिकुटाने पूर्ण चित्रपट खांद्यावर घेतला होता. जयंत आणि डेव्हिड यांचे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतरचा सीन असू दे किंवा ललिता पवार यांना उचलून फेकून द्यायच्या विचाराने गेल्यानंतर घाबरून या दोघांनी तिने सांगितलेली कामे करत बसणे, हा सीन असो, हे बघताना खूप धमाल येते.
‘लाख छुपाओ छुप न सकेगा राज हो कितना गहरा…’, ‘एक बुत बनाऊँगा तेरा और पूजा करूँगा…’, ‘तुझे जीवन के डोर से बांध लिया है…’, ‘गोरी जरा हंस दे तू…’, ‘तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लागता हैं डर…’ अशी एकाहून एक सरस गाणी असलेला 1962 सालचा ‘असली नकली’ चित्रपट हृषिदांचाच! गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन, गायक लता आणि मोहम्मद रफी अन् रुपेरी पडद्यावर देव आनंद आणि साधना (प्रसिद्ध साधना कट यायच्या आधीची)… ही गाणी कानावर जरी पडली तरी, चित्रपट परत परत बघावासा वाटतो.
1962मधील ‘आशिक’ हा चित्रपटही गाजला. राज कपूर, नंदा आणि पद्मिनी अभिनित, शैलेंद्र आणि हसरत जयपुरी गीतकार, संगीत शंकर जयकिशन तर, आवाज लता आणि मुकेश यांचा… ‘मैं आशिक हूं बहारों का…’, ‘यह तो कहो कौन हो तुम…’, ‘तुम आज मेरे संग हंस लो…’ ही गाणी सुपरहिट ठरली होती.
तर, 1964मध्ये ‘सांझ और सवेरा’ चित्रपट झळकला. संगीत शंकर जयकिशन यांचे होते. डॉक्टर मुलगा… त्याची आई (दुर्गा खोटे) न बघितलेल्या मुलीशी लग्न ठरवते. मुलगी आयत्यावेळी घरातून पळून जाते. घरी आलेल्या निराधार गौरीला (मीना कुमारी) लग्नासाठी तयार केले जाते. लग्न होते आणि नायिकेची कुतरओढ सुरू होते. गुरुदत्त, मीना कुमारी, दुर्गा खोटे, मेहमूद असे तगडे कलाकार… ‘मनमोहन कृष्ण मुरारी…’ आणि ‘ओ सजना मेरे घर अंगना…’ (दोन्ही लता), ‘यही हैं वो सांझ और सवेरा…’ (आशा आणि मोहमद रफी), ‘अजहूंना आये बालमा सावन बीता जाये…’ (सुमन कल्याणपूर आणि मोहमद रफी) अशी सुंदर गाणी त्यात आहेत.
हेही वाचा – ‘पाकीजा’च्या अजरामर गीतांना वादाची किनार
सन 1964मधील ‘अनुपमा’ देखील असाच सुंदर गीतांनी नटलेला. गीतकार कैफी आझमी, संगीर हेमंत कुमार, धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर अभिनीत या चित्रपटालला राष्ट्रपती पदक (रजत) सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार मिळाला. नायिकेच्या जन्माच्या वेळेस तिच्या आईचा मृत्यू होतो आणि वडील मुलीचा (शर्मिला टागोर) आयुष्यभर द्वेष करत राहतात.
‘धीरे धीरे मचल ए दिल-ए-बेकरार कोई आता है…’ (लता) नायिका (शर्मिला टागोर) एकदम अबोल भेदरलेली… (कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं…) निर्णय घेऊ न शकणारी नायिका आणि तिचे अबोलपणे व्यक्त होणे… पूर्ण चित्रपटात नुसते तिचे डोळेच बोलतात… नायकाशी (धर्मेंद्र) तिची भेट होते आणि तिला कोशातून बाहेर काढायचे त्याचे प्रयत्न सुरू होतात… (या दिल की सुनो दुनिया वालो…) यात त्याला मिळालेली शशिकला, देवेन वर्मा, डेविड यांची साथ मिळते.
क्रमश:


