डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
एक मतिमंद लहान मुलगा त्याच्या आजीसह ओपीडीत आला होता, बराच आजारी तरीही एकदम खूश! आपला नातू चारचौघांसारखा नाही म्हणून आजीनं नातवाला इतकं प्रशिक्षण दिलं की, पठ्ठ्या समवयस्क अन् तथाकथित नॉर्मल मुलांपेक्षाही हुशार होता… कमांड ऐकणं -ती फॉलो करणं – ॲटिक्वेट्स वगैरे… जाताना मंगोल डोळे अजूनच बारीक करून ‘बाय’ म्हणत एक फ्लाइंग किसही देऊन गेलं!
मला क्षणभर त्याचं खूप कौतुक वाटलं… पण अचानक विलोजब्रुक आठवलं आणि तोंड कडू झालं!
साठच्या दशकात न्यूयॅार्कस्थित स्टेटन आयलंडमधलं विलोजब्रुक स्टेट स्कूलचं लोखंडी गेट रोज कुरकुरत उघडायचं… आत लांब निर्जंतुक कॉरिडॉर आणि त्यात दोन्ही बाजूला बाकांवर बसलेली मानसिकदृष्ट्या विकलांग मुलं…
बाहेरच्या जगाला वाटायचं, ही शाळा आहे. पण ती फक्त शाळा नव्हती… तर ती ‘प्रयोगशाळा’ होती! सॉल क्रुगमन हे एक प्रसिद्ध डॉक्टर होते आणि हिपॅटायटीस या विषाणूजन्य रोगावर उपचार शोधणं, हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता…! ही लस शोधण्यासाठीच निवडली गेली होती विलोजब्रुकमधली शेकडो असहाय, निष्पाप मुलं…
“आम्ही तुमच्या मुलांची चांगली देखभाल करू… तुमचं मुल आमच्या संशोधनकार्याचा एक भाग असेल…” असं सांगून पालकांना निश्चिंत करण्यात आलं.
पण… पण खरंतर मुलांना हेतूपुरस्सर हिपॅटायटीसच्या विषाणूनं संक्रमित केलं जाणार होतं. मुलं एकामागं एक रांगेत उभी होती… त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती दाटून आली होती… “हात पुढं कर फक्त मुंगी चावेल,” सिस्टर मुलांना आश्वस्त करत होती, पण सिरिंजमध्ये लस नव्हे तर, ती होती संक्रमणाची बीजं…!
हेही वाचा – विषाची परीक्षा…
काही दिवसांतच मुलांना ताप भरला, डोळे-अंग-जीभ पिवळेशार झाले… संपूर्ण वॉर्ड वेदनेनं रडू लागला… डेटासाठी ही मुलं एका पाठोपाठ एक आपला जीव गमावत होती. डॉक्टर क्रुगमन एकेक तपशील नोंदवत होता… ताप, यकृताला सूज, घातक…
“इट्स सायन्स!” लिहिताना साहेब स्वत:चंच समर्थन करत होते!
जवळपास 14 वर्षे हा प्रयोग अव्याहतपणे सुरू राहिला… 700 हून अधिक मुलं या प्रयोगात सामील झाली होती… प्रशासन धृतराष्ट्र बनून राहिलं… इथं काम करणाऱ्या नर्सेस मात्र एकेक करून नैराश्यात चालल्या होत्या, अनेकींनी तडकाफडकी हे कामच सोडलं!
हेही वाचा – …यह तो अलगही ‘केमिकल लोच्या’
1972 साली गेराल्डो रिवेरा नामक एक तरुण पत्रकार आपल्या गुप्त कॅमेरासह विलोजब्रुकमध्ये शिरला आणि त्यानं जे चित्रण केलं ते बघून आख्खं जग हादरलं… अस्वच्छ खोल्या, उपाशी मुलं, भीतीचं सावट, कण्हण्याचे आवाज…
देशभरात संतापाची लाट उसळली विलोजब्रुकला कायमचं कुलूप लावण्यात आलं…
“कुणाला तरी किंमत मोजावीच लागते…” म्हणत डॉक्टर क्रुगमननं शेवटपर्यंत स्वत:चं आणि या प्रयोगाचं समर्थन केलं… “मी फक्त संशोधन केलं, लस मिळवली…” तो ठाम होता.
अरे, पण कोणत्या किमतीवर?
“डेटा…” त्यानं निलाजरेपणानं उत्तर दिलं…! या सगळ्यावर चौकशी समिती बसली ‘बेलमाँट रिपोर्ट’ तयार करण्यात आला, संशोधनाचे नैतिक नियम आखले गेले… पण असं म्हणतात, विलोजब्रुकच्या जुनाट-पडक्या भिंतीतून निरागस बालकांच्या वेदनांचे हुंकार आजही ऐकू येतात!


