अस्मिता हवालदार
आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं
आजोबांचं जग सगळ मुकं मुकं मुकं…
कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली, त्याला जोडलेलं आजोबा आणि नातवंडाचं हळवं नातं तरळून गेलं. गजबजलेली घरं मुकी होतानाची तीव्र वेदना, या कवितेतून जाणवली. जसं देश म्हणजे देशातली माणसं, तसं घर म्हणजे घरातली माणसंच! माणूस नसलेलं घर म्हणजे श्वास नसलेलं शरीर!!
अगदी मागच्या शंभर वर्षात पाहिलं तर, प्रत्येकाच्या घरात किमान आठ-दहा माणसं असायचीच. आपले सगळ्यांचे आजी–आजोबा अशाच गजबजलेल्या घरात मोठे झाले आहेत. एक तर भरपूर मुलं होऊ देण्याचा (आणि परवडण्याचा!) काळ होता तो. एकत्र कुटुंब पद्धत होती, कारण घरची शेती. शेतीत राबायला जितके हात असतील तितके अपुरेच असतात. आपल्या कृषिप्रधान देशात हीच संस्कृती होती, जी गरजेतून निर्माण झाली होती. घरातला एक मोठा कर्ता पुरुष, त्याची मुले, मुलांची पत्नी आणि मुले, पुन्हा या मुलांची पत्नी आणि मुले (नातवंडे, पतवंडे) इतके लोक एका घरात, एका छत्राखाली राहात असत.
त्या कर्त्या पुरुषाला निर्णय घेण्याचे हक्क होते आणि बाकीच्यांनी ते मान्य करण्याची सक्ती होतीच. सर्वाना दोन वेळचे जेवण, कपडे आणि इतर जीवनावश्यक मुलभूत गरजा भागवण्याची चिंता करायची गरज नव्हती. ती चिंता फक्त कर्ता पुरुष करत होता. शेतीखेरीज अनेक परंपरागत व्यवसाय उदा. सुतार, लोहार यांचीही घरे अशीच होती. भारताचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ (आनंदाचा सूचकांक) जगात जास्त असण्यामागचे हे एक महत्त्वाचे कारण होते! कारण इथे प्रत्येकाच्या पाठी कुटुंब होते, कोणीही एकटे नव्हते.
ही व्यवस्था उत्तम वाटत असली तरी, त्यात काही त्रुटी होत्या. अर्थात, प्रत्येक व्यवस्थेत फायदे-तोटे दोन्ही असतातच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी. प्रत्येकाला मनाप्रमाणे वागायचे होते आणि ते काही पूर्ण होऊ शकत नव्हते. कारण, एवढे मोठे कुटुंब चालवायला कायदे, शिस्त हवीच. यात शारीरिक, मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्ती सहज जीवनयापन करू शकत होती. मोठ्या कुटुंबात अशा व्यक्ती सहज सामावून जात. एखादी माघारी आलेली स्त्रीसुद्धा! पण आळशी, कामचुकार माणसे याचा फायदा उठवत जे कष्टाळू सदस्यांसाठी त्रासदायक होत असे. हा मानवी स्वभाव आहे…
पुढे जेव्हा शेतीचे उत्पन्न पुरेनासे झाले तेव्हा घराबाहेर पडून उत्पन्नाची इतर साधने शोधायची गरज निर्माण झाली. हळूहळू कुटुंब विभक्त व्हायला सुरवात झाली. पोटापाण्यासाठी मुंबईला येणारे लोक तिथेच स्थायिक व्हायचे, कुटुंब आणायचे आणि मग केवळ गणपतीला वर्षातून एकदा गावी जायचा रिवाज सुरू झाला. असं प्रत्येक मोठ्या शहराला लागून असलेल्या गावांत झालं. गावातली घरे मुकी होत गेली… माणसांचा आणि जनावरांचाही आवाज लुप्त होत गेला. शहराकडे डोळे लावून बसला.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
मोठ्या शहरात घरे इतकी ऐसपैस कुठली असायला? एक कुटुंब त्यात सामावू शके… पती, पत्नी आणि मुले. यात आजी आजोबाही असायचे. आता हेच कुटुंब मोठं कुटुंब झालं. या कुटुंबाशी आपली ओळख आहे. आपण असेच मोठे झालो. शाळेतून घरी आल्यावर आजी-आजोबा असायचे, आई असायची. घरात टीव्ही, रेडिओने प्रवेश केला होता. तो ठराविक वेळात वाजायचा. शेजारी-पाजारी होते. त्यांच्या घरी बिनदिक्कत कधीही जाता येत होते. घरात माणसांचे आवाज होते.
यानंतर स्त्री अर्थार्जन करू लागली, घराबाहेर पडू लागली. घरात आता आजी-आजोबा आणि मुले! या मुलांकडून परवचा म्हणून घेणे वगैरे संस्कार करण्याचं काम आता त्यांचं होत. मोठ्या कुटुंबात ते आपोआप होत असे. आता घरातला आई-बाबांचा आवाज दिवसातून वजा होऊन रात्रीपुरता आणि सुट्ट्यांपुरता उरला! पुढे स्वातंत्र्याची व्याख्या अधिक व्यापक झाली आणि कुटुंबाची त्रिज्या कमी झाली. कुटुंब फक्त ‘हम दो हमारे दो’ झालं. यातून आजी-आजोबा वजा झाले. त्यांनाही स्वातंत्र्य हवं होतं. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनाही मनासारखं जगायचं होतं. मुलांच्या जबाबदार्या नको होत्या. घरात भांड्याला भांडे लागून आवाज वाढला होता, तो यामुळे शांत झाला. सर्वाना व्यक्तिगत जागा मिळाली होती.
आता मुलांचे काय? पाळणाघरे आली… त्यांना दिवसाचा बराच वेळ शाळेत, इतर छंद वर्गात अडकवून टाकले गेले. आता घर मुके व्हायला सुरुवात झाली होती. सकाळी घराबाहेर पडलेली माणसे संध्याकाळी घरी येत आणि घर पुन्हा गजबजून जात असे. घरात सतत गळणारा टीव्ही, रेडिओच्या जोडीला फोन आला आणि अगदी शेजारीही फोन करून जायची पद्धत सुरू झाली. दुसऱ्याच्या घरात जाण्यापूर्वी ‘कळवून जाणे’ हे शिष्टाचाराचं लक्षण झाले आणि घराचा आवाज कमी होण्यात भर पडली. फोनवर बोलूनच काम भागले की, माणसांनी एकमेकांना भेटायची गरज कमी झाली. आता घराचा दरवाजा न कळवता वाजवणारे पोस्टमन, गॅस सिलिंडरवाले, घरकाम करणाऱ्या बायका इत्यादींचेच उरले. बाकी आवाज विरून गेले. मुलांइतकाच वृद्धांचा प्रश्नही गंभीर झाला. त्यांना सांभाळण्यासाठी वृद्धाश्रम आले. आता तर वृद्धाश्रमांच्या संख्येत मुबलक वाढ झाली आहे. घरे मुकी करण्यात पाळणाघरे आणि वृद्धाश्रम या दोघांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आजही काळाची ही गरज आहे. वृद्धाश्रमात न जाणाऱ्यांसाठी इतर व्यवस्था निर्माण होत आहेत, त्या अजून सशक्त कराव्या लागतील. शेजारीपाजारी संपर्क उरला नसेल, नाते उरले नसेल तर, अनोळखी माणसांकडून मदत घ्यावी लागते. मदत मिळेल पण मायेचा शब्द मिळणार नाही. खरंच, जगायची पण सक्ती आणि मरायची पण सक्ती आहे! मरण्यापेक्षा जगण्याची भीती अधिक. सातासमुद्रापार उडालेली पिल्ले शेवटचा श्वास गोड करण्यासाठी येऊ शकणार नाहीत, हे सत्य आहे.
यापुढचा काळ सध्याचा… घरातली मुलं पश्चिमाभिमुख होऊन सातासमुद्रापार शिक्षण, अर्थार्जन वगैरे कारणांसाठी उडू लागली. हा आई-वडिलांच्या अभिमानाचा विषय झाला. प्रसंगी कर्ज काढून त्यांच्या पंखात उडण्याचे बळ भरले. आता आई-वडील घरात उरले. ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे! घराकडे अपुल्या…,” असे आयुष्याच्या संध्याकाळी वाटत असले तरी, ते अशक्य झाले आहे. तिथे मिळणारा पैसा, सुखसोयी याची सवय लागली आहे, ते इथे मिळणार नाही… त्यामुळे जगता येणार नाही, असा विश्वास आहेच. आता समुद्रापार न उडणारी पाखरेही आपापले वेगळे घरटे लवकरात लवकर बांधतात. किंबहुना, त्यांनी असे केले नाही तर, पालक म्हणून आपण अयशस्वी झालो की काय, अशी शंका निर्माण होते!
हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’
घराला आताशा चार माणसेही झेपत नाहीत… ‘हम दो हमारा एकच’. किंबहुना, आता ‘हम दो’च. मुलांची जबाबदारी घ्यायलाही वेळ नाही. पुन्हा वर्तुळाची त्रिज्या आक्रसली आहे. यातच पोस्टमन, गॅस सिलिंडर वगैरे सेवा देणारी माणसे इतिहास जमा होऊ लागली आहेत. बरीचशी कामे संगणकावर आटपता येत असल्याने माणसांचा माणसाशी संपर्क कमी झाला आहे. विजेचे बिल, बँकेची कामे एका क्लिक सरशी होतात. वरवर पाहता सारे कसे शांत शांत वाटते, पण अंतर्मनातला कल्लोळ वाढला आहे, तडपतो आहे. त्याला ऐकता कान हवा आहे. मग या सगळ्या शहाण्यांचे पाय आपोआप मानसोपचार तज्ज्ञांकडे वळू लागले आहेत. बोलायलाच कोणी नाही, मन मोकळं करायला कोणी नाही… कोंडमारा होऊ लागला आहे. मग ‘तुम्हाला बोलायचे आहे का? एकटे वाटत आहे का? आमच्याशी बोला’ अशा सेवा उपलब्ध झाल्या आहेत, अर्थात फुकट नाहीतच!
या पुढची पायरी चोरपावलाने का होईना आली आहे… ‘लिव्ह इन रिलेशनशिप’. कुठलेही बंधन स्वीकारायची भीती आहे. जबाबदारी, बांधिलकी नकोच आहे. स्वातंत्र्य आता स्वच्छंद होऊ लागले आहे! वर्तुळ इतकं आक्रसलं आहे की, त्यात फक्त एकच माणूस उरलाय. शून्य त्रिज्येचं वर्तुळ! घरात टीव्हीचा आवाज कधीतरी असतो, अन्यथा ईयर फोन आहेतच. दुसऱ्याला डिस्टर्ब न करणे हा शिष्टाचार!! प्रत्येकाचा वेगळा मोबाईल फोन आहे. त्याच्या रिंगचा आणि हो, whattsapp मेसेजचा आवाज मात्र आहे… आणि तोही वाढतोय. आभासी दुनियेशी जवळीक वाढली की, वास्तवात परतणे कठीण होते.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, याचा आपल्याला विसर पडतोयका? पु.लं.नी विनोदाने लिहिलं आहे की, त्यांच्या वर्गमित्राने लिहिले होते, ‘राज्यात भयानक शांतता माजली होती.’ किती खरे आहे! शांतता भयानकच असते. कृष्णाने भारत युद्धाच्या शेवटी सर्व यादव मारून पडलेले असताना रणांगणावर एकट्याने त्यांच्या कलेवरांतून फिरताना अनुभवली होती ती!! कवी ग्रेस यांनी ‘कृष्णएकांत’ म्हटलंय त्याला. त्या गोकुळीच्या राण्यांनाही त्या शांततेचा भार असह्य झाला होता. त्या भीषण शांततेचा गोंगाट अस्वस्थ करत होता.
प्रत्येक मुके घर असेच विखरून पडलेल्या मृत नात्यांच्या कलेवराने भरलेले आहे. घर मुके झाले आहे; किंबहुना ते घरच उरलेले नाही. जिथे श्वास नाही, तिथे अस्तित्वाचा केवळ आभास असतो. शरीर नसतेच!
‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती’, असं कवयित्री विमल लिमये म्हणते ते खरंच. पण ती जे शेवटी म्हणते ते अधिक महत्त्वाचे –
या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती!
पिल्लू उडणारच आहे, उडालेच आहे, फक्त उंबरठ्यावरच्या भक्तीची आस उरली आहे. अन्यथा, आपल्याही नशिबी ‘कृष्णएकांत’ चुकणार नाही! आजोबांच्या जगासारखी घर नावाची संस्था मुकी होत होत धुक्यात विरून गेलेली असेल.