मनोज जोशी
सिनेउद्योग हा अनेकांचा चरितार्थ चालविणारा महत्त्वाचा उद्योग आहे. याची खासियत अशी की, या उद्योगातील निर्मितीमध्ये विविध उद्योगांचे प्रतिबिंबही पाहायला मिळते. काही गाणी तर या उद्योगांना अधोरेखित करणारी आहेत. मागील लेखांमध्ये आपण अशा मराठी गाण्यांचा आढावा घेतला होता. यावेळी आपण हिंदी गाणी पाहूयात.
वास्तवात रोजगार, उद्योगाची पहिली पायरी म्हणजे, बेरोजगारी. यावरही काही गाणी आहेत, जी लोकप्रियही झाली आहेत. सर्वात आधी उल्लेख करावा लागेल तो, विनोद खन्ना याच्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील ’हालचाल ठीकठाक हैं…’ या गाण्याचा. नंतर सलमान खान अभिनीत ‘जागृती’ सिनेमातील ’हम सारे बेकार…’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. मग बूट पॉलिशने सुरुवात होते. ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील ‘ठहर जरा ओ जानेवाले…’ हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले आहे. रफी यांचेच ‘प्यासा’मधील ’सर जो तेरा चकराए…’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. ‘ज्योती बने ज्वाला’ या सिनेमातील एका गाण्यात हे दोन्ही व्यवसाय आहेत… ’तेल मालिश, बूट पॉलिश…’ हे गाणे आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायले आहे. (अर्थात, प्रत्यक्षात व्यवसाय लुटमारीचा आहे.)
हेही वाचा – प्रोफेशनमधील प्रोफेशन
वाहन उद्योग सिनेसृष्टीत जोरात चालला. 1959 सालच्या ‘छोटी बहेन’मधील ’मैं रिक्षावाला मैं रिक्षावाला…’ या गाण्याप्रमाणेच, 1970मध्ये लोकप्रिय झालेल्या ‘कुंवारा बाप’ सिनेमातील ’मैं हूं घोडा, यह है गाडी…’ हे गाणे कसे विसरता येईल. विशेष म्हणजे, ही दोन्ही गाणी विनोदवीर मेहमूद याच्यावर चित्रीत आहेत. टांगेवाल्यावरील दोन गाणी आहेत. एक राजेंद्र कुमार अभिनीत ‘तांगेवाला’ चित्रपटातील ‘ठप ठुप ठिप की ताल पर मेरा…’ हे गाणे तर, अमिताभ बच्चन अभिनीत ‘मर्द’मधील ’मर्द टांगेवाला मैं तो मर्द टांगेवाला…’ या गाण्याने चांगली लोकप्रियता मिळविली होती. टॅक्सी चालक बनलेल्या मेहमूदवर (साधू और शैतान) आणखी एक गाणे चित्रीत झाले, पण ते फारसे लोकप्रिय झाले नाही.
याशिवाय, ‘चाकू छुरीया तेज करालो…’ (जंजीर), ’डाकिया डाक लाया…’ (पलकों की छांव में), ’पैसा फेंको तमाशा देखो…’ (दुश्मन), ’चना जोर गरम बाबू मैं लायी मजेदार…’ (क्रांती), ’सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं…’ (कुली), ’सुरमा मेरा निराला…’ (कभी अँधेरा कभी उजाला), ’ले लो चुडियां…’ (सांस भी कभी बहू थी), ’आहें ना भर ठंडी ठंडी, गरम गरम चाय पीले…’ (बनफूल) ही गाणी वेगवेगळे प्रोफेशन दर्शविणारी आहेत.
यातही तीन गाण्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. यातील दोन गाणी मी काही दिवसांपूर्वीच ऐकली. (तेव्हापासूनच माझ्या मनात हा विषय घोळत होता.) सध्या रिकामे डबे-बाटल्या थेट कचऱ्यामध्ये फेकले जातात किंवा भंगारवाल्याला विकले जाते. पण एक जमाना होता, की चौकोनी पत्र्याचे डबे, कॅन आणि मोठ्या बाटल्या भंगारवाल्याला विकल्याही जायच्या आणि त्या खरेदी केल्याही जायच्या. पत्र्याचे कॅन आणि बाटल्या रॉकेलसाठी वापर केला जात असे. त्यावेळी गॅस हा घराघरात (पाइपच्याच नव्हे तर सिलिंडरच्या स्वरुपात) पोहोचलेला नव्हता. बुक केल्यावर काही महिन्यांनी तो मिळायचा. त्यामुळे प्रत्येकाकडे स्टोचा वापर व्हायचा. परिणामी, रेशनवर रॉकेल घ्यावे लागत होते आणि त्यासाठी पत्र्याचा कॅन लागत असे. यावर आधारित ‘खाली डब्बा खाली बोतल…’ हे ‘नीलकमल’ चित्रपटातील गाणे ऐकताना, डोळ्यासमोर तो काळ उभा राहिला.
हेही वाचा – असंच काहीसं आवडलेलं…
तर, अन्य दोन गाण्यांपैकी एक ज्योतिषावर तर, दुसरं चक्क ‘हजामा’बद्दल आहे. 1958 सालच्या ‘आखरी दाव’ या चित्रपटात ’इधर तो हाथ ला प्यारे…’ हे गाणे आहे. ते ऐकताना भविष्यावरचे वाटत असले तरी, प्रत्यक्षात खलनायकाला पकडण्याचा एक प्रयत्न असल्याचे दिसते. तर, ‘मुस्लिम को तस्लीम अर्ज हैं…’ हे गाणे 1968 सालच्या ’दो कलियां’ चित्रपटातील असून ते नाभिकांबद्दल आहे.
ही गाणी प्रातिनिधीक स्वरुपात असून अशी अनेक गाणी सिनेसृष्टीत ऐकायला नि पाहायला मिळतात.