नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले… गोष्ट आहे एका ‘दिदी’ची
एक सिनेमा आला होता, म्हणजे तो आला कधी अन् गेला कधी कोणाला कळलंच नाही. ‘आमरस’ त्याचं नाव होतं. माझी मोठी मुलगी नमीता तिथे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. तीन-चार दिवसांचं शूटिंग झालं आणि ती रीमा लागू (ज्यांना मी दिदी म्हणायचे) यांच्यासोबत काहीतरी बोलावं म्हणून हिम्मत करून पुढे गेली.
तिनं दिदींना विचारलं की, ‘तुम्ही हर्षा गुप्तेला ओळखता का?’
त्या म्हणाल्या, ‘हो…’
आमचं लाजरं बुजरं त्यांना म्हणाली की, ‘ती माझी आई आहे.’
झालं…!
आमच्या दिदी अशा ओरडल्या ना तिला! ‘कार्टे, अगं हे तू मला तीन-चार दिवसांनी सांगतेयस?’
‘बरं, मला सांग आईचं केस कसे आहेत? किती लांब आहेत?’ असं दिदींनी वाचरलं.
नमीताला काही कळेच ना! कारण, माझ्या मुलांनी माझा शॉर्ट हेअर कटच पाहिला होता… ती म्हणाली, ‘आईचे केस छानच आहेत. पण शोल्डर कट.’
दिदी किंचाळलीच… ‘काय, कार्टीने केस कापले?’
हेही वाचा – एक असंही वाचन…
नमीताने घरी येऊन मला हा किस्सा सांगितला. तेव्हा मी तिला सांगितलं, ‘अगं, माझे केस गुडघ्यापेक्षा लांब होते.’ (आताही माझे केस गुडघ्याखाली नसले तरी चांगलेच लांब आणि हेल्दी आहेत.) घरी असताना माझ्या केसांच्या दोन वेण्या घालणे…, दर रविवारी केस धुणे हा कार्यक्रम माझी आईच करायची.
इयत्ता दहावीनंतर मी नाटकात काम करायला सुरुवात केली. म्हणजे, Acting हेच आपलं प्रोफेशन आहे, हे काही ठरलं नव्हतं. किंबहुना, ती तेवढी अक्कलच नव्हती मला! सुधाताई करमरकरांच्या ‘लिट्ल थिएटर’पासून Actingची सुरुवात झाली.
हळूहळू एक एक टप्पा पार करत मला रिप्लेसमेन्ट म्हणून ‘सविता दामोदर परांजपे’ हे शेखर ताम्हाणे यांनी लिहिलेल्या आणि राजन ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेले नाटक मिळाले. साक्षात, रीमा लागू आणि सुधीर जोशी यांच्यासोबत काम करण्याची संधी! मला लॉटरीच लागली होती. अभिनय कसा असावा, हे मला एकही पैसा खर्च न करता शिकायला मिळत होता.
पण एक गडबड झाली. मराठी नाटक म्हटलं की दौरे आले, तेही 15-20 दिवसांचे. आली का पंचाईत! तेव्हा आमच्याकडे केस धुवायला शॅम्पू नसायचा. शिकेकाईचा लाल-केशरी रंगाचा साबण असायचा. तोच आम्ही केस धुवायला वापरायचो. पण जर 15-20 दिवस दौऱ्यावर गेलो तर, केस कोण धुणार? आणि महत्त्वाचं म्हणजे रोजच्या वेण्या कोण घालणार?
‘सविता दामोदर परांजपे’ जवळजवळ 450 प्रयोग मी केले. दौऱ्यावर रीमा दिदीने माझं टेन्शन बघितलं आणि ते कठीण काम स्वत:वर घेतलं. पूर्ण दौऱ्यात किमान दोन वेळा तरी दिदी माझे केस धुवून द्यायच्या आणि रोज सकाळी आंघोळ झाली की माझ्या वेण्या घालून द्यायच्या. मी तर हवेतच असायची की, प्रत्यक्ष रीमा दिदी माझ्या वेण्या घालतात.
पण… एक दिवशी काय झालं… ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक सायकॉलॉजिकल (psychological) टाईपचं होतं. सीन तसे सीरियस असायचे आणि एका सीनमध्ये मी चुकले. त्यामुळे दिदी डिस्टर्ब झाल्या. दिग्गज म्हणजे काय असतं, ते कळलं तेव्हा! सीन तर पार पडला. पण दिदी माझ्यावर रागावल्या. बोलेच ना! दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आंघोळ झाली आणि मी माझ्या बेडच्या कोपऱ्यात मान खाली घालून बसले होते. (दौऱ्यावर आम्ही दोघी एक रूम शेअर करायचो.)
हेही वाचा – तो आला, तो बोलला… पण…
तेवढ्यात बाहेर जाण्यासाठी दिदी तयार झाल्या आणि मला थोड्या कडक आवाजात म्हणाल्या, ‘काय वेण्या नाही घालायच्या? मला बाहेर जायचंय… उशीर होतोय… चल, पटकन कंगवा दे.’
झालं… मी सातव्या आसमानात होते! दिदीने स्वत:हून अंगावर घेतलेलं काम करून त्या बाहेर गेल्या.
मी त्या आठवणीने सुद्धा ढवळून निघते.
आज दिदी आपल्यात नाहीत. पण आठवणी अगदी मनात काहूर माजवतात. 21 जूनला दिदीचा वाढदिवस असतो आणि 19 जूनला माझा बाप्पा म्हणजे विवेक लागू, दिदीचे यजमान हे जग सोडून गेले. माझ्यावर खूप प्रेम, माया करणारी दोन माणसं आपल्यातून किती सहज निघून गेली.
मन:पूर्वक अभिवादन!