चंद्रशेखर माधव
लहानपणी आमच्या घरी घरकामाकरिता वाघ नावाची एक मध्यमवयीन महिला येत असे. आम्ही त्यांना ‘मावशी’च म्हणायचो. वाघ मावशी पूर्णपणे निरक्षर होत्या. बहुदा त्या शाळेत गेलेल्याच नव्हत्या. तरीही व्यवहाराला एकदम प्रामाणिक होत्या. म्हणतात ना ‘शिक्षण आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी असतात’… व्यक्ती अशिक्षित आहे म्हणजे तो अज्ञानीच असेल असं नसतं. प्रामाणिकपणा हा वाघ मावशींचा महत्त्वाचा गुण! त्या अनेक वर्षे आमच्याकडे येत होत्या. त्यामुळे जेव्हा त्यांना लग्नाकरिता किंवा इतर काही कारणांसाठी मोठ्या रकमेची गरज भासत असे, तेव्हा वेळोवेळी आमच्या वडिलांनी त्यांना बँकेतून कर्ज मिळवून देण्याकरिता मदत केली होती.
साहजिकच, दर महिना कर्जाचा हप्ता त्या आमच्या बाबांकडे आणून देत असत. कर्जाच्या हप्त्याच्या एक-दोन दिवस आधी सकाळी नऊच्या सुमारास वाघ मावशी यायच्या. त्याकाळी त्यांच्या कर्जाचा हप्ता कितीसा असणार? 100-110 रुपये असा काहीसा असायचा. (मात्र, त्याकाळी ही रक्कमही मोठीच म्हणावी लागेल.) त्यांना आकडेमोड फारशी येत नव्हती. पण त्यांची नोटा मोजायची एक विशिष्ट पद्धत होती, ती पद्धत फार छान होती. त्या पैसे घेऊन यायच्या. त्यांच्या कमरेला नऊवारी साडीत खोचलेल्या चंचीत ठेवलेले पैसे काढायच्या… पैसे हातात घेतले की “दहा एक, दहा दोन, दहा तीन, दहा चार…” अशा पद्धतीने दहा रुपयांच्या नोटा मोजायच्या. त्या नोटा बाजूला ठेऊन उरलेले सुट्टे पैसे मोजणार. हे झालं की, “दादा, एकदा बघ रे बराबर हाय का?” असं म्हणून पैसे माझ्या दादाच्या हातात देत.
हेही वाचा – लहानपणीची दिवाळी अन् नव्या कपड्यांची खरेदी
हे सगळे सोपस्कार पूर्ण झाले की ते पैसे माझ्या बाबांच्या हातात ठेवणार. म्हणणार, “बाबा, हे घ्या हप्त्याचे पैसे. तुमी येव्हडी मदत केली, कर्ज काढून दिलं. पैसे येळेत भरलेच पायजे.” अशा स्वरूपाची त्यांची नेहमीची ठरलेली वाक्यं असायची. तेवढं काम झालं की, तातडीने त्या त्यांच्या इतर कामाकरिता रवाना व्हायच्या.
कालांतराने माझी मुंज ठरली, त्यावेळी त्यांनी आमच्या घरातल्या कामाला पूर्णपणे वाहून घेतलं होतं. सकाळी एकदा आल्या की दिवसभराचा बहुतांश वेळ त्या आमच्या घरी मदत करण्यात घालवीत. हा उपक्रम त्यांनी जवळपास 8 ते 10 दिवस, म्हणजे मुंज लागायच्या दिवसापर्यंत सुरू ठेवला. मुख्य म्हणजे, त्यांनी त्या कुठल्याही कामाचे कसलेही अधिकचे पैसे आमच्याकडून घेतले नाही. मुंजीला जेव्हा आल्या तेव्हा प्रेझेंट देताना एक स्टीलची सुंदर छान अशी बादली मला भेट म्हणून दिली होती. ही बादली अजूनही माझ्याकडे आहे.
खूप मनमिळावू, सालस, सरळ आणि प्रामाणिक महिला होती. अशी माणसं मिळणं आता दुरापास्तच!
हेही वाचा – ब्लेझर आणि 45 दिवस
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा