Tuesday, October 28, 2025

banner 468x60

Homeललितआजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ!

आजी आणि हॉस्पिटलमधील आजोळ!

अजित गोगटे

माझ्या वयाच्या म्हणजे सत्तरीकडे झुकलेल्या कोणाच्याही बालपणीच्या स्मृतिरंजनात ‘आजी’ हा अविभाज्य घटक असणे अगदी स्वाभाविक आहे. अगदी लहान असताना मांडीवर घेऊन झोपविताना आणि थोडे मोठे झाल्यावर आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपताना, तिने सांगितलेल्या रामायण-महाभारतामधील गोष्टी, चातुर्मासातील विविध कहाण्या आणि असंख्य श्लोक तसेच स्तोत्रे हे बालपणीच्या कौटुंबिक संस्कारांचे मोठे संचित असते. माझ्याही बालपणात ‘आजी’ हा एक प्रभावी घटक नक्कीच होता, पण इतरांसारखे माझ्या वाट्याला मात्र आजीकडून हे संस्काराचे संचित आले नाही.

हिंदीमध्ये वडिलांच्या आई-वडिलांना ‘दादी’ आणि ‘दादा’ तसेच आईच्या आई-वडिलांना ‘नानी’ आणि ‘नाना’ असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आजोळ म्हटले की ‘ननिहाल’ असे गृहित धरले जाते. मराठीत मात्र फक्त आईच्या माहेराला ‘आजोळ’ म्हणण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात लग्नानंतरही मुलगा आई-वडिलांसोबतच राहात असल्याने वडिलांकडील एक आणि आईकडील एक अशा दोन स्वतंत्र आजोळांचा उल्लेख करण्याची प्रथा आपल्या मराठीत रूढ नाही. असे असले तरी, मी मात्र लहानपणी वडील आणि आई या दोन्हींकडील दोन स्वतंत्र ‘आजोळां’चे सुख अनुभवले. माझ्या याच म्हणजे वडिलांकडच्या ‘आजोळा’चे आणि त्या अनुषंगाने आजीचे (वडिलांची आई) मनात आजही ताजे असलेले अनोखे अनुभव मी येथे कथन करणार आहे. मला वाटते अशी आजी आणि तिच्याकडे ‘आजोळी’ राहण्याचे असे अनुभव क्वचितच इतर कोणाच्या वाट्याला आले असावेत.

माझी आजी म्हणजे सुभद्रा कृष्णाजी गोगटे. माझे आजोबा कृष्णाजी दशग्रंथी ब्राह्मण होते. ते पूर्वीच्या ‘जीआयपी’ रेल्वेत नोकरीला होते. दुर्दैवाने, लग्नानंतर काही वर्षांतच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आणि माझी आजी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी विधवा झाली. माझे वडील गोविंद हे आजी-आजोबांचे एकमेव अपत्य. आजोबा गेले तेव्हा माझे वडील जेमतेम दीड वर्षांचे होते. ते वर्ष बहुधा 1930 किंवा 1931 असावे. तो काळ खास करून जमीन-जुमला नसलेल्या ब्राह्मण कुटुंबांसाठी खूपच खडतर होता. अशा काळात आजीला ऐन तारुण्यात वैधव्य आले. केशवपन करून आणि ‘आलवण’ (तांबडे वस्त्र) नेसून कुटुंबात आश्रितासारखे राहायचे, एवढेच त्याकाळी अशा विधवांचे सामाजिक प्राक्तन असायचे. आमच्या आजीने मात्र ती कुप्रथा झुगारून स्वत:चे प्राक्तन निकराने बदलले. तिने घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे ठरविले. आजीने हा धाडसी निर्णय घरातील सर्व ज्येष्ठांचा विरोध पत्करून घेतला, तेव्हा तिला स्वत:चे नाव त्या काळी प्रचलित असलेल्या मोडी लिपितही लिहिता येत नव्हते. आजीच्या या निर्णयाने तिच्या लहान मुलाची म्हणजे माझ्या वडिलांची फरफट होऊ नये म्हणून त्यांचे चुलते, त्यांना आपल्या घरी गेऊन गेले. पनवेलजवळील नेरे गावात राहणाऱ्या वडिलांच्या या चुलत्यांना मूल-बाळ नव्हते. चुलत्यांनी वडिलांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि वडील त्यांचे लग्न होईपर्यंत म्हणजे 1951पर्यंत चुलत्यांकडेच राहिले.

हेही वाचा – गोष्ट माझ्या शिरा आजीची

माझ्या आजीसारख्या तरुण विधवांसाठी त्या काळी मुंबईत गिरगावमधील ‘प्रार्थना समाजा’त साक्षरता आणि व्यवसाय शिक्षणाचे निवासी वर्ग चालायचे. घराबाहेर पडलेली माझी विधवा आजी तेथे जाऊन प्रथम साक्षर झाली. त्या वर्गांसाठी ग्रँटरोडहून डॉ. अभ्यंकर नावाचा एक देवमाणूस यायचा. याच डॉ. अभ्यंकरांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने आजीने ‘प्रार्थना समाजा’तून ‘नर्सिंग अँड मिडवायफरी’चा (म्हणजे आताचे बी. एससी-नर्सिंग) कोर्स पूर्ण केला. या शिक्षणाच्या जोरावर आजी त्याच सुमारास, 1934मध्ये ताडदेव येथे सुरू झालेल्या भाटिया जनरल हॉस्पिटलमध्ये ‘स्टाफ नर्स’ म्हणून नोकरीला लागली. सुमारे 38 वर्षे तेथे नोकरी करून डिसेंबर 1971मध्ये आजी ‘असिस्टंट मेट्रन’ या पदावरून निवृत्त होऊन तिच्या मुलाकडे म्हणजे आमच्या घरी कल्याणला राहायला आली.

आमचे बिऱ्हाड कल्याणला ज्या टिळक वाड्यात होते, तो माझ्या वडिलांच्या मामाचा म्हणजे आजीच्या भावाचाच वाडा होता. आमचे घर 10 बाय 10 फुटांच्या दोन खोल्यांचे होते. वाडा मामाचा असूनही वडिलांनी ते घर रीतसर भाड्याने घेतले होते. आजी रिटायर होऊन आली, त्याच वेळी तिच्या भावाने वाड्यातील रस्त्याच्या बाजूकडील मोकळ्या जागेत दुकानांचे गाळे बांधले. त्यातील एक गाळा आजीने भावाकडून भाड्याने घेतला. आजीचा हा दुकानाचा गाळा आमच्या घराच्या खिडकीच्या अगदी समोर होता आणि त्याला मागील बाजूसही दार होते. दुकान आणि घर यामध्ये अंगण होते आणि घराच्या खिडकीत बसूनही दुकानावर लक्ष ठेवता येत असे.

आजीने तिचे बिऱ्हाड या दुकानात थाटले. दोन्ही वेळच्या जेवणासाठी फक्त ती घरात यायची. बाकी अहोरात्र तिचा मुक्काम त्या दुकानतच असे. त्या गाळ्यात आजीने 1972च्या अक्षयतृतियेला घरगुती खाद्यपदार्थांचे दुकान सुरू केले. एकेकाळी आमच्या आजीच्या या दुकानात तब्बल 176 निरनिराळे पदार्थ आणि वस्तू विक्रीला असत. त्या काळी कल्याणमधील तशा प्रकारचे ते एकमेव दुकान होते आणि ते ‘आजी’चे दुकान म्हणूनच ओळखले जाई. रीडेव्हलपमेंट होऊन वाड्यात इमारत बांधली जाईपर्यंत म्हणजे सन 1993पर्यंत सलग 21 वर्षे आजीने हे दुकान चालविले. आजी रात्री दुकानातच झोपायची. एक दिवस तेथेच झोपलेली असताना आजीला अर्धांगवायूचा झटका आला आणि संपूर्ण उजवी बाजू लुळी-पांगळी होऊन आजी अंथरुणाला खिळली.

भाटिया हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असताना आजी तेथील ‘नर्सेस क्वार्टर्स’मध्ये राहायची. इस्पितळाच्या आवारातच मागच्या बाजूला नर्सेस क्वार्टर्सची पाच मजली इमारत होती. तेथे एका प्रशस्त खोलीत दोघीजणी, अशा प्रकारे एकूण सुमारे 100 नर्सेस राहायच्या. एका मजल्यावर 12 खोल्या आणि मजल्याच्या एका टोकाला सहा शौचालये, तेवढीच स्नानगृहे, गरम पाण्याचे गिझर तसेच वॉशबेसिन अशी रचना होती. त्या काळी भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांना तसेच हवे असल्यास त्यांच्या नातेवाईकांना आणि ड्युटीवरील सर्व निवासी डॉक्टर, नर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमधूनच जेवण दिले जायचे. हे उत्तम प्रतीचे गुजराती पद्धतीचे शुद्ध शाकाहारी जेवण बनविण्याचा भटारखाना तसेच बसून जेवण्यासाठी मेस होते.

नर्सेस क्वाटर्समधील आजीची खोली हेच दिवाळीच्या किंवा नाताळाच्या सुट्टीत आठवडाभर जाऊन राहण्याचे माझे अनोखे ‘आजोळ’ होते. क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या नर्सना त्यांच्या कुटुंबातील 13 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना सुटीमध्ये काही दिवस आपल्या रूमवर राहायला आणण्याची सवलत होती. राजाध्यक्ष नावाची एक मराठी तसेच कन्याकुमारी नावाची एक केरळी नर्स या अनेक वर्ष आजीच्या रूम-पार्टनर होत्या. राजाध्यक्ष दिवाळीला तसेच केरळी नर्स नाताळात सुट्टी घेऊन आपापल्या घरी जायच्या. अशा वेळी आजी वडिलांसोबत निरोप पाठवून आम्हा तिघा नातवंडांना क्वार्टर्समध्ये राहायला बोलवायची. माझे थोरले तसेच धाकटे असे दोन्ही बंधू आजीकडे क्वार्टर्समध्ये राहायला जायला फारसे उत्सुक नसायचे. मी मात्र वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंत न चुकता दरवर्षी या हॉस्पिटलमधील ‘आजोळी’ जायचो.

आजीला मंगळवारी ‘विकली ऑफ’ असायचा. मी जाणार असेन त्या आठवड्यात आजी सकाळी 7 वाजताची ड्युटी घ्यायची. म्हणजे एक सुटीचा पूर्ण दिवस आणि इतर दिवशी संध्याकाळी 4 वाजता ड्युटी संपल्यावर आजी मला फिरायला घेऊन जाऊ शकायची. आजी तिचे आवरून सकाळी ड्युटीवर जायची. ‘सकाळी सगळ्या नर्सची आवरायची घाई असते. त्या सर्व बायकांमध्ये तू मधे लुडबुडायला येऊ नकोस. सर्व आवरून त्या कामावर गेल्या की, सावकाश उठून आंघोळ वगैरे उरकून खाली ये’, असे आजीने मला बजावलेले असायचे. त्यामुळे आजी कामावर गेल्यानंतरही मी खोलीत झोपून राहायचो. आठ-साडेआठनंतर उठून मनसोक्त आंघोळ करण्यासाठी सर्व सहा बाथरूम माझ्या एकट्यासाठी मोकळ्या असायच्या! आजीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या गंगू आणि काशी या दोन आयांना आजीने सांगून ठेवलेले असायचे. त्या माझे कपडे धुवून वाळत घालायच्या.

हेही वाचा – सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांचा पहिलाच निकाल…

अनेक वेळा मुक्कामाला आल्याने ‘गोगटे सिस्टर’चा नातू म्हणून हॉस्पिटलमध्ये मी सर्वांचाच परिचयाचा झालो होतो. मी येणार असल्याची वर्दी आजीने भटारखान्यातील ‘महाराज’ला आधीच देऊन ठेवलेली असायची. सकाळी आवरून रूममधून खाली उतरलो की प्रथम ‘मेस’मध्ये जाऊन नाष्टा करायचो. नाष्ट्याला रोज वेगळा पदार्थ असायचा. शिवाय, मोठा ग्लासभर गरम दूध आणि बटर लावलेला ब्रिटानियाचा स्लाइस ब्रेडही असायचा. आम्हाला कल्याणला स्लाइस ब्रेड बघायलाही मिळत नसे. त्यामुळे मला तो खाताना खूप अप्रूप वाटायचे. सकाळी भरपेट नाष्टा आणि 2 वाजता गरमागरम जेवण भटारखान्याच्या ‘मेस’मध्येच व्हायचे. रोज जेवणात भात, वरण, फुलके, एक उसळ, एक भाजी, लोणचे, पापड, ताक आणि एक ‘स्वीट’ असायचे. साजूक तुपाने माखलेले तव्यावरचे गरम फुलके महाराज खूप लाडाने खाऊ घालायचा. सर्व रुग्णांनाही त्यांच्या डाएटनुसार असेच सुग्रास, गरमागरम जेवण दिले जायचे. आजीला मात्र रोज त्याच चवीचे जेवण जेवण्याचा कंटाळा यायचा. मग ती अधून-मधून स्वत:चा जेवणाचा वाढलेला थाळा आयांना द्यायची आणि रूममध्ये हॉटप्लेटवर घावन करून खायची.

आजीची ड्युटी कधी जनरल वॉर्डमध्ये, कधी मॅटर्निटी वॉर्डमध्ये, कधी ऑपरेशन थिएटरमध्ये तर कधी स्पेशल रूम्समध्ये असायची. हॉस्पिटलची इमारत मी अनेक वेळा फिरल्याने ही सर्व ठिकाणे कुठे आहेत ते मला माहीत झाले होते. ‘आज ड्युटी कुठे आहे’, हे आजी जाताना मला सांगून जायची. पण हॉस्पिटमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या नानाविध गोष्टी तेथे उभे राहून अचंब्याने बघण्यातच मी एवढा मग्न असे की, आजीला तिच्या ड्युटीच्या ठिकाणी भेटायला मी दिवसभरात क्वचितच जात असे. ‘हॉस्पिटलमधून बाहेर पडून रस्त्यावर जाऊ नकोस’, ही आजीची सूचना मात्र मी तंतोतंत पाळायचो. आजी इतर नर्स, वॉर्डबॉय, आया यांना ‘मी कुठे आहे?’ असे विचारून माझ्यावर लक्ष ठेवून असायची.

सकाळी 9 ते सायंकाळी 4-4.30 पर्यंतचा वेळ कसा भुर्रकन जाई, हे मला कळतही नसे. ‘नर्सेस क्वार्टर्स’ आणि हॉस्पिटलची मुख्य इमारत यांना जोडणारा, वर रितसर छप्पर असलेला पायी चालण्यासाठीचा रस्ता होता. नाष्टा झाल्यावर इथेच माझा तास-दीड तास जायचा. ‘नर्सेस क्वार्टर्स’ला लागूनच पश्चिमेच्या बाजूस इस्पितळाचे मागच्या बाजूचे प्रशस्त गेट होते. सकाळच्या वेळी या गेटमधून पाव, दूध आणि भाजीपाला घेऊन एका पाठोपाठ एक ट्रक यायचे. त्यातील माल निगुतीने उतरवून भटारखान्याच्या कोठीच्या खोलीत नेला जायचा. ही सर्व शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी कामे न्याहाळत उभे राहणे, मला खूप आवडायचे. माझे वेळ घालविण्याचे आणि मनोरंजनाचे दुसरे ठिकाण इस्पितळाच्या मुख्य इमारतीच्या पूर्व बाजूस होते. तेथे रिव्हर्स घेऊन ट्रक उभे करण्यासाठी जागा आणि त्यालाच जोडून सीमेंटच्या उताराचा एक धक्का होता. येथे इस्पितळाचे धोबीघाटावरून धुवून आणलेले कपडे पोहोचविण्यासाठी तसेच धुवायचे कपडे घेऊन जाण्यासाठी ट्रक यायचा. स्वच्छ धुवून इस्त्री केलेल्या शेकडो पांढऱ्या शुभ्र बेडशीट्स, उश्यांचे अभ्रे, हात पुसायचे छोटे नॅपकिन आणि मोठे टॉवेल, ऑपरेशन थिएटरमध्ये वापरायचे डॉक्टर तसेच नर्सेसचे गाऊन्स आणि अॅप्रन अशा असंख्य प्रकारच्या कपड्यांचे गठ्ठे ट्रकमधून व्यवस्थित उतरविले जायचे. तसेच धुवायच्या खराब कपड्यांची भली मोठी बांधलेली गाठोडी ट्रकमध्ये चढविली जायची. धुवून, इस्त्री करून आणलेले कपडे मोजून घेण्यासाठी आणि धुवायचे कपडे मोजून देण्यासाठी इस्पितळाने नेमलेले कर्मचारी असायचे. जेथे कपडे हमखास खराब होणार, अशा इस्पितळासारख्या ठिकाणी हे सर्व कपडे गडद रंगाऐवजी पांढरे का वापरतात? याचे माझ्या बालमनाला कोडे पडत असे. तसेच हे एवढे कपडे रोज धुवून, वाळवून त्यांना इस्त्री करण्याचे काम कोण करते आणि कुठे होते? असा प्रश्नही मला पडे. नंतर कित्येक वर्षांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यावर हे कपडे जेथे धुतले जातात तो महालक्ष्मी येथील प्रचंड मोठा धोबीघाट मी पाहिला आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

याच ठिकाणी इस्पितळाला लागणारी औषधे तसेच अन्य रुग्णोपयोगी सामान घेऊन ट्रक यायचे. त्यातील खोकेही नीट मोजून, नोंद करून उतरवून घेतले जायचे. येथे उतरविले जाणारे धोबीघाटावरून आलेले कपडे आणि अन्य सामान तिसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये नेण्यासाठी एक खास प्रशस्त लिफ्ट होती. कपडे आणि सामान उतरवून घेऊन ते लिफ्टने वर नेण्याचे काम दिवसांतून कित्येक तास चालायचे. ते उत्सुकतेने न्याहाळत मी तेथे बसून असायचो. इस्पितळाच्या समोरच्या आवारात तसेच पूर्व आणि पश्चिमेकडील बाजूच्या मोकळ्या जागेत फुलझाडांची सुंदर बाग होती. तेथे इस्पितळाचे माळी नळीने झाडांना पाणी घालणे आणि मशागतीची अन्य कामे करत असायचे. माझे विरंगुळ्याचे तेही एक आवडते ठिकाण असायचे.

हेही वाचा – उकितामो आणि आरीगातो

सकाळचे 10.30-11 वाजले की, माझा मुक्काम हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी असायचा. (पूर्वी या प्रवेशद्वाराच्या समोर प्रशस्त अर्धवर्तुळाकार पोर्च आणि त्यात एक कारंजे होते. रस्ता रुंदीकरणात जागा गेल्याने हल्ली हे पोर्च आणि कारंजे जाऊन इस्पितळाचे मुख्य प्रवेशव्दार थेट रस्त्यावर आले आहे.) तीन पायऱ्यांनी वर चढून जाव्या लागणाऱ्या या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस बसायला सिमेंटचे बाक केलेले होते. एका बाजूला अहोरात्र सुरू असणारे औषधांचे दुकान होते आणि दुसऱ्या बाजूला एक भैय्या भली मोठी, रसाळ मोसंबी विकायला घेऊन बसलेला असायचा. प्रवेशद्वाराच्या एका कोपऱ्यात नेहमी घासून-पुसून लख्ख असलेली एक भली मोठी पितळी घंटा टांगलेली असायची. शहरातील जे बाहेरचे मोठे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ‘ऑननरी’ म्हणून यायचे त्यांच्या आगमनाची सूचना या घंटेने टोल देऊन सन्मानपूर्वक दिली जायची. हृदयावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. पंडा यांच्यासाठी सहा टोल, डॉ. साठे आणि डॉ. गोखले यांच्यासाठी पाच टोल अशी डॉक्टरांच्या ज्येष्ठतेनुसार दिल्या जाणाऱ्या टोलांची संख्या ठरलेली असे. संबंधित डॉक्टर मोटारीतून पोर्चमध्ये पायउतार झाले की, त्यांच्या मानानुसार घंटेवर टोल दिले जायचे. याने कोण डॉक्टर आले, याची खबर संबंधितांना मिळून त्यांची त्यानुसार धावपळ सुरू व्हायची. हॉस्पिटलच्या या पोर्चमध्ये आणि प्रवेशद्वारावर मोटारी, रुग्णवाहिका तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ दिवसभर सुरू असायची. हे सर्व न्याहाळत तेथे बसणे हा माझा विरंगुळा असे.

मला लिफ्टचे अप्रुप वाटायचे. त्यामुळे लिफ्टने वर-खाली ये-जा करत विविध मजल्यांवर आणि विविध वॉर्डांमध्ये फेरफटका मारणे हेही माझे वेळ घालविण्याचे तसेच नव्या गोष्टी पाहण्या-शिकण्याचे माझे मोठे साधन असायचे. विशेषत:, कोणीही रुग्ण ओळखीचा नसला तरी वॉर्डमध्ये फिरून तेथे जे काही चालले असेल ते उत्सुकतेने पाहणे मला मनापासून आवडायचे. मला त्या वॉर्डांची रचना, स्वच्छता आणि टापटीप खूप आवडायची. भाटिया हॉस्पिटलमधील त्यावेळचे वॉर्ड भरपूर नैसर्गिक उजेड आणि हवा असलेले असे प्रशस्त असायचे. या वॉर्डला व्हरांड्याच्या तसेच बाहेरच्या अशा दोन्ही बाजूंना मोठ्या खिडक्या असायच्या. दोन खाटांमध्ये भरपूर अंतर ठेवून वॉर्डमध्ये 24 खाटा असायच्या. वॉर्डच्या मध्यभागी एका वेळी दोन स्टाफ नर्स बसू शकतील असे सेंटर टेबल असायचे. ‘गोगटे सिस्टरचा नातू’ म्हणून ओळखत असल्याने वॉर्डमध्ये मी विना-आडकाठी फिरत असे. अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक कुतुहलाने बोलावून घेऊन माझ्याशी गप्पा मारायचे.

आजी संध्याकाळी कामावरून सुटली की, ती मला रोज एकेका ठिकाणी फिरायला घेऊन जायची. गांवदेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, वर उल्लेख आलेल्या डॉ. अभ्यंकर यांचे घर, आजीच्या एका बहिणीचे घर आणि गिरगावातील माझ्या चुलत आत्याचे घर अशी ही ठिकाणे ठरलेली असायची. मंगळवारी सुटीच्या दिवशी संपूर्ण दिवस मोकळा असल्याने आम्ही जरा लांब म्हणजे आजीच्या आणखी एका बहिणीच्या घरी चेंबूरला सांडूवाडीत जायचो.

डॉ. अभ्यंकर यांना आम्ही ‘डॉक्टर आजोबा’ म्हणायचो. तेव्हा ते सत्तरीकडे झुकलेले होते. त्यांचे घर ग्रँट रोडला हनुमान लेनमध्ये होते. मूल-बाळ कोणी नसल्याने डॉक्टर आजोबा आणि डॉक्टर आजी असे दोघेच घरात असायचे. डॉक्टर आजोबा हे खूपच लाघवी आणि प्रेमळ होते. ते मला एक दिवस आग्रहाने राहायला सांगायचे, माझे खूप कोड-कौतुक करायचे. त्यांच्या घरी परीटघडीची स्वच्छता आणि टापटीप असायची. माझ्यामुळेच त्यांच्या पलंगावरील बेडशीटला कधी नव्हेत त्या सुरकुत्या पडायच्या. परंतु डॉक्टर आजी-आजोबांना घरात कोणीतरी लहान मूल असल्याचा कोण आनंद व्हायचा! मी सकाळ-संध्याकाळी डॉक्टर आजोबांसोबत त्यांच्या दवाखान्यात जायचो. बरेच रुग्ण घरीही यायचे. डॉक्टर आजोबा त्याना तपासून औषध देत असताना मी ते सर्व बारकाईने पाहात राहायचो. एरवी डॉक्टर आजोबा दुपारी वामकुक्षी करायचे तेव्हा डॉक्टर आजी एकट्याच पत्त्यांचा डाव मांडून बसायच्या. मी असलो की, त्या माझ्याशी आग्रहाने मांडीणडाव किंवा चित्र लॅडिस खेळायच्या.

आजीची एक बहिण ताडदेवला पारशी लेनमध्ये राहायची. येसू असे तिचे नाव. ती मूक-बधीर आणि विधवा होती. एका अत्यंत सत्शील पारशी कुटुंबाकडे स्वयंपाक तसेच घरकाम करून त्यांच्याच घरी राहायची. तिची पारशी मालकीण एवढी चांगली आणि प्रेमळ होती की, ते घर जणू माझ्या आजीच्या बहिणीचेच आहे, असे मला वाटायचे. त्या घरासंबंधीची आजही माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे तेथील रंगीत काचांच्या चहूबाजूंना असलेल्या खिडक्या. आम्ही संध्याकाळी तेथे जायचो तेव्हा कलत्या उन्हाची तिरीप त्या रंगीत काचांमधून पडून सर्व खोल्यांच्या फरश्यांवर सुंदर रांगोळी काढल्यासारखी नक्षी उमटलेली असायची. स्वत: घरकाम करणारी ही आजीची बहीण त्या घरात तिच्या मालकिणीच्या आग्रहाखातर आम्हाला काही तरी गोड-धोड करून खाऊ घालायची. घरातील मोलकरणीलाही सन्मानाची आणि बरोबरीची वागणूक देणारी अशी मालकमंडळी हल्लीच्या जमान्यात शोधूनही सापडायची नाहीत.

आजीची सांडूवाडीत राहणारी सोनूताई कार्लेकर ही बहीणही विधवा होती आणि तिला दोन मुली होत्या. तीही नोकरी करायची. जवळच राहणाऱ्या, वकील असणाऱ्या दीराचा तिला खूप मोठा आधार होता. तिचे घर सांडूंच्या आयुर्वेदिक औषध कारखान्याच्या आवारातच होते. त्या कारखान्याच्या आवारात औषधांच्या जुन्या रिकाम्या बाटल्यांचा डोंगराएवढा ढीग रचून ठेवलेला असायचा. याच बाटल्या स्वच्छ धूवून घेऊन तसेच नवे झाकण आणि सील लावून औषधे भरण्यासाठी पुन्हा वापरल्या जायच्या. आजीच्या या बहिणीकडे मी एक-दोन वेळा मुक्कामाला राहिलो तेव्हा सांडूंचा तो औषध कारखाना मी आतून फिरून पूर्ण पाहिला होता. तेथे येणारा ताज्या काढ्यांचा आणि आसवांचा विशिष्ट वास आजही माझ्या नाकात ताजा आहे.

हेही वाचा – वपुंबद्दल लिहिण्यासारखं खूप, पण…

गिरगावातील आत्याकडेही मी काही वेळा मुक्कामाला राहायचो. तिचे यजमान मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायात नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्यासोबत मी दिवसभर ग्रंथसंग्रहालयात जायचो. तेथे पहाटे उठून दूध केंद्रावरून सरकारी दूध योजनेचे बाटलीचे दूध आणणे आणि संध्याकाळी गिरगाव चौपाटीवर जाऊन भेळ-पाणीपुरी खाणे हे ठरलेले असायचे. आजीला नर्सच्या ड्रेसच्या वर्षाला सहा पांढऱ्या फूल वायलच्या साड्या हॉस्पिटलकडून मिळायच्या. सुरुवातीस आजी ड्रेसची नऊवारी आणि नंतर पाचवारी साडी नेसायची. या सहापैकी तीन साड्यांवर आजी वर्ष काढायची आणि बाकीच्या तीन साड्या प्रिंट करून घेऊन माझ्या आईला वापरण्यासाठी पाठवून द्यायची. साड्या प्रिंट करण्याचे हे ठिकाण माझ्या या गिरगावातील आत्याच्या घराजवळच फडके गणपती मंदिरापाशी होते. साड्या प्रिंट करण्याच्या या कारखान्यात प्रिंट करताना खाली जे जाडसर कापड घातले जायचे त्याच्यावर नाना रंगांतील तसेच नानाविध आकारांची नक्षी उमटलेली असयाची. ठराविक वेळा वापरून झाले की, हे जाडसर कापड बदलले जायचे. आम्ही ते कापड त्या कारखानदाराकडून आणून घरी गाद्यांवर घालण्यासाठी बेडशीट्स म्हणून वापरायचो!

आजीसोबत एकदा गांवदेवी मंदिरात गेलो असताना तेथे सु. ग. शेवडे यांचे कीर्तन सुरू होते. आजी बसली म्हणून मीही थोडा वेळ कीर्तनाला बसलो. त्यावेळी म्हणजे सुमारे 55 वर्षांपूर्वी शेवडेबुवांनी कीर्तनात सांगितलेल्या एका गोष्टीतून मी आयुष्यभरासाठी खूप मोठा धडा शिकलो. ती कथा एका ब्राह्मणाची होती. हा ब्राह्मण संध्याकाळच्या वेळी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यास निघाला. ‘थोड्याच वेळात अंधार पडेल. पुढे वाटेत घनदाट जंगल आहे. काळोखात जंगलात वाट चुकलात तर पंचाईत होईल. तेव्हा उद्या सकाळी निघा’, असा गावकऱ्यांनी सल्ला दिला. परंतु तो ने जुमानता ब्राह्मण निघाला आणि रात्री जंगलात भरकटला. शेवटी तहान आणि भूकेने व्याकूळ होऊन तो मूर्च्छा येऊन एका झाडाखाली पडला. काही वेळाने तो शुद्धीवर आला. त्याला दूरवरून वाद्यांचे आवाज ऐकू आले आणि काळोखात प्रकाशाचे ठिपके नाचताना दिसले. जीवाच्या भीतीने तो त्या आवाज आणि प्रकाशाच्या दिशेने खुरडत-खुरडत गेला. जंगलातील आदिवासी त्यांच्या देवीचा उत्सव साजरा करत असल्याचे ब्राह्मणला जवळ पोहोचल्यावर समजले. त्या आदिवासींपासून काही अंतरावर तो ब्राह्मण पुन्हा मुर्च्छित होऊन पडला. नाच-गाणे संपल्यावर आदिवासींचे त्याच्याकडे लक्ष गेले. तोंडावर पाणी मारून आदिवासींनी त्याला शुद्धीवर आणले. आदिवासींनी ब्राह्मणाला प्यायला पाणी दिले आणि देवीचा प्रसाद म्हणून केलेली तेथेच जंगलात पिकविलेल्या कडधान्यांची उसळ खायला दिली. ब्राह्मणाने सुरुवातीस दोन द्रोण उसळ मिटक्या मारत खाल्ली. आणखी हवी का? असे विचारल्यावर मात्र त्याच्यातील ‘ब्राह्मण’ जागा झाला आणि मी ब्राह्मण असल्याने तुमच्या हातचे अन्न मला कसे चालेल? असे त्याने त्या उपकारकर्त्या आदिवासींना विचारले. शेवडेबुवांनी ही गोष्ट खुमारदारपणे सांगून ब्राह्मणी जातीयवादाच्या पाखंडावर मार्मिकपणे बोट ठेवले होते. शेवडेबुवांची ती गोष्ट माझ्या मनावर एवढी कोरली गेली की, तेव्हापासून माझ्याच ज्ञाती बांधवांकडे तसेच त्यांच्या क्रियाकलापांकडे पाहण्याची माझी दृष्टी आमूलाग्र बदलून गेली!

नोकरीनिमित्त हॉस्पिटलच्या ‘नर्सेस क्वार्टर्स’मध्ये राहणारी आजी आणि तिच्या निमित्ताने अनोख्या ‘आजोळा’चा अनुभव मला घेता आला. त्या सुमारे आठ वर्षांच्या अनुभवांचे माझ्या भावी आयुष्यातील जडणघडणीत योगदान किती आणि कोणते हे नेमके सांगणे कठीण आहे. परंतु हे अनुभव खचितच मुलखावेगळे आहेत आणि म्हणूनच मी ते एवढ्या सविस्तरपणे शेअर केले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!