गेल्या महिन्यात फेसबुकवर नीलिमा आणि तिच्या नवऱ्याचे म्हणजे सुभाषचे केरळ सहलीचे फोटो बघितले होते. माझ्या छानपैकी लिहिलेल्या कमेंटवर तिने एक दिवस सकाळी तिच्या घरी चहा नाश्त्याला यायचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार काल सकाळी ठीक आठ वाजता मी तिच्या घरी पोहोचलो. सुभाषने म्हणजे नीलिमाच्या नवऱ्याने दार उघडून माझे स्वागत केले. नीलिमा आणि सुभाष माझे कॉलेजचे मित्र होते.
स्वयंपाकघरातून नाश्त्याचा घमघमाट बाहेरच्या खोलीपर्यंत पोहोचला होता.
“बस रे आरामात सतीश!” नीलिमाचा आतून आवाज आला.
“हो, हो, सावकाश होऊ दे तुझं… तोपर्यंत मी आणि सुभाष मस्तपैकी गप्पा मारत बसतोय.”
आम्ही तिघेही खरंतर आता ज्येष्ठ नागरिक होतो; पण तरीही आमच्या तब्येती छानपैकी सांभाळून होतो. गेल्या महिन्याच्या मध्याला सुयशचे लग्न झाले होते. सुयश म्हणजे नीलिमा आणि सुभाषचा धाकटा मुलगा. मोठा आदित्य अमेरिकेत असतो आणि दोन नंबरची मुलगी स्नेहा जर्मनीमध्ये असते. सुयश व्यवसायाने डॉक्टर होता. सुयशचे लग्न त्याच्या इच्छेनुसार साध्या पद्धतीने झाले होते. आमच्या गप्पा सुरू असतानाच नीलिमा आतून उपम्याच्या डिश घेऊन आली.
“अहाहा, काय मस्त सुगंध येतोय…”
उपम्यावर थोडी शेव आणि कोथिंबीर घातलेली. वरतून लिंबू पिळलेले होते. सोबत पापड होते. किटलीमध्ये चहा देखील करून ठेवला होता नीलिमाने.
“मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, सुयशचे आताच लग्न झाले आणि तुम्ही दोघे केरळला इतक्या घाईने कसे काय गेलात?”
“सतीश, त्याचे काय आहे… सुदैवाने, आम्ही दोघेही एकाच विचाराचे आहोत! सुयशचे लग्न झाले आणि आम्ही आमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून खऱ्या अर्थाने मुक्त झालो आहोत. आता यापुढे आमचे आयुष्य आम्ही आमच्या पद्धतीने जगणार आहोत. घरातील पाशात अडकलेले आमचे आयुष्य आम्ही हळूहळू, पण प्रयत्नपूर्वक सोडवत आहोत. इतके दिवस सर्व जबाबदाऱ्या पार पडणारे आम्ही आता खऱ्या अर्थाने बॅक स्टेजला गेलो आहोत…”
हेही वाचा – मातृत्वाची दिवाळी!
“सुयश आणि पल्लवीला त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायची पूर्ण मोकळीक आम्ही दिली आहे. त्यांच्या आयुष्याच्या रंगमंचावर आता त्यांना त्यांच्या संसाराचे नाटक मोठ्या ताकदीने, विश्वासाने आणि उमेदीने उभे करायचे आहे. त्यात सुखाचे, आरोग्याचे आणि आनंदाचे रंग भरायचे आहेत आणि दोन्हीकडच्या नात्यातील नाट्यगृहात त्याचे यशस्वी प्रयोग त्यांना सतत करायचे आहेत.”
“आम्ही दोघे आहोतच त्यांच्या सोबत… पण आता विचारपूर्वक फक्त बॅक स्टेजला आहोत. त्यांचं नाटक आता त्यांनाच पुढे न्यायचे आहेत यशस्वीपणे. आजवर खस्ता खात, कष्ट करत प्रसंगी आमची हौसमौज विसरून जाऊन आम्ही आमच्या तीनही मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. आदित्य आणि स्नेहा त्यांच्या त्यांच्या संसारात मजेत आहेत. सुयश देखील आता त्याच्या दादा आणि ताईच्या पावलावर पाऊल टाकायला सज्ज आहे. मी आणि सुभाष खऱ्या अर्थाने समाधानी आहोत. आमच्या आईवडिलांकडून आमच्याकडे आलेले संस्करांचे आणि शिक्षणाचे बाळकडू आता आम्ही आमच्या मुलांना दिले आहे. ही परंपरा अशीच पुढे जाईल याची खात्री आम्हाला आहे…”
हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?
नीलिमा आणि सुभाषने विचारपूर्वक घेतलेला निर्णय, उपम्यापेक्षा देखील चविष्ट होता. दोघांचेही खरोखर कौतुक करावे तितके थोडे आहे. काहीतरी नवीन विचार मिळालेल्या खुशीत मी त्या दोघांचा निरोप घेतला. खरंच, प्रत्येक आई-वडिलांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यावर वेळीच बॅक स्टेजला जायचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे; जेणेकरून त्यांना त्यांची बकेट लिस्ट पूर्ण करायची संधी मिळेल. जुन्या आणि नवीन पिढीत कायम सुसंवाद राहील. जेणेकरून घराचं घरपण टिकवणं सहज शक्य होईल…


