आराधना जोशी
गणेशोत्सवामुळे सर्वत्र वातावरण भारलेलं आहं. तसं पाहिलं तर, यात नवीन काहीच नाही. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती, उत्तम पुत्र, आद्यदेवता, उत्तम लेखनिक, उत्तम योद्धा, उत्तम संघटक, विघ्नहर्ता, मंगलदाता, मुत्सद्दी असे विविध गुण अंगी असणाऱ्या गणेशाचे वाजत-गाजत जंगी स्वागत केले जाते. त्याची यशाशक्ती, मनोभावे पूजा केली जाते. बाप्पासमोर हात जोडून उभे राहून त्याची सुंदर मूर्ती डोळ्यांत आणि मनात साठवण्याचा भक्त प्रयत्न करतो.
खरंतर, इतर सर्वच देवांपेक्षा गणपतीचे रूप काहीसे वेगळे आहे. इतरांप्रमाणे तो मोहक, सुकुमार असा नक्कीच नाही. उलट लंबोदर, मोठ्या कानांचा, बारीक डोळ्यांचा असणारा हा गणेश म्हणूनच इतर देवांपेक्षा वेगळा दिसतो. हा एकमेव असा देव आहे, जो कोणत्याही रूपात अत्यंत मोहक आणि आकर्षक वाटतो. मग ते बालगणेशाचं रूप असो किंवा सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती असोत. चित्रकला, शिल्पकला, मूर्तीकला यातूनही दिसून येणारं बाप्पाचं रूप मनाला भुरळ घालणारं असतं. बाळांनाही गणेशाचं रूप लगेच ओळखू येतं आणि त्यांचे हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातात, ते त्याच्या असणाऱ्या रूपाच्या वेगळेपणामुळेच.
मुलांच्या अभ्यासाची सुरुवात होते, ती पूर्वी पाटीवर आणि आता वहीत ॐ लिहूनच. म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊलींनीही ॐकार स्वरूप गजाननालाच वंदन केलं आहे. ज्ञानी लोकांच्या मते गजानन हे ॐकाराचं व्यक्त, मूर्त रूप आहे. गणांचा अधिपती तो गणपती. म्हणजेच गणपती हा समूहाचं नेतृत्व करणारी देवता आहे. ‘गण’ म्हणजे अष्टवसूंचा समूह. वसू म्हणजे दिशा. याचाच अर्थ गणपती हा आठ दिशांचा पती आहे.
रामदास स्वामी यांनीही मनाच्या श्लोकाची सुरुवात ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ अशी केली आहे. म्हणजे, जगातील सर्व चांगले गुण, चांगल्या गोष्टी त्याच्या ठायी एकवटल्या आहेत. गणपतीच्या ठायी असणाऱ्या याच गुणांमुळे त्याला ‘गुणेश’ या नावानेही संबोधले जाते. गणपती हा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असल्यामुळे, प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. शुभकार्यारंभी पूजनाच्या वेळी गणपतीची मूर्तीच असावी, असे नाही. तांदूळ, सातू किंवा गहू यांच्यावर सुपारी किंवा नारळ ठेऊन; त्यावर गणपतीचे आवाहन करून पूजा केली जाते.
गजानन म्हणजे ‘गजाचे तोंड’ असणारा. यातील ‘गज’ या शब्दातील अक्षरे उलट वाचली तर त्याचा अर्थ होतो ‘जग’. जग हे ज्याचं प्रकट रूप आहे (आनन) तो गजानन असाही एक अर्थ त्यामागे आहे. याशिवाय, लांब, लवचिक, बहुपयोगी असणारी सोंड, महाकाय शरीर, सुपासारखे कान, बारीक डोळे, सुळे, गंडस्थळ या सगळ्यामुळे हत्ती इतर प्राण्यांमध्ये उठून दिसतो. तसेच, त्याची बुद्धीमत्ता आणि प्रचंड ताकद याचंही माणसाला आदीम काळापासून आकर्षण वाटत आलं आहे. या गुणवैशिष्ट्यांमुळेच कदाचित हत्तीच्या मुखाची निवड गणपतीला मूर्त रूप देताना करण्यात आली असावी.
हेही वाचा – संवादाची भाषा झाली ‘ॲडव्हान्स’
विशाल कान सूक्ष्मातील सूक्ष्म आवाज ग्रहण करू शकतात, बारीक डोळ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करणे सोपे असते. या दोन्ही गोष्टी ज्ञानार्जनासाठी किती महत्वाच्या असतात ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचं विशाल गंडस्थळ हे अन्यायाविरुद्ध केल्या जाणाऱ्या प्रतिकाराचं (जोरदार बसणारी धडक) आणि बुद्धिमत्ता दर्शवणारी आहे. तर, सोंड ही बहुपयोगी आणि अतिशय संवेदनशील आहे. तिच्याच मदतीने हत्ती आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करत असतो, तिचा आढावा घेत असतो. म्हणजेच, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सगळे गुण गजमुखात एकवटलेले आहेत. इथे विद्यार्थी असा उल्लेख केला आहे, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. कारण आपण आयुष्यभर विविध प्रसंगांमधून शिकतच तर असतो! समोरच्या परिस्थितीचा अंदाज घेत, त्यावर काय प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद द्यायचा हे ठरवत असतो. यातूनच तर आपण वैयक्तिक प्रगती करत असतो. त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे गणपती, गजानन.
त्याचंच आणखी एक नाव म्हणजे लंबोदर. लांब उदर किंवा पोट असणारा. याचा अर्थ, जे जे तुम्हाला इतरांबद्दल काही वाईट समजलं आहे किंवा ज्ञात झालं आहे, ते ते तुमच्याकडेच ठेवा, पचवायला शिका. शिवाय, गणपती उत्तम लेखनिक आहे. म्हणूनच, महर्षी व्यास यांनी गणपतीला आपल्यासाठी ‘महाभारता’चे लेखन करण्याची विनंती केली होती. मात्र त्यातही त्याने अनेक कूटप्रश्न सहजपणाने गुंफलेले आहेत, असं अभ्यासकांचं मत आहे. यातील अनेक कूटप्रश्न आजपर्यंत सोडविणे शक्य झाले नसल्याचंही अभ्यासकांनी नमूद केलं आहे.
मोदक हे गजाननाचे आवडते पक्वान्न. पण यातही एक अर्थ दडला आहे. ‘मोद’ म्हणजे आनंद आणि ‘क’ म्हणजे लहानसा भाग! त्यामुळे मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. ‘मोदक पाहिल्यानंतर आनंद झाला नाही;, असा माणूस विरळा! गणेश हा एका हाती मोडलेला दात धारण करणारा आहे, असे त्याचे रूप अथर्वशीर्षात सांगितले आहे.
श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची देवता आहे. ‘मोदक’ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. या कारणामुळे ‘श्री गणेशा’च्या हातात मोदक दाखवण्याची पद्धत असावी, असे सांगतात. मोदकाला ‘ज्ञानमोदक’ असेही म्हणतात. ‘ज्ञान प्रथम थोडे आहे’, असे वाटते. मोदकाचे टोक, हे याचे प्रतीक आहे. अभ्यास करू लागल्यानंतर लक्षात येते की, ज्ञान पुष्कळच मोठे आहे. मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे. मोदक गोड असतो आणि ज्ञानप्राप्तीचा आनंदही तसाच असतो.
पार्थिव गणेशपूजन म्हणजे मातीची छोटी गणेशमूर्ती बनवून गणेशोत्सवादरम्यान त्याची घरोघरी वा सार्वजनिक ठिकाणी स्थापना करणं, हे प्रतीक पूजन सांगितलं आहे. या प्रतीकामध्ये श्रद्धा ठेवून त्यात जिवंतपणा आहे, असं समजण्यासाठी त्याची विधीवत पूजा करून त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते. या मानवी भावना आणि श्रद्धा जिवंत असणं आज खूप गरजेचं आहे. जिथे माणसा-माणसामधला विश्वास कमी होत आहे, तिथे असा श्रद्धा आणि भक्तीचा प्रयत्न निश्चितच आवश्यक आहे.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
केवळ भारतातच नाही तर, जगभरात गणेशाची अनेक रूपे बघायला मिळतात. भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत. यातील काही गणेशमूर्ती द्विभूज आणि मोदकभक्षणरत आहेत. काहींच्या हातात मोदकभांडे, कुर्हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात. गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली. जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत. यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून, अभंगदेह, सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे.