डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
मायलेकीची जोडी ओपीडीत आली होती. देहबोलीवरनंच दोघी घरी भांडणं करून आल्याचं स्पष्ट समजत होतं… ‘इट्स नन् ऑफ माय बिझनेस’… पण आपल्याकडे पालक मंडळी फार वेळ गप्प राहू शकत नाहीत; किंबहुना आपल्या पाल्याला चारचौघात लज्जित करणं हा आपला अधिकार समजतात. यामुळं “हिचं डोकं दुखतं, जेवत नाही यांव त्यांव…” झाल्यानंतर “जातीचंच पोरगं आहे हो, पण गुन्हेगार आहे…” म्हणत आईनं सरतेशेवटी मुलीची पोलखोल केलीच!
मुलीनं इशारे करूनही आईसाहेब काही थांबेनात “प्रेम वगैरे आपल्यालाही कळतं, पण हा वेडेपणा नाही का? मागं तर त्याच्याकडं बंदूक सापडली… ब्ला ब्ला…” सुरूच होतं…
इट वॉज ‘हायब्रिस्टोफिलीया’! एखाद्याला गुन्हेगार किंवा हिंसक व्यक्तीबद्दल एक गूढ आकर्षण वाटतं, जे हळूहळू प्रेमात रुपांतरित होतं… याची एक ना अनेक कारणं असतात. जसं सत्ता किंवा नियंत्रणाचे आकर्षण, धोका पत्करणे वा रोमांचकारी भावना आणि मी त्याला बदलू शकते असा भ्रम…
ती मुलगी त्या व्यक्तीबद्दल अत्यंत आदरानं बोलते, “तो तसा नाही,” अशी भलामण करते आणि “हे आकर्षण नाही तर, प्रेम आहे,” असा दावा करत सहानुभूती आणि प्रेम यातली रेषा विसरून जाते…
हेही वाचा – मन ‘आता’वर टिकून राहणं गरजेचं!
इतकं टेक्निकल तुम्हाला कळणार नाही, पण या आजाराला ‘बोनी अँड क्लाईड सिंड्रोम’ असं म्हटलं जातं, असं म्हणत मुलीला बोनी आणि क्लाईडची गोष्ट थोडक्यात सांगितली. त्यावर विचार करायला सांगून, लक्षणजन्य औषधं देत रवाना केलं…
30च्या दशकात अमेरिकेत महामंदी आली होती, तेव्हा यंत्रणेविरुद्ध लढणारे, चोऱ्या करणारे यांच्याबद्दल तरुणींना एक आकर्षण वाटू लागलं… याच कडीत एक हळव्या मनाची एकोणीस वर्षीय, कविता करणारी ‘बोनी पार्कर’ आणि बालवयातच गुन्हेगारीत अडकलेला बोलका ‘क्लाईड बॅरो’ यांची भेट झाली अन् दोघं एकमेकांत गुंतले!
हळूहळू दोघांनी मिळून ‘बॅरो गॅंग’ तयार करत दुकानं, बॅंका, गॅस स्टेशन अशा ठिकाणी चाकूचा धाक दाखवत लुटमार सुरू केली… दोघांना वृत्तपत्रात ‘लव्हर्स ॲान द रन’ म्हणून प्रसिद्धी मिळाली! त्यांनी 13हून अधिक लोकांना ठार मारले आणि एकदा पोलिसांच्या गोळीबारात ते दोघेही मारले गेले… पण मृत्यूनंतर एक दंतकथा बनून राहिले…
हेही वाचा – निर्णय… योग्य की अयोग्य?
या घटनेनंतर मानसशास्रज्ञ आणि मनोविश्लेषकांनी यातला मनोव्यापार अभ्यासला. यात बोनीनं गुन्ह्यांना प्रेमाचा एक भाग म्हणून स्वीकारलं होतं, असं निरीक्षण समोर आलं. ‘जॉन मनी’ नामक मानसशास्रज्ञानं या मनोवस्थेस ‘हायब्रिस्टोफिलीया’ असं संबोधन दिलं; पण माध्यमात मात्र ‘बोनी अँड क्लाईड सिंड्रोम’ हे नाव लोकप्रिय झालं… तुमच्या आजूबाजूला अशी केस वा उदाहरणं दिसली तर, त्यांनाही ही गोष्ट सांगा… एरवीही असतोच, पर यह अलगही ‘केमिकल लोच्या’ हैं, प्यार नहीं!


