Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अहंकार

    October 20, 2026

    नाते

    October 20, 2026

    फक्त पोटच्या लेकरासाठी…

    October 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फक्त पोटच्या लेकरासाठी…
    ललित

    फक्त पोटच्या लेकरासाठी…

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलOctober 20, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, ॲड कृष्णा पाटील, लेखक कृष्णा पाटील, वकील कृष्णा पाटील, बापाची माया, चूक की बरोबर, गिरीशची कुसंगत, गिरीशचे शिक्षण, गणपत गंगू, गणपतचा संताप, निर्व्यसनी गणपत, गिरीशचे लग्न, गिरीशची नोकरी, मित्रांची पार्टी, गिरीशचा बदला, गिरीशचे हित
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    गिरीश लहानपणापासूनच गणपतच्या कडकपणात वाढला. चुका केल्या की, समजावणं कमी आणि बापाचा मारच जास्त. गणपतला वाटायचं – “आज जर हात उगारला नाही, तर उद्या हा वाकड्या वाटेवर जाईल. नको त्या मुलीच्या नादी लागला, तर आयुष्य बरबाद होईल. कुठले व्यसन लागले तर जगणं मुश्किल होईल.” हीच काळजी त्याला होती. त्यामुळे गणपतची प्रतिमा ‘मारका बाप’ अशीच झाली होती. चांगल्या गुणांचं कौतुक होतच होतं. परंतु बऱ्याच वेळेला गिरीश चुकाच जास्त करायचा. ज्या चुका अत्यंत गंभीर होत्या. त्या चुका तशाच राहू दिल्या असत्या तर, त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला असता.

    खंदारे सरांच्या सांगण्यावरून गणपतने गिरीशला 42 किलोमीटर अंतरावरील सक्सेस अकॅडमीत ॲडमिशन घ्यायला लावली. गिरीशचे शिक्षण पूर्ण झाले. त्याचे लग्न झाले आणि आठव्या दिवशी त्याला नोकरीही मिळाली. नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच पुण्याला तो निघून गेला. सोबत बायको आणि गणपतलाही घेऊन गेला. दोन वर्षांतच गिरीश परमनंट झाला. गिरीशला कायमची नोकरी लागल्याची बातमी ‘हा’ ‘हा’ म्हणता गावाकडे पसरली.

    दुसऱ्याच दिवशी गणपतचे गावाकडचे काही मित्र बुके घेऊन आले. सकाळचे आठ वाजले होते. गिरीश अजून झोपला होता. गणपत आंघोळ करून पेपर वाचत बसला होता. दारात गलका ऐकून तो बाहेर आला. वीरेंद्र, सोमनाथ, संग्राम, दादासाहेब, बापू मिस्त्री हे सर्व गणपतचे वर्गमित्र जमा झाले होते. आता ते सर्वजण संसारातून रिटायर झाले होते. वीरेंद्र आणि दादासाहेब नोकरीतून निवृत्त झाले होते. बापू मिस्त्रीने स्वतःचा व्यवसाय मुलाच्या स्वाधीन केला होता. गणपत लगबगीने उठला. त्याने सर्वांना आत बोलवले.

    संग्राम आणि सोमनाथकडे पाहून त्याने विचारले, “तुम्ही कधी आलाय?”

    “चार दिवस झाले येऊन. काल तुझ्या मुलाच्या नोकरीची बातमी समजली. मग म्हटलं तुला भेटून यावं.”

    सोमनाथ आणि संग्राम केरळला स्थायिक होते. त्यांचा सोन्या-चांदीचा गलाइचा व्यवसाय होता. ते सर्वजण आणि गणपत एकदम लंगोटी यार होते. गणपतच्या गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी अनेक वेळा मदत केली होती. सर्वजण आत येऊन हॉलमधल्या कॉटवर बसले. गणपत सूनबाईला म्हणाला, “हे सर्व माझे वर्गमित्र आहेत. बऱ्याच दिवसांनी आले आहेत. एकदम कडक चहा करा.”

    त्यांनी गिरीशला हाक मारली… “आंघोळ करून लवकर बाहेर ये. तुला काका भेटायला आले आहेत.”

    संग्राम म्हणाला, “गणपतराव आता चहावर भागवू नका. आज संध्याकाळी एक तर घरामध्ये दोन किलो आणा किंवा बाहेर तरी जाऊया. आपला आनंद चहावर साजरा करता येणार नाही.” सर्वजण हसायला लागले. गणपत म्हणाला, “अरे, तुमच्यासाठी काय पण. तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणाल तिथे, मी पार्टी द्यायला तयार आहे.”

    सर्वांचा चहा झाला. तोपर्यंत अंघोळ करून गिरीश बाहेर आला. गिरीशला बुके देण्यात आला. फोटोसेशन झाले. घराबाहेर पडताना संग्राम म्हणाला “बरोबर सहा वाजता फोन करतो. गणपतराव, आम्ही सांगू त्या ठिकाणी यायचं.” हसत हसत ते निघून गेले.‌

    गणपतने अशा अनेक पार्ट्या केल्या होत्या. त्याचे जवळजवळ सर्व मित्र दारू पिणारे होते. समोर सर्व मित्र दारू घेत असत आणि हा निवांत काहीतरी खात बसत असे. आजपर्यंत गणपतने दारूच्या थेंबालाही शिवले नव्हते. कधी सिगारेट नाही की मावा नाही!

    बरोबर सहा वाजता संग्रामचा फोन आला. ‘संगम’ धाब्यावर ये. आम्ही तिथेच थांबलो आहे.

    गणपतचे हे जुने शाळेपासूनचे दोस्त. पण आयुष्य वेगळ्या वाटेवर गेलेले. दारू, गप्पा, थट्टा – हे सगळं त्यांच्या जगण्याचा भाग. श्रीमंतही तेवढेच होते. धंद्यामध्ये भरपूर पैसा मिळत होता. गावात जमीन जुमला, घरदार होते. काही जणांचे पुण्यातही फ्लॅट होते. मग राहिलेल्या पैशाला त्यांनी अशी वाट करून दिली होती. त्या दिवशी पार्टी रंगात आली होती.

    संग्राम म्हणाला, “गणपत, आता तू खऱ्या अर्थाने सगळ्या जबाबदारीतून पार पडलास. मुलाला नोकरी लागली. त्याचे लग्न होऊन तुला सून सुद्धा आली. कधी नव्हे ते तुझ्या पैशाचे टेन्शनही कायमचे मिटले. आता एन्जॉय करायला काय हरकत आहे?  आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला अत्यंत वेगळा दिवस आहे. त्यामुळे तू आमच्याबरोबर ग्लास घ्यायलाच पाहिजेस. आता कडक आयुष्य बस् झाले. कशासाठी कोरडा जगतो आहेस?” त्यांनी त्याची चेष्टा केली.

    हेही वाचा – बापाची माया..

    गणपतने त्यांना निक्षून ‘नाही’ म्हणून सांगितले. शेवटी संग्रामने सोमनाथला हाताने खुणवले. म्हणाला, “आता एक काम करूया. त्याची इच्छा नसेल, तर त्याला बळजबरी करूया नको. आपण दारू पिऊ या. तो पेप्सीकोला घेईल. दुधाची तहान ताकावर भागवूया.”

    सोमनाथकडे पाहून तो म्हणाला, “सोमनाथ घेऊन ये मस्तपैकी पेप्सीकोला.‌”

    सोमनाथ खूप उशिराने आला. येताना एक लीटर पेप्सीकोलाची बाटली घेऊन आला. बाटली संग्रामच्या स्वाधीन करून म्हणाला, “आता भरा सर्वांचे ग्लास.” संग्रामने बाकी सर्वांचे ग्लास लालसर दारुने भरले. गणपतच्या ग्लासमध्ये पेप्सीकोला ओतला. “चिअर्स” करून सर्वजण घोट घोट रिचवू लागले.

    सोमनाथ, संग्राम, दादासाहेब, बापू मिस्त्री सर्वजण हसत खिदळत होते. एकमेकांच्याकडे पाहून डोळे मिचकावत होते. गणपतच्या डोळ्यापुढे मात्र हळूहळू अंधारी येऊ लागली. सगळं गरगर फिरायला लागलं. संग्राम म्हणाला, “गणपत आता कसं सर्व बंधनं तोडून मोकळं वाटतंय. असंच जगायला शिक. आज तू खऱ्या अर्थाने आमचा मित्र झालास.”

    गणपतने आयुष्यात पहिल्यांदा दारूचा घोट घेतला होता. तो सुद्धा अजाणतेपणाने. मित्रांनी चेष्टेने फसवल्यामुळे. घोटाचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा… आणि संध्याकाळ कधी रात्रीत बदलली, कळलंच नाही.

    रात्री उशिरा गणपत घरी आला. चाल डगमगलेली होती. डोळे लाल झाले होते. बोलताना शब्द अडखळत होते… ते दृश्य गिरीशने पाहिलं. त्या क्षणी गिरीशच्या मनात काहीतरी तुटलं. “हा तोच बाप? जो मला लहानपणी एका चुकीसाठी मारायचा. हा तोच बाप जो दारू पिणाऱ्यांना नीच समजायचा?” त्याचा राग उफाळून आला, पण तो शांत राहिला.

    दुसऱ्या दिवशी सकाळी गणपत शुद्धीत आला. डोकं दुखत होतं. पोटात जळजळ होती. मनात अपराधी भावना होती. त्याने गिरीशला जवळ बोलावलं… शांतपणे तो सांगू लागला, “काल रात्री माझी काही चूक नव्हती. मला फसवलं गेलं. आयुष्यात पहिल्यांदा असं झालं. दारू राहू दे, निदान पेप्सीकोला तरी पी म्हणून त्यांनी आग्रह केला. त्यामध्ये काय मिसळलं होतं? मला समजलच नाही.”

    हेही वाचा – मायाळू आणि उबदार… आज्जी!

    बापाने सर्व खुलासा केला. परंतु गिरीशचा गैरसमज दूर होत नव्हता. एका घटनेमुळे त्याचा दृष्टिकोन बदलला. तो बापाकडे ‘दारूडा बाप’ अशाच नजरेने पाहू लागला. बापाकडे रोखून बघत म्हणाला, “लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आयुष्यभर चारित्र्याचा टेंभा मिरवत राहिला. मला छळत राहिला. निर्व्यसनी म्हणून समाजाला सांगत राहिला.‌ आज मात्र तुमचं खरं रूप नजरेसमोर आलं. बाप म्हणूनच मी आहो-जावो बोलत आहे. दुसरा कोण असता तर लाथा घालून त्याला घराबाहेर काढला असता.”

    गणपत गप्प झाला. त्या शब्दांनी त्याच्या अंगावर कोरड्या चाबकाचे फटके बसल्यासारखं वाटलं. एका क्षणात बाप-लेकाचं नातं उद्ध्वस्त झालं. तो पार कोसळून गेला. मनातल्या मनात म्हणाला, “माझी एकच इच्छा होती, पोरगा मोठा व्हावा. त्यानं नावलौकिक कमवावा. त्याच्या आयुष्यात सुख, समाधान यावं. त्याला कुठलेही टक्के-टोणपे खायला लागू नयेत. बस्. या शुद्ध हेतूपोटी मी त्याला शिकवत राहिलो. लेकाकडून कोणती अपेक्षा सुद्धा केली नाही. अपेक्षा एकच होती, शेवटची आंघोळ लेकाने दारात घालावी. पण आता तीही संपल्यात जमा आहे.”

    तो अंतर्मुख होऊन विचार करू लागला. ही शिवीगाळ कालच्या दारूची नव्हती. ही शिवीगाळ आपण केलेल्या चुकीची नव्हती. ही शिवीगाळ बापाच्या काळजीपोटी सुद्धा नव्हती. ही शिवीगाळ म्हणजे निव्वळ बदला होता – लहानपणी केलेल्या मारहाणीचा… मनमानी विरुद्ध दिलेल्या कठोर शिक्षेचा… दडपलेल्या रागाचा!

    त्या रात्री गणपत झोपलाच नाही. आपला उपमर्द झाला, ही गोष्ट त्याच्या खूप जिव्हारी लागली. सुरुंगाच्या दारुने दगड फुटून ठिकऱ्या व्हाव्या, तशा त्याच्या काळजाच्या ठिकऱ्या झाल्या. आता आपण इथे थांबण्यात अर्थ नाही. आता काहीही करून आपल्याला इथून निघावे लागणार आहे.

    रात्रीचे अकरा वाजले होते. त्याने गिरीशच्या खोलीकडे पाहिलं. खोली बंद होती. मुलगा आणि सून आत निवांत झोपले होते. त्याने हळूच काही कपडे घेतले. गंगूच्या आजारपणातील देण्याच्या हिशेबाची जुनी वही घेतली. पिशवी खांद्यावर टाकली. अत्यंत कठोर अंतःकरणाने बाहेरचा रस्ता धरला.

    सकाळी गिरीश उठला तेव्हा घर शांत होतं. घरी बाप नव्हता. नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले असतील, असे त्याला वाटले. तो समोरच्या हॉलमध्ये आला. तर टेबलवर एक चिठ्ठी होती.

    “मी तुला चांगलं वळण लावण्यासाठी कडक झालो होतो. बऱ्याच वेळा तुला मायेनं शिकवलं. प्रेमानं पाठीवर हात फिरवत शिकवलं. परंतु तू ऐकतच नव्हतास. आयुष्याची राखरांगोळी झाली असती, असा नाद तुला लहानपणीच लागला.‌ पोटचं लेकरू चुकीच्या वाटेला लागलं तर, कुठल्या बापाला बरं वाटेल? तू सज्ञान झाल्यावर मात्र आजपर्यंत मी तुला काही बोललो नाही. कधी दोन बोटे अंगाला लावली नाहीत. आज तू मोठा अधिकारी झालास. पण मी तुझ्या लहानपणी हात उगारला नसता, तर कदाचित तू गांजा पिऊन गावात फिरत राहिला असतास. तुझ्या शिक्षणासाठी शेत विकलं,‌ कर्ज काढलं. पण शिक्षणात कधी काटकसर केली नाही. माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त मानसिक त्रास तुझ्या या वागण्यामुळेच झाला होता. तरीही मी सर्व पोटात घातले. त्याचा कधी राग केला नाही. तुझी कधी हेटाळणी केली नाही. शेवटी पोटचं लेकरूच आहेस ना तू? राग तरी कसा करणार? पण कदाचित मी चुकलो. माझ्या सावलीत तुझा श्वास घुसमटतोय, हे मला खूप उशिरा कळलं. माझ्या कडक वागण्यामुळे तुझ्या आयुष्याचं सोनं झालं, यापेक्षा माझ्या कडक वागण्याने तू दुखावलास हे मला आता समजलं. मी केलं ते चूक का बरोबर हे मलाही सांगता येणार नाही. पण जे केलं ते एका बापाने पोटच्या लेकरासाठी केलं. त्याच्या हितासाठी केलं. कुठलाच वाईट हेतू न ठेवता केलं. कदाचित आता तुला ते समजणार नाही. भविष्यात तुला मूलबाळ होईल. त्याच्यावर संस्कार करताना तुला नक्की समजेल. त्यावेळी तुला तुझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. असो. आता मी जातो. तू मला लाथा घालून बाहेर काढण्यापेक्षा स्वतः बाहेर जाणे शहाणपणाचे ठरेल. नाही का? तू सुखी राहा. बायकोला चांगली सांभाळ. तब्येतीची काळजी घे. विनाकारण ओव्हर टाईम करत रात्री जागरण करत बसू नको.”

    गिरीशच्या हातून चिठ्ठी खाली पडली. त्याने उघड्या पडलेल्या दरवाजातून बाहेर पाहिले. घरासमोरचा रस्ता सुनसान दिसत होता. त्या रस्त्यावरून बाप निघून गेल्याची साधी पावलेही कुठे दिसत नव्हती…!!!

    समाप्त
    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

    अहंकार

    October 20, 2026 ललित

    नाते

    October 20, 2026 ललित

    शितावरून भाताची परीक्षा

    October 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अहंकार

    By दिलीप कजगांवकरOctober 20, 2026

    एअरपोर्टवरील लाऊंज बऱ्यापैकी भरलं होतं. अनेक फ्लाइट्स लेट झाल्यामुळे तिथे बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर कंटाळा स्पष्ट…

    नाते

    October 20, 2026

    शितावरून भाताची परीक्षा

    October 20, 2026

    मातृत्व

    October 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अहंकार

    October 20, 2026

    नाते

    October 20, 2026

    फक्त पोटच्या लेकरासाठी…

    October 20, 2026

    शितावरून भाताची परीक्षा

    October 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सत्त्वरजतमांचां, भेदीं पसरु कर्माचा

    October 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 ऑक्टोबर 2026

    October 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 476
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 638
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 1006
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अहंकार

    October 20, 2026

    नाते

    October 20, 2026

    फक्त पोटच्या लेकरासाठी…

    October 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.