एअरपोर्टवरील लाऊंज बऱ्यापैकी भरलं होतं. अनेक फ्लाइट्स लेट झाल्यामुळे तिथे बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर कंटाळा स्पष्ट दिसत होता. एका कोपऱ्यात साधा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला राज वरदसोबत गप्पा मारत बसला होता. वरद उद्योजक होता आणि राज हा त्याचा सल्लागार.
तेवढ्यात महागडा ब्लेझर, चमकदार शूज आणि इम्पोर्टेड बॅग घेतलेले सदानंद तिथे आले. सदानंद शंभर कोटींच्या IT कंपनीचे मालक होते. मुळातच अहंकारी असलेल्या सदानंदांचा अहंकार कंपनी जशी मोठी झाली तसा वाढतच गेला.
त्यांना पाहताच राज मोठ्या आदराने म्हणाला, “नमस्कार, सर.”
“अरे राज! किती वर्षांनी भेटतोस?”
“हो सर, पाच वर्षांनी.”
“राज, तू LinkedIn वरून गायब झालास. मला वाटलं, एक तर तू अजूनही काम शोधत असशील किंवा कायमचाच कामातून गेला असशील.”
राज काहीच बोलला नाही.
सदानंदांची नजर वरदकडे गेली… “आपण?”
“मी वरद.”
“काय करता?”
“लहानसा व्यवसाय, राज माझा सल्लागार आहे.”
सदानंदांनी वरदला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. साध्या टी-शर्टमधला सल्लागार राज आणि साध्याच वेशातील मालकाला पाहून सदानंदांना वरदच्या व्यवसायाची चांगलीच कल्पना आली.
हेही वाचा – रिटर्न गिफ्ट
राजने घड्याळाकडे पाहिलं… “वरद, माझी बोर्डिंगची वेळ झाली. निघतो मी.”
“ओके. पोहोचलास की फोन कर,” वरद म्हणाला.
राज उठला आणि सदानंदांकडे पाहून म्हणाला, “सर, भेटू.”
“हो.”
राज गेल्यावर सदानंदांनी कुत्सितपणे विचारलं, “राज तुमचा सल्लागार आहे?”
“हो.” वरद म्हणाला.
“सल्लागार! मोठमोठ्या अवास्तव कल्पनांचा बादशहा आहे तो. जरा जपून हं!” सदानंदांच्या आवाजात उपहास होता. ते पुढे म्हणाले, “पूर्वी माझ्या कंपनीत होता. कंपनीला नावारूपाला आणण्यात मोठा वाटा होता त्याचा, पण सदैव कल्पनांच्या विश्वात असायचा आणि स्वतःच्या ज्ञानाविषयी जरा जास्तच आत्मविश्वास होता त्याला.”
वरदने विचारलं, “म्हणून काढून टाकलं त्याला?”
“हो. पाच वर्षांपूर्वी काढून अद्दल घडवली त्याला आणि त्यानंतर माझी खूप प्रगती झाली.”
काही क्षण सदानंदांकडे पाहत वरद म्हणाला, “सदानंद, तुमची एक चूक…”
सदानंदांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं…
“काय? मी आणि चूक? अहो, शंभर कोटींचं साम्राज्य आहे माझं!”
“खरंय. चूक नसेल; पण तुम्ही स्वतःची प्रगती करताना माझंही भाग्य उजळवलंत.”
“म्हणजे?”
“तुम्ही राजला काढलं नसतं, तर तो माझ्याकडे आला नसता.”
“बरं, मग?”
वरद पुढे म्हणाला, “तुम्ही मला एक अतिशय मौल्यवान हिरा फुकटात दिलात.”
सदानंदांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.
“राज? आणि मौल्यवान हिरा?”
“राज माझ्याकडे आला तेव्हा माझी कंपनी फार मोठी नव्हती, फक्त सात-आठ कोटींची होती. आज ती तीनशे कोटींची आहे.”
“राजला चांगला पगार देत असाल?”
“पगार? अहो, तो माझा भागीदार आहे.”
सदानंदांनी हळू आवाजात विचारलं, “तुम्ही त्याला एवढं मोठं केलंत?”
वरद लगेच म्हणाला, “नाही. त्याने मला मोठं केलं.”
“राज माझ्याकडे आला तेव्हा माझ्याकडे पैसा होता, स्वप्न होतं; पण दिशा नव्हती.”
वरद क्षणभर थांबला…
“राजच्या विचारांची उंची खूप मोठी आहे… आणि त्याची झेपही. त्याने मला मोठे विचार करायला आणि त्याच्या कल्पना स्वीकारायला शिकवलं. पटकन निर्णय घ्यायला शिकवलं. माणसांवर विश्वास ठेवायला शिकवलं.”
वरद पुढे म्हणाला, “कंपनी मी नाही; राजने वाढवली. कंपनी त्याच्या विचारांनी दिवसेंदिवस मोठी होत गेली, या वर्षी 500 कोटी करू आम्ही.”
सदानंदांच्या चेहऱ्यावर आता अपराधीपणाची छटा स्पष्ट जाणवत होती.
“तुम्ही त्याची किंमत ओळखली नाही.”
सदानंदांनी मान खाली घातली. त्यांच्या डोळ्यांसमोर पाच वर्षांपूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला. राजला कंपनीतून काढताना ते किती गर्वाने म्हणाले होते —
“कंपनी एका व्यक्तीवर चालत नाही.”
आणि राजने शांतपणे उत्तर दिलं होतं —
“पण योग्य व्यक्ती असेल तर कंपनी चालत नाही, धावते.”
त्या वेळी सदानंद कुत्सितपणे हसले होते.
आज मात्र राजच्या त्या वाक्याचा अर्थ त्यांना पुरेपूर समजला होता. त्यांना पश्चात्ताप होत होता तो राजला गमावल्याचा नाही… तर आपल्या अहंकारामुळे त्याची किंमत ओळखता न आल्याचा.
त्यांनी हळू आवाजात विचारलं, “वरद, राज माझ्याबद्दल नक्कीच वाईट बोलत असेल, हो ना?”
वरदने नकारार्थी मान हलवली…
“कधीच नाही?” सदानंद यांनी विचारलं.
“नाही. उलट तो तुमच्याबद्दल आदरानेच बोलतो.”
सदानंदांच्या डोळ्यांत पाणी आलं.
बोर्डिंग अनाउन्समेंट झाल्यावर वरद निघून गेला. सदानंद मात्र तिथेच बसून होते. राजला कॉल करण्याचं धैर्य त्यांना झालं नाही… कारण अत्यंत साधं राहणीमान असलेला राज पैशानेच नव्हे, तर माणूस म्हणूनही त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठा झाला होता. राजरूपी हिऱ्याची किंमत पारखण्याची नजर सदानंदांमधील अहंकाराने कमकुवत केली होती.
हेही वाचा – ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य
राज आणि वरदचा पुढचा प्रवास सुरू झाला होता, पण सदानंद मात्र अजूनही बोर्डिंग अनाऊन्समेंटच्या प्रतीक्षेत होते. आज प्रथमच त्यांच्या अहंकाराला तडा गेला होता. त्यांना जाणवलं होतं — ते राजला हरवून जिंकले नव्हते; उलट राजकडूनच हरले होते.


