Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितसायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!

सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!

दीपक तांबोळी

नवी कोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दूर खेळत असलेली सायली धावतच तिच्याजवळ आली.

“माझी नवी सायकल… माझी नवी सायकल”

सायकलवरून हात फिरवता फिरवता सायली उद्गारली. नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता. समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली. पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पहात होती. लोकांची धुणीभांडी करून साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता. दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं. सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता…

दुसऱ्या दिवसापासून पार्वती ‘नाही नाही’ म्हणत असताना सायली सायकल घेऊन शाळेत गेली. अर्थात, सायकल घरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता. सात दिवस सगळं व्यवस्थित सुरू होतं. आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली. पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सागितलं. पार्वतीच्या काळजात धस्स झालं. पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशांतून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं, या कल्पनेने तिला रडू कोसळलं. शेजारच्या मुलांना सोबत घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्र शोध घेतला, पण सायकल काही मिळाली नाही! कुणीतरी तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईबरोबर पोलीस स्टेशनमध्ये गेली.

“साहेब, सायकल चोरीला गेली… त्याची कम्प्लेंट द्यायची होती…” ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून भीतभीतच ती बोलली. त्याने एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहिलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला, “कशाची चोरी झालीय?”

त्याच्या खेकसण्याने सोबत असलेली सायली आईला बिलगली आणि मुळूमुळू रडू लागली.

“सायकल साहेब… सायकलची चोरी झाली.”

“खरेदीची पावती आहे का?” असं त्यानं विचारताच, तिनं पावती दिली. त्याने एक रजिस्टर काढलं.

“व्यवस्थित शोधली का सगळीकडे? खोटी कम्प्लेंट चालणार नाही…” त्याने दरडावून विचारलं.

“हो साहेब… सगळीकडे शोधली, पण नाही सापडली!”

“ठीक आहे. सांगा आता…” पार्वतीनं सायकलीचं आणि कधी, कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सागितलं. त्यानं लिहून घेतलं. तिचा पत्ता, मोबाइल नंबर घेतला. सही घेतली.

“जा आता घरी. सायकल मिळाली की, कळवू तुम्हाला…” तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन मळू लागला. त्याचा रुक्षपणा पाहून पार्वती स्तब्ध झाली. तिच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली… “ताई, आपण साहेबांना भेटू. हा मेला काहीच करणार नाही…” पार्वतीलाही ते पटलं. धीर धरुन ती त्या पोलिसाला म्हणाली, “साहेब, आम्हाला मोठ्या साहेबाला भेटायचंय!”

हेही वाचा – निरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!

त्यानं एकदम डोळे मोठे केले. जोराने ओरडून तो म्हणाला, “ए चल, निघ इथून. साहेबाला भेटायचं म्हणे. साहेब भेटणार नाही. साहेब बिझी आहेत. लिहिली ना कम्प्लेंट? जा आता घरी…”

तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलीस बाहेर आला. बहुतेक तोच साहेब असावा.

“काय आरडाओरड चालवलीय पाटील? काय झालं?”

“साहेब ते…” पाटील तंबाखू लपवू लागला. तेवढ्यात साहेबाची नजर पार्वती आणि सायलीवर पडली. तो काय समजायचं ते समजला असावा.

“या बाई तुम्ही आतमध्ये…” तिघीही भातभीत चेंबरमध्ये शिरल्या.

“हं, सांगा आता काय झालं ते!”

पार्वती परत एकदा सांगू लागली… तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला…. फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता. सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते. फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं,

“तुम्ही काय करता?”

“साहेब, मी लोकांची धुणीभांडी करते. त्यातून मिळालेल्या पैशातूनच ती सायकल घेतली होती…”

“…आणि तू गं मुली? तू शाळेत जातेस का?”

पार्वतीचं बोलणं पूर्ण होऊ न देताच साहेबाने सायलीला विचारलं. सायलीने मान हलवून ‘हो’ म्हटलं.

“कितवीत आहेस?”

“पाचवीत…” “हलक्या आवाजात तिनं सांगितलं. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात गढून गेला. पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं. बराच वेळाने साहेबाचं बोलणं संपलं. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला,

“ठीक आहे. या तुम्ही. मी बघतो काय करायचं ते!”

“पण साहेब…” ती काही बोलण्याच्या आतच दोन-तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं. इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि तिचं मन भरुन आलं.

घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खूप रडली. एकुलती एक पोर, खूप समजूतदार होती. आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडील नाहीत, याची तिला जाणीव होती. तिनं कधी हट्ट केला नाही, पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती. पार्वतीचं ती सर्वस्व होती, त्यामुळे परिस्थिती नसतानाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती.

हेही वाचा – निरोप समारंभ… स्मृतीपटलावर कोरलेला!

दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जाताना बघून पार्वतीच्या काळजाला असंख्य भोकं पडली. चार हजाराची सायकल तर गेलीच होती, पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती… याचं पार्वतीला वाईट वाटत होतं. पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्षं सहज लागणार होती आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरून येत होते.

पोलीस कम्प्लेंट करून आठवडा उलटला, पण सायकलचा तपास काही लागला नाही. पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती, पण बाइक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सोयरसुतक नव्हतं. ती दोनतीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली. शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसतेय का, हेही पाहिलं. पण पदरी निराशाच आली.

पोलिसांकडे जाऊन पंधरा दिवस उलटल्यावर पार्वती समजून चुकली की, आता सायकल मिळणं शक्य नाही. शेजारीही तिला तेच समजावत होते. पण मन मोठं वेडं असतं. कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल, “ताई, तुमची सायकल सापडली…” असं तिला वाटत रहायचं.

विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं. तिनं उघडलं तर, बाहेर पोलीस!

“पार्वताबाई तुम्हीच का?”

“हो…”

“या बाहेर!”

तिचं ह्रदय जोरात धडधडू लागलं. बाहेर व्हॅन उभी होती, ती पाहून शेजारपाजारचे जमा झाले. तो पोलीस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोरी सायकल घेऊन बाहेर आला.

“ही घ्या तुमची सायकल!”

“साहेब, पण ही आमची सायकल नाही!”

“ते मला माहीत नाही. साहेबांनी पाठवलीय. तुम्ही साहेबांना भेटा, त्यांनी बोलावलंय तुम्हाला…”

व्हॅन निघून गेली. पार्वतीभोवती गर्दी जमा झाली. ही सायकल तिच्या चोरीला गेलेल्या सायकलपेक्षा सुंदर आणि आधुनिक दिसत होती. सात-आठ हजारांची असावी. बरेच जण तिच्याकडे असूयेने बघत होते. सायलीची तर नजर हटत नव्हती. ती सारखी सायकलवरून हात फिरवत होती…

“आई, ही सायकल आपल्याला दिली?”

“बेटा, आपली सायकल नाहीये ती. उद्या जाऊन साहेबाला विचारू आपण.”

जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या. एका बाईने तर हद्द केली, पार्वतीवर साहेबाची वाईट नजर असेल म्हणून तर त्याने एवढी महागडी सायकल पाठवली असेल म्हणे. ती सायकल साहेबाला परत करावी, असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं. ते ऐकून पार्वती अस्वस्थ झाली. सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरली. रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय, अशी स्वप्नं पडत होती.

दुसऱ्या दिवशी ती कामं आटोपून सायलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली. नशिबाने साहेब एकटाच चेंबरमध्ये बसला होता.

“या ताई, बसा…” मनमोकळेपणाने हसत त्याने पार्वतीचं स्वागत केलं. त्याच्या ताई म्हणण्याने तिच्या मनातलं किल्मिष बरंच कमी झालं.

“साहेब, तुम्ही जी सायकल पाठवलीत ती आमची नाहीये…” तिनं विषयाला हात घातला.

“हो बरोबर, मला कल्पना आहे. तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला. पण ती मिळाली नाही आणि ती मिळणारही नव्हती. चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करून एका तासात विकूनही टाकले असतील.”

“पण मग साहेब, ही नवी सायकल…”

“कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते! पोलिसांना काय गरज पडलीय चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची, असंच ना? ही सायकल मी माझ्यातर्फे दिलीय आणि ती का दिली, ते पण सांगतो!”

टेबलावरची बेल वाजवून त्याने शिपायाला बोलावलं… “या ताईंकरिता एक चहा आणि या मुलीकरता एक कॅडबरी घेऊन ये…”

“…तर ताई, त्या दिवशी तुम्ही आलात. तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण आली. ती माझ्यामागे सायकल घेऊन देण्याकरिता हट्ट करायची, पण तिचं घर हायवेजवळ असल्याने रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो. दुर्दैव बघा, ज्या रिक्षातून ती घरी येत होती, त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सायकल वापरली असती तर, कदाचित ती वाचली असती… कदाचित नाही…! पण तिच्या मृत्यूनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो. तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली. तुम्हाला मदत केली तर, या अपराधातून माझी सुटका होईल, असं वाटलं. भाचीची इच्छा पूर्ण करू नाही शकलो, कमीतकमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी, या हेतूने मी हे सगळं केलं. खूप मोकळं वाटतंय आता…”

एक श्वास सोडून त्याने सायलीला जवळ घेतलं आणि म्हणाला, “बेटा ती सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट… आणि हो कधी काही अडचण आली तर, या मामाला सांगायचं बरं का!”

“साहेब तुमचे आभार…”

“नाही ताई आभार नका मानू. मीही गरीबीतूनच वर आलोय. गरीबाचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो. माझ्या आईनं मोलमजुरी करूनच मला मोठं केलंय. तुम्हीही तुमच्या मुलीला खूप शिकवा… मोठं करा!”

पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले…


मोबाइल – 9503011250

(लेखकाच्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील ही कथा आहे.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!