राज आणि नेहा पुण्यातील एका प्रशस्त बंगल्यात राहणारे अतिशय श्रीमंत दाम्पत्य होते. बड्या साहेबांचा मुलगा म्हणून त्यांच्या दहा वर्षांच्या एकुलत्या एक मुलाला सर्वजण ‘छोटे साहेब’ म्हणत.
राजच्या बंगल्याच्या बाजूला एका बिल्डिंगचे काम सुरू होते आणि तेथील वॉचमनचा मुलगा वरद, हा जवळजवळ छोट्या साहेबांच्याच वयाचा. दोघांची मैत्री नेहाला अजिबात पसंत नव्हती. म्हणून नेहा घरी नसतानाच ते दोघे एकत्र खेळत.
त्या दिवशी छोट्या साहेबांनी फराळासाठी त्यांच्या मित्रांना घरी बोलावले होते. वरदही स्वच्छ धुतलेले कपडे घालून त्यांच्यात सामील झाला होता. नेहा क्लबमध्ये गेली होती आणि घरी काम करणाऱ्या मावशी मुलांना आग्रहाने फराळ वाढत होत्या. मुलंही फराळाचा आस्वाद घेण्यात मग्न होती.
नेहा घरी परतली. वरदला घरात पाहताच तिच्या रागाचा पारा चढला. फराळ करण्यात मग्न असलेल्या वरदच्या हातातील प्लेट नेहाने ओढली आणि त्याला घराबाहेर ढकलले. वरदच्या हातात छोट्या साहेबांनी दिलेले चॉकलेट होते. तेही नेहाने हिसकावून घेतले.
“बाईसाहेब, हे चॉकलेट तरी राहू द्या ना मला. प्लीज… प्लीज…”
वरद हात जोडून विनवणी करत असतानाच नेहाने ते चॉकलेट उचलले आणि क्षणाचाही विचार न करता सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले.
वरदचा हिरमुसलेला चेहरा आणि त्याच्या डोळ्यांतील आर्त भाव छोट्या साहेबांच्या मनात कायमचे घर करून राहिले. त्यांना आईचे वागणे अजिबात आवडले नव्हते.
बिल्डिंगचे काम संपले. वरदच्या वडिलांची रवानगी दुसऱ्या साइटवर झाली. कालचक्र अव्याहतपणे चालूच होते.
0000
रक्तबंबाळ अवस्थेतील एका छोट्या मुलाला घेऊन एक तरुण घाईघाईने डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये शिरला. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता जखमा तपासल्या आणि उपचार सुरू केले.
हेही वाचा – माणुसकी…
“पुढच्या आठवड्यात दाखवायला घेऊन या,” डॉक्टरांनी सांगितले.
रिसेप्शनिस्टने आठ हजार रुपयांचे बिल त्या तरुणाला दिले.
“माझ्याकडे फक्त दोन हजार रुपये आहेत,” त्या तरुणाने प्रामाणिकपणे सांगितले.
“आधी पैसे द्या आणि नंतर मुलाला घेऊन जा,” रिसेप्शनिस्टने कठोर शब्दांत सांगितले.
वाढलेला आवाज ऐकून डॉक्टर बाहेर आले.
“तुम्ही असे करा, उरलेले सहा हजार रुपये उद्या द्या,” डॉक्टर म्हणाले.
“साहेब, मी दर महिन्याला एक हजार रुपयेप्रमाणे तुमचे पैसे आणून देईन. परंतु मला जाऊ द्या. मला याला त्याच्या घरी पोहोचवायचे आहे. त्याच्या घरचे त्याची वाट पाहत असतील.”
डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्या तरुणाने सांगितले, “हा माझा मुलगा नाही. मी रस्त्याने येत असताना एका स्कूटरने धडक दिल्यामुळे हा रस्त्यावर पडला होता. बघणारे अनेक होते; पण कोणी पुढे येत नव्हते. म्हणून मी याला पटकन उचलून आपल्या क्लिनिकमध्ये आणले. मला प्लीज जाऊ द्या. मी तुमचे पैसे नक्की देईन.”
त्या तरुणाने हात जोडून विनवणी केली.
“त्यांना जाऊ द्या आणि हो, त्यांच्याकडून घेतलेले दोन हजार रुपये त्यांना परत करा,” डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा – कालाय तस्मै नमः
“धन्यवाद, डॉक्टरसाहेब,” अतिशय कृतज्ञतेने म्हणत तो तरुण जायला निघाला.
त्या तरुणाच्या आवाजातील आणि डोळ्यांतील आर्ततेने डॉक्टरांचे मन हळहळले. त्यांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिले. तो चेहरा… ते डोळे… कुठेतरी पाहिले होते.
“वरद…?” डॉक्टरांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
त्या तरुणाने आश्चर्याने डॉक्टरांकडे पाहिले. क्षणभर त्यालाही काही सुचेना.
“वरद, मी छोटे साहेब!”
क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरांनी त्याला मिठीत घेतले.
गरीबी आणि श्रीमंतीतील दरी अजूनही तशीच होती; पण आज छोट्या साहेबांना थोपवायला त्यांची आई जवळ नव्हती. लहानपणी समाजाने उभी केलेली श्रीमंती-गरिबीची भिंत त्या क्षणी दोन मित्रांच्या मिठीत विरघळून गेली होती.
दोन मित्रांच्या पुनर्भेटीचा तो क्षण पाहताना रिसेप्शनिस्टलाही अश्रू आवरता आले नाहीत.


