अनामिका
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
भाद्रपद महिन्यातील चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन. जन्माष्टमी संपताच बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. बाजारपेठा गणपती बाप्पाच्या लोभस मूर्तींनी गजबजून जातात. सजावट, आरास आणि पूजेच्या साहित्यामुळे बाजारपेठा उजळून निघतात. वातावरणात एक प्रचंड उत्साह आणि आनंद पसरतो.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनातील आवडती देवता म्हणजे गणपती. बाप्पाच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं. गणपतीचं रूप लोभसवाणं आणि मोहक आहे. लंबोदर, गोजिरवाणा हा बाप्पा भक्तांना हवाहवासा वाटतो. त्याच्या चार हातांतून शक्ती, बुद्धी, संपत्ती आणि धर्म यांचं संतुलन दिसतं. अंकुश आणि पाश हे इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतात. म्हणूनच बाप्पाच्या दर्शनाने प्रत्येक भक्ताच्या मनात हीच भावना उमटते – “सगळं सुरळीत पार पडेल, बाप्पा आहे ना!”
गणपती म्हणजे विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि बुद्धीचा देवता. प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला त्याची पूजा केली जाते कारण तो यश आणि ज्ञानाचा मार्गदर्शक मानला जातो आणि सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडतो असा विश्वासही असतो. त्याच्या मूर्तीतील प्रत्येक अवयव एक सुंदर संदेश देतो – मोठं डोकं मोठे विचार आणि विशाल बुद्धी ठेवावी, हे शिकवतं. लहान डोळे एकाग्रता आणि बारकाईनं पाहण्याची शिकवण देतात. मोठे कान शांतपणे आणि विचारपूर्वक ऐकण्याची प्रेरणा देतात. छोटं तोंड कमी पण योग्य बोलावं असा सल्ला देतं. लांब सोंड प्रत्येक परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता दाखवते. मोठं पोट चांगलं-वाईट दोन्ही पचवण्याचं सामर्थ्य दर्शवतं. एका दाताचं रूप हे चांगल्या कार्यासाठी त्यागाचं प्रतीक आहे.
हेही वाचा – तरंगिणी… संसारात राहून संन्यस्त जीवन
गणपतीचे वाहन ‘मूषक’ म्हणजेच उंदीर आहे. त्याची अशीही एक कथा सांगितली जाते की, हा मूषक पूर्वी ‘गजमुखासुर’ नावाचा राक्षस होता. गणपतीने त्याचा पराभव करून त्याला शरण घेतले आणि नंतर त्याला आपले वाहन बनवले.
अशा या गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल, दुर्वा आणि मोदक अतिशय प्रिय आहेत. जास्वंद हे शक्ती आणि तेजाचं प्रतीक आहे, दुर्वा साधेपणा आणि शीतलतेचं प्रतीक आहे, तर मोदक हा बाप्पाचा लाडका नैवेद्य आहे. म्हणूनच मोदकाचा नैवेद्य मिळाला नाही तर, गणेशोत्सव अपूर्णच राहतो. गणपती बाप्पाचं विसर्जन. त्या दिवशीची पण एक गंमत आहे. असं म्हणतात की, गणपती बाप्पाच्या कानात आपली इच्छा सांगितली की ती पूर्ण होते. आपल्या जीवनातील अडथळे दूर करून मनातील इच्छा पूर्ण करतो, असा सगळ्यांना विश्वास वाटतो. या श्रद्धेमुळे भक्तांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो.
हेही वाचा – शोध अज्ञात रहस्याचा…
गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा सण नाही, तर ज्ञान, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संगम आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं, तेव्हा उद्देश होता लोकांना एकत्र आणणं, समाजजागृती करणं आणि संस्कृती जपणं. पूर्वी या सणात सांस्कृतिक कार्यक्रम, विचारप्रवर्तक उपक्रम आणि समाजहिताचे प्रयत्न होत असत. पण आज या सणाचं रूप थोडं बदलत चाललं आहे. कार्यक्रमांचे स्वरूप बदलले आहे. डीजेचा गोंगाट आणि असभ्य नृत्य या गोष्टींमुळे मूळ उद्देश हरवत चालला आहे का, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. संस्कृतीचा ह्रास थांबवून पुन्हा विचारांची जागरूकता आणि एकतेचं बळ या सणातून निर्माण करणं हीच खरी भक्ती असेल.
गणपती बाप्पा मोरया!