डॉ. किशोर महाबळ
प्रत्येक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषय उत्तमरित्या शिकवले जायला हवेत. आपली जबाबदारी शिक्षक किती उत्तमरित्या पार पाडतात, यावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अवलंबून असते. सर्व महत्त्वाचे विषय शाळेत नीट शिकवले गेले तर, त्या विषयांत पुढचे शिक्षण घेणे आणि प्रावीण्य मिळविणे सोपे जाते. अन्यथा पुढचे सर्व शिक्षण करणे विद्यार्थ्याला अत्यंत कठीण जाते. उत्तम शिकविणे म्हणजे काय, हे शिक्षकांना कळणे आवश्यक आहे. हे माहीत नसलेले शिक्षक वर्गात शिकविण्याऐवजी पुस्तकातील मजकूरच विद्यार्थ्यांना पुन्हा लिहून देतात. काही शिक्षक परीक्षेच्या दृष्टिने महत्त्वाचे प्रश्न सांगून त्यांची उत्तरे लिहून देतात. असे शिक्षक स्वतःला उत्तम शिक्षक मानत असल्याने त्यांना तीच उत्तरे आदर्श वाटतात. तीच उत्तरे विद्यार्थ्यांनीही पाठ करावीत आणि उत्तरपत्रिकेत ती तशीच लिहावीत, अशी त्यांची अपेक्षा असते. असे न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते कमी गुण देतात!
विद्यार्थ्यांनी वर्गात प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येतीलच याची ज्या शिक्षकांना खात्री न,सते त्यांना विद्यार्थ्यांनी वर्गात प्रश्न विचारले तर राग येतो. म्हणून ते प्रश्नच विचारू देत नाहीत. पाठ्यपुस्तकात दिलेली उदाहरणेच देण्यात काही शिक्षक समाधान मानतात. नवीन उदाहरणे देण्यासाठी अभ्यास करण्यात वेळ वाया जातो, असे त्यांचे स्पष्ट मत असते. काही शिक्षक पाठ्यपुस्तकातून शिकविणे, हे अत्यंत त्रासदायक मानतात तर, काही शिक्षकांना पाठ्यपुस्तक समजून घेणे कठीण जाते. अशा वेळी ते पाठ्यपुस्तकापेक्षा त्या विषयाचे गाईड विकत घेऊन त्यातूनच शिकविणे योग्य मानतात, कारण त्यांनीही गाईडमधून अभ्यास केलेला असतो! विद्यार्थ्यांना अभ्यास करणे आवडतच नाही, असा काही शिक्षकांचा दृढ विश्वास असतो.
फळ्यावर लिहिताना रंगीत खडू वापरले तर, फळ्यावरील लेखन हे विद्यार्थ्यांच्या जास्त लक्षात राहते, हे बीएड किंवा डीएडचा अभ्यास करताना शिकलेले असते. पण बरेच शिक्षक बीएड, डीएडची पदवी मिळवताच आणि शिक्षक झाल्यावर लगेच विसरून जातात! शाळेच्या खर्चाने मिळणारे पांढरे खडूच फक्त वापरतात आणि रंगीत खडू स्वखर्चाने विकत घेणे अनावश्यक मानतात! काही शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतात, त्यांच्याकडेच लक्ष देतात. वर्गात मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपला विषय नीट येत नाही, याचे काही शिक्षकांना मुळीच वाईट वाटत नाही. असे बरेच शिक्षक, प्राध्यापक आपल्याला दिसत असले तरीही, काही मात्र अपवाद असतात.
आपल्याला उत्तम शिकविता आलेच पाहिजे, कारण त्यासाठीच आपल्याला पगार मिळतो आणि ते आपले मुख्य कर्तव्य आहे, असे मानणारा शिक्षक मात्र आपले अध्यापन अधिकाधिक प्रभावी कसे होईल, याचा सातत्याने विचार करेल. आपल्याला आपल्या विषयातील सर्व येते, असा तो स्वतःचा कधीच गैरसमज करून घेणार नाही. प्रभावी अध्यापन कसे करावे, याबद्दलच्या विविध पद्धती, यशस्वी प्रयोग यांची माहिती मिळविण्याचा तो प्रयत्न करेल. शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक तंत्रज्ञान, शैक्षणिक तत्वज्ञान या विषयांचा त्याचा अभ्यास सुरूच राहील. आपल्या अध्यापनाबद्दल तो सतत आत्मपरीक्षण करेल. पाठ्यपुस्तकातील सर्व धडे तो व्यवस्थितपणे शिकवेल, टाळाटाळ करणार नाही. आपल्याला चांगले शिकविता यावे, अशी इच्छा बाळगणारा शिक्षक प्रत्येक धड्यातील माहिती, महत्त्वाचे मुद्दे, आकृत्या विद्यार्थ्यांना समजाव्यात आणि लक्षात राहाव्यात म्हणून स्वत:च प्रत्येक धड्यावर हवे तेवढे आकर्षक तक्ते, विविध प्रकारची शैक्षणिक साधने तयार करून त्यांचा रोज अध्यापन करताना पुरेपूर उपयोग करेल.
हेही वाचा – सर्व शिक्षकांची बौद्धिक प्रगती
याशिवाय, शक्य तेवढ्या सर्व दृकश्राव्य माध्यमांचा रोज अध्यापन करताना पुरेपुर उपयोग करेल. संगणकाचा उपयोग करून आपल्या विषयासंबंधी स्लाईडस तयार करून दाखवेल. उत्तम अध्यापन हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे, असे मानणारा शिक्षक आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना आपले शिकवणे समजते आहे की, नाही याचा प्रत्येक वर्गात आवर्जून आढावा घेईल. आपले सर्व विद्यार्थी यशस्वी व्हावेत, सर्वांना उत्तम गुण मिळावेत, यासाठी तो सतत प्रयत्नशील राहील. आपले शिकवणे हे विद्यार्थ्यांना विषय समजण्यासाठी उपयुक्त व्हावे, यासाठी तो सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी भाषा, समजतील अशी भरपूर उदाहरणे सांगेल.
अध्यापन उत्तम व्हावे यासाठी प्रयत्न करणारा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देईल. तो प्रत्येक वर्गात शिकवलेल्या मुद्द्यांबद्दल चर्चा घडवून आणेल, त्यात वर्गातील सर्व सहभागी होतील असा प्रयत्न करील. सर्वांना विचार करायला प्रोत्साहन देईल. प्रत्येक धड्यातील विषय नीट समजावा म्हणून त्यासंबंधी अभिनव उपक्रम घेण्याचा प्रयत्न करेल, परीक्षेची प्रश्नपत्रिका काढतानाही विशेष काळजी घेईल. फक्त माहिती विचारणारे प्रश्न न देता विचार करायला प्रवृत्त करणारे प्रश्न विचारेल. थोडक्यात, आपले अध्यापन हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण व्हावे याचा तो पुरेपूर प्रयत्न करेल.
हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!
आपले अध्यापन अव्वल दर्जाचे व्हावे म्हणून काळजीपूर्वक प्रयत्न करणारे जास्तीत जास्त शिक्षक आज हवे आहेत. ज्यांनी पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण अतिशय व्यवस्थितपणे, अभ्यासू वृत्तीने पूर्ण केले, ज्यांना खरोखरच शिक्षक होण्याची इच्छा आहे, असे उमेदवार शिक्षक म्हणून निवडले जाणे, ही काळाची गरज आहे. मात्र त्यासाठी अध्यापनात कोणतीही रूची नसलेल्या आपल्या मुलीला, मुलाला, सुनेला, अन्य कोणा नातेवाईकाला, किंवा भरपूर पैसे देऊ शकणाऱ्या उमेदवाराला नोकरी देण्याची प्रचलित पद्धत संपवावी लागेल. हे कधी होईल का?


