यश:श्री
मनुष्य हा सुरुवातीपासूनच प्राणीमित्र. मंदिराच्या कोरीव कामात, विविध उत्खननात तसेच विविध लेण्यांमधील चित्रांमध्ये याचा प्रत्यय येतो. आजही कुत्रे, मांजरी, पक्षी, मांजरे पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना आकर्षण असते ते हत्तीचे! या अजस्त्र प्राण्यालाही मानवाने अंकित केले आहे. या हत्तींचे पालन राजेमहाराजांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात होत असे. हत्तीवरील अंबारीतून राजेमहाराजे फिरत असत. त्याचप्रमाणे युद्धातही याचा वापर केला जात असे.
थोर विदुषी दुर्गा भागवत यांचा हत्तीसंदर्भातील एक लेख अलीकडेच वाचनात आला. त्यात त्या म्हणतात, हत्तीचा मोठा आकार, युद्धातील त्याचे शौर्य आणि त्याच्या देखभालीसाठी येणारा प्रचंड खर्च पाहता, त्याकाळी ते केवळ सरदार आणि राजेमहाराजांच्या अखत्यारित असत. त्यातही पांढरा हत्ती इंद्राचे वाहन असल्यामुळे या हत्तींना विशेष बहुमान दिला जात असे. सम्राट किंवा चक्रवर्ती राजांकडे असलेला पांढरा हत्ती म्हणजे एक प्रकारचा खजिनाच असे. त्या हत्तीला खूप बहुमान आणि सुरक्षा दिली जात असे.
अकबर किंवा त्यापूर्वीच्या जहांगिरच्या काळातील एका मुगल चित्रात पांढरा हत्ती चित्रीत करण्यात आला आहे. हे चित्र बनारस येथील भारत कला भवन येथे आहे.
हेही वाचा – राजवैभवी मोर… तख्त-ए-ताऊस
मध्ययुगीन भारतातल्या राजांना वेगवेगळ्या पदव्यांनी गौरविण्यात येत असे. ते स्वत:ला ‘गजपती’, ‘अश्वपती’, ‘नरपती’ म्हणवून घेत असत. आक्रमणकर्त्या मुसलमानांनाही या प्राण्याचे महत्त्व कळले आणि त्यांनी आपल्या नवीन सैन्यात त्याला विशेष स्थान दिले, असे बखरकार अब्दुल फझल याने म्हटले आहे. युद्ध लढविण्यात हत्तींचा वापर करण्यात येत असल्याने पायदळ, अश्वदळ याप्रमाणे गजदळ असे. राजेशाही तबेल्यात युद्धाच्या हत्तींना विशेष स्थान होते. भरहुत (भरहट), सांची, अमरावती वगैरेंसारख्या ठिकाणी युद्धाची जी चित्रे चित्रीत करण्यात आली आहेत, त्यात लढाऊ हत्ती पाहायला मिळतात. कोनार्कच्या मध्ययुगीन मंदिराजवळ एक भव्य स्तंभ आहे. त्यावर शत्रूला तुडविणार हत्ती तसेच लढणाऱ्या हत्तींचे वेगवेगळे पवित्रे दर्शविण्यात आले आहेत, असे दुर्गाबाईंनी या लेखात नमूद केले आहे.
मोगल सम्राटांनी युद्धात हत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. विशेषतः, अकबर बादशहाला या उमद्या प्राण्याची आवड होती. अकबरने आपल्याकडील हत्तींना प्रशिक्षण दिले. अकबर बादशहाला हत्तीवर स्वार होऊन फिरण्याची आवड होती आणि त्याचा वैयक्तिक असा हत्तींचा तबेला होता. दोन हत्तींची लढत पाहण्याचीही अकबरला आवड होती. त्याचा हा छंद आपल्याला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयामधील चित्रामध्ये पाहायला मिळतो. अकबरच्या आवडत्या हत्तीचे नाव ‘हवाई’ होते.
अब्दुल फझल यांच्या ‘ऐन – ई- या अकबरी’ मध्ये अकबरच्या आमदनीतील हत्तींची खूप माहिती दिली आहे. हत्तींचे प्रशिक्षण आणि देखभालीकडे सम्राट अकबरचे बारकाईने लक्ष असे. हजेरीप्रमुखाचा गौरव किंवा दंड ठोठावण्याची पद्धतही त्याने सुरू केली होती. तो वैयक्तिकरीत्या हत्तींचे नियमित निरीक्षण करीत असे. हत्तीच्या माहुताला मोठा मान दिला जात असे. तसेच, त्यांना दरबारातही मानाचे स्थान मिळत असे. एखादा हत्ती जर मेला, तर त्याला सांभाळणाऱ्याकडून संबंधित हत्तीच्या किमतीएवढा दंड वसूल केला जाई. तसेच, आक्रमण करण्यासाठी हत्तीला जर एखादे (मादक) द्रव्य दिले आणि त्यात तो जर मेला, तर त्याच्या पालनकर्त्याला मृत्यूची शिक्षा ठोठावली जायची, अशी माहितीही या लेखात देण्यात आली आहे.
हेही वाचा – प्राचीन चित्रकला अन् मोर
हत्तींची झुंज हा खेळ मुगल सम्राटांचा आवडता खेळ होता आणि त्या पुढील काळातील सत्ताधाऱ्यांमध्ये तो अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला. ही झुंज पाहताना राजेमहाराजे एवढे उत्साहित होत की, कधी कधी कुटुंबातच शाब्दीक चकमकी झडत असे. जहांगीर आणि त्याचा तापट मुलगा खुसरौ यांच्यातही हत्तीच्या या झुंजीवरून वादावादी झाल्याचा उल्लेख अब्दुल फझल यांनी केले आहे. चित्रकृतींमध्ये आपल्याला बहुतांशी हत्तींच्या झुंजींची चित्रे पाहायला मिळतात.
क्रमश:


