नोकरीसाठी गाव सोडून आता बरोबर पंचवीस वर्षे झाली. तरीही गाव अन् गावाची ओढ काही कमी होत नाही. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, नोकरीची रखरखीत, तणावग्रस्त जिंदगी तात्पुरती गठुळ्यात गुंडाळून, गावाकडच्या शांत आणि स्थिर जगण्याकडं जावं, ही इच्छा उफाळून येते आणि माझी पावलं आपोआप गावाकडे वळतात…
निवाळसंख खळाळत्या पाण्याचा ओढा ओलांडून गावच्या वेशीला पोहचतो न पोहचतो तोच, दिवसरात्र वाजणाऱ्या मारुतीच्या देवळातील, बापू दादाच्या महिपाने नवसाने बांधलेल्या, भल्या मोठ्या पितळी घंटेचा प्रसन्न लहरी उत्पन्न करणारा, गावचा आसमंत भरून टाकणारा, पवित्र घंटानाद लहरत राहतो. पहाटेच्या काकड आरतीला पेटविलेल्या धूपाचा दरवळ देवळातून बाहेर पडून गावभर मांगल्य लेऊन पसरलेला असतो. पंढरीची वारी करून परत येताना वाटेत सापडलेल्या पिवळ्या चाफ्याचं रोप, नारायण बुवांनी घरासमोर लावले त्याला आता बरीच वर्षे झाली. पण हयात नसलेल्या नारायण बुवांच्या पिवळ्या चाफ्याचा धुंद करणारा सुगंध आज इतक्या दुरुनही सभोवताली दरवळत राहतो.
पूर्वी बारमाही कोरडा असलेला ओढा. काठावर निव्वळ पावसाच्या पाण्यावर उगवणारी निरगुडी, घाणेरी आणि काटेरी देवबाभळीची विरळ झाडी. अस्ताव्यस्त पसरलेल्या ओढ्याकाठी वसलेला दोन अडीचशे उंबऱ्याचा हा माझा खेडेगाव. गावातील माझ्या लहानपणीची पिढी आता थकून, म्हातारी झाली आहे. कोण काठी घेऊन तर कोण गुडघ्यावर हात ठेऊन कसेबसे चालत आहेत.
चार पावलं पुढे जातोय तोच डाव्या हाताने मोडका चष्मा सावरत एका हाताने धोतर धरत समोरून राणूबापू येतात. “कुणाचा रं तू?”
“बापू, मी इठूबा आण्णाचा वकील,” असं म्हणताच, दोन्ही हात हातात घेऊन राणूबापू एक हात माझ्या पाठीवरून अलगद फिरवतात, अन् स्वतःशी बोलत असल्यासारखे सांगत राहतात… “तू आईसमान मानलेल्या तुझ्या चुलतीला भर दुपारी दारुड्या चुलत्यानं निरगुडीच्या फोकंनं मारलं. एवढ्या उन्हाच्या रटात अनवाणी पायानी गावंदरीतून चालत चालत ती माझ्याकडं आली. शेतात चाललेला नांगूर जाग्यावर थांबवून, मी बैलगाडी जुपली. तिला माहेराला सोडून आलो. मानलेला भाऊ असलो तरी, लई जीव लावला तुझ्या चुलतीनं मला. हनुमानाची आन घीवून सांगतो, तुला लांबून बघिटलं अन् तुझ्यात मला जयवंत दिसला. तुझ्यात अन त्याच्यात काय फरक नाय…”
शेतात नवी विहीर पाडताना कड्यावरून कोसळून खाली पडलेल्या आणि दवाखान्यात न्यायच्या आधीच मान टाकून थंडगार होऊन तरुणपणीच काळाच्या पडद्याआड गेलेला, माझा वर्गमित्र असलेल्या जयवंतच्या आठवणीमुळे मी आणि त्यांच्या लेकराच्या आठवणीमुळे राणूबापू गलबलले, दोघांच्याही डोळ्याला लागलेली उष्ण आसवांची धार पुसत पुसत राणूबापू मला चार पावलं घराकडे सोडवायला येतात.
हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?
उसाच्या वाळलेल्या पालाच्या सपरात, निरगुडीच्या कुडाला अडकवलेली फाटकी वायरची पिशवी काखेत मारून रोज रात्री हिंदू नानाच्या घरात, दोघे चौघे साथीदार जमवून, राकीलच्या दिव्याच्या धुरकटलेल्या उजेडात, शेणानं सारवलेल्या भुईवर गोलाकार बसून, पिशवीतील जुनी चोपडी समोर पसरून, किनऱ्या आवाजात भेदिक म्हणणारे, डोक्यावर मळकी टोपी घातलेले, पैरणीवर राखट रंगाचा जुना कोट घातलेले दामूकाका वाटेत भेटतात. त्यावेळच्या त्यांच्या काळ्या लांबसडक मिशा आता कापूस पिंजारल्यासारख्या पांढऱ्या धोट झालेल्या असतात. माझ्याजवळ आल्यावर समोर भेदिकमधला डफ घेऊन ताठ उभा राहिल्यासारखे थांबून, डोळे रोखून प्रेमळ भाषेत मला म्हणतात, “तुझा बाप प्रत्येक एकादशी बारशीला तुमच्या घरात भेदिक जुगलबंदी घ्यायचा. तू त्यावेळी आमच्या अंगाखांद्यावर खेळायचास… गेले ते दिवस. आता भेदिक गेलं आणि तूणतुणं पण गेलं. आत्ताच्या पोरांची दुनिया नव्यानंच उमाटली. पण त्यात आमी कुटंच न्हाय. भूक लागतीया म्हणून खायाचं अन् मराण येत न्हाय म्हणून जगायचं, न्हायतर दुसरं आमचं उरलंयच काय?” गदगदलेले दामूकाका शांत व्हायला बराच वेळ जातो. नंतर मी माझ्या घराच्या दिशेने चार पावले पुढे जातो.
सुगीच्या दिवसात ईळ्याला आणि खुरप्याला धार लावायला लव्हारवाड्यात गेल्यावर माँड झाल्यालं ईळं, खुरपं भट्टीत घालून मला भाता हलवायला लावून, लाल भडक इंगळावानी तापलेलं खुरपं ऐरणीवर ठेवून, हातोड्यांनं ठोकं देता देता घोगऱ्या आवाजात भुताच्या गोष्टी सांगणारे लव्हाराचे यासिनभाई समोरुन येतात. कपाळावर डाव्या हाताची झापड ठेवून बारीक डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणतात, “इठूबा आण्णाचा पोरगा काय?” मी काही उत्तर देण्याआधीच थकलेल्या आवाजात सांगतात, “तुम्हारे पिता चले गए और तुम्हारे घर की सारी भीड और हलचल खतम हुई। आता खुरुपी गेली आणि आमचा भाता पण गेला. तुम साहब बन गये हो, लेकिन अपने मुलूख को भूले नहीं, ये हमें अच्छा लगता है, बेटे। लेकिन अब यह मिट्टी पहले जैसी नहीं रही है। पैलीवाली मिट्टी तर कवाच खतम झाली. हमारी पीढ़ी को इस बात का दुख है! यासिन भाई बोलत राहतात. ठिगळांनी जोडलेला जुना इतिहास ते याद करत राहतात. यासिन भाईला सलाम करून मी तसाच पुढे जातो.
शेतातून सरकारी पाण्याचा कॅनाल जाताना, साठ वर्ष जुनं असणारं, आबाआज्ज्यानं लावलेलं, पाच माणसांनी वेढा देऊन सुद्धा कवळ्यात मावणार नाही अशा जाड खोडाचं, नारळी आंब्याचं झाड पाडू नका म्हणून सरकारी चालत्या बुलडोझरच्या आडवं झोपणारे आणि आंब्याचं झाड वाचल्यावर दरवर्षी आकितीला त्या झाडाचं पिकलेलं पिवळंशार, रसरशीत आंबं अख्ख्या भावकीत फुकट वाटणारे जानू तात्या भेटतात. सत्तरीच्या वयात सुद्धा नजर चांगली असल्यामुळे ते जवळ येतात आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, ”पाण्याच्या कॅनॉलमधनं जुनं आभाळाला टेकल्यालं आंब्याचं झाड वाचवलं, परंतु सरकारी चारपदरी हायवेच्या कचाट्यातून त्याला वाचवू शकलू न्हाय. आंब्याच्या झाडावरनं बुलडोझर फिरताना आतडं पिळवटून फाटलं. आता तसा आंबा पण मिळणार न्हाय आणि सावली पण.” जानू तात्यांच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरते. नंतर थोडा वेळ शांत जातो. ही विचित्र शांतता संपायला दोन चार मिनिटे जातात. मग तात्यांना वाकून नमस्कार करून मी पुढे चालत राहतो.
दरवर्षी गावजत्रच्या आदल्या दिवशी, मारुतीच्या देवळापुढच्या पटांगणात पडलेली ऐंशी किलो वजनाची दगडी गुंड, एका हबक्यात उचलून खांद्यावर घेऊन पटांगणाला दोन येडं मारून, दगडी गुंडाची जागेवर पलटी करणारे, पण आता थकून गुडघ्याकडून घाईला आलेले महादेव पैलवानआबा समोरून येताना दिसतात. केरळमध्ये असणाऱ्या त्यांच्या पोरग्याने गावी आल्यावर नक्षीकाम असलेली लांब येताची काठी आबांना दिलेली आहे. काठी टेकत टेकत देवळाकडे येताना त्यांनी मला बरोबर ओळखलेले असते. बाजूच्या काळ्याभोर उंच दगडावर टेकून ते मला म्हणतात, “देवळाम्होरं सरकारी कंत्राटदाराने जुनी तालीम पाडून तिच्या जागी मोठा सभामंडपाचा हाल बांधला, त्यावेळी देवळापुढची गुंड पायाभरणीत घातल्यावर देवळाचं कपाळच विधवा बाईसारखं भूंडं झालं. आता दगडाची गुंड गेली. तामखडीच्या तांबड्या मऊशार लोण्यासारख्या मातीची तालमी गेली. तालमीतला मर्दानी छड्डू ठोकण्याचा आवाजही गायब झाला. भरल्या छातीच्या आणि पिळदार मांडीच्या तरण्याबांड पोरांचा जमानाच संपला. वाळलेल्या मिरचीसारखी दिसणारी, खंगलेली पोरं रातदिन त्या मोबाइलकडं खाली मुंडी घालून बघत बसत्यात. लय वाईट वाटतं पोरा. पण आता आमच्या येळचं राहिलयंच काय?” थोडा वेळ असाच जातो. थकलेल्या पैलवानआबांना नमस्कार करून मी पुढे चालत राहतो.
मिलिटरीत असणाऱ्या हिम्मत नावाच्या पोटच्या पोराकडं दहा-पंधरा दिवस राहून परत येताना रेल्वेच्या डब्यात बसल्यावर खिडकीतनं बाहेर तोंड करून, “चुली शेजारच्या भगुण्यात येळवण्याची आमटी केलीया, तुला आवडत्यात म्हणून सणासुदीला करते तशा पुरणपोळ्या पण केल्यात, रोज सकाळी तुझ्या खोलीवर येणाऱ्या दूधवाल्या पोराला मी अर्धा लिटर दूध वाढवायला सांगून रोज त्याचं दही लावून जर्मनच्या डब्यात तूप साठवून ठेवलंय, माघारी गेल्यावर खाऊन घे. येळंवर खात जा. आमची कायबी काळजी करत जाऊ नकूस.” असं म्हणून फलाटावरुन रेल्वे सुटल्यावर बऱ्याच वेळानं डोळ्याला पदर लावणारी, ताठ कण्याची, पण आता पार वाकून, खंगून गेलेली सारजा म्हातारी समोरुन येते. मला पाहताच काठी बाजूला टाकून माझा हात हातात घेते, कंप पावणाऱ्या ओल्या आवाजात म्हणते, “हिम्मत आज असता तर तो पण उन्हाळ्याच्या सुट्टीला गावाकडे आला असता. पण तू काय आणि हिम्मत काय मला दोन न्हाईत. पोटचा गोळा माझ्या आधी गेला म्हणून वाईट वाटतंय, पण देशाच्या कामी आला म्हणून समाधान पण वाटतंय. आत्ताची पोरं मिलिटरीतली नकली कापडं घालून मोबाइलवर कायतरी करत्यात, असलं बघून लय दुःख हुतंय. दुनिया पार बदलली बाबा.” सारजा म्हातारी मधेच थांबते. दुःखाच्या भरात तिला पुढचं काहीच आठवत नाही. म्हातारीचा निरोप घेऊन मी तसाच पुढे चालू लागतो.
सिमेंट काँक्रिटच्या रंगवलेल्या ग्रामपंचायतीच्या दोन मजली इमारतीच्या बाजूला असणाऱ्या, पडक्या भिंतीच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून, मायेनं भरलेली ओल्या आवाजाची हाक ऐकू येताच माझी पावलं जागीच थबकली. वर्षभरात रिटायर होणारे, कायम पांढरी विजार आणि साने गुरुजीसारखी टोपी घालणारे, शाळेतले वयस्कर माने गुरुजी माझ्याच दिशेने येत होते. जवळ येताच माझ्या तोंडातून शब्द फुटण्याआधीच त्यांनी दोन्ही हातांनी माझे दोन हात घट्ट धरले. “कधी आलास? नोकरी काय म्हणते? छोकरे किती? बायको आणलीस की, एकटाच आलायस?” मी उत्तर देण्याआधीच गुरुजी पुढे म्हणतात, “मागच्या बाजूला गोल ठिगळं असणारी खाकी चड्डी आणि पुढचा भाग फाटलेला म्हणून झाकण्यासाठी चौकोनी रंगीत ठिगळांच्या पांढऱ्या सदऱ्यावर तू शिकलास. तुमची सगळी पिढी तशीच शिकली. पण आता शाळा डिजिटल झाल्या. गुरुजींच्या खिशात डायरीऐवजी मोबाइल आले. प्रोजेक्टरवर अभ्यासक्रम आला. साऱ्याच कवितांना एकच सरकारी चाल लागली. पोरांच्या अंगावर इंग्लिश धाटणीचे ड्रेस आले. शाळेला कंपाऊंड आलं आणि गाव शाळेपासून दुरावत चाललं. नडीअडीला, प्रत्येक अडचणीला गाववाला पूर्वी गुरुजीकडे यायचा. आता गावाचं गुरुजींवाचून काही अडत नाही आणि गुरुजींचं गावावाचून काही अडत नाही. मुलांना रागावलं तर, गुरुजींना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या सुरू होतात. धाक, दरारा, भीती नष्ट झाली. आनंददायी शिक्षणाच्या नावाखाली जणू स्वैराचारच सुरू झाला. हातात माती धरली तरी, सोनं होण्याचा आता काळ निघून गेला. साऱ्या सुविधा असूनही शिक्षणव्यवस्थेत रितेपणा असल्याची भावना दाटून आली… भरल्या घरात एकटेपणा वाटावा तशी. काय ते समजत नाही, पण आपलं काहीतरी चांगलं हरवत चाललंय..!” गुरुजींच्या कंप पावणाऱ्या हातातला माझा हात मी कसाबसा सोडवतो. जास्तच गलबलून यायला लागल्यावर मी वाकून गुरुजींच्या पायांना स्पर्श करतो आणि पुढे चालायला लागतो.
राजकारणाच्या नादी लागून चुलत भावाच्या पोराचं लग्न मोडणाऱ्या शिरपाला, “मांडवावर चढत असलेला योल खुडत जाऊ नकूस. ते आपल्याच पोरा बाळांना चांगलं नसतंय…” असं खडसावून सांगणारे, गावातल्या प्रत्येक लेकीबाळीच्या लग्नात अंतरपाट धरून लग्नं लावणारे, गावात कोणीही मयत झाला तर तेराव्या दिवशी त्याच्या अंगणात शिंग वाजवणारे, चारी बाजूला असणाऱ्या चारही मंदिरात नित्यनेमाने पहाटे जाऊन पूजाअर्चा करणारे, माहेरवाशीणीच्या घरात गोडाधोडाची दुरडी पोच करणारे, घरोघरी जाऊन लाडवाची बुत्ती वाटणारे, डोक्याला गुलाबी पटका आणि धुतलेलं पांढरं शुभ्र धोतर एका हातात धरून, दोन्ही गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे काठी टेकत टेकत हळूवार चालत येणारे, कपाळावर, कानावर अष्टगंध लावलेले, दंडावर, हातावर महादेवाचं इबित लावलेले, पांढऱ्या करड्या लुळ्या पडलेल्या मिशा असणारे, दोन्ही डोळ्यांच्या बुबळांच्या कवड्या झालेले गुरव आप्पा मला दिसतात. मी जवळ गेल्यावर म्हणतो, “आप्पा, ओळखलं का? तब्येत काय म्हणते?”
गुरव आप्पा डोळ्याची बाहुली मोठी करून माझ्याकडे पाहतात. म्हणतात, “इठुबा आण्णाचा वकील हाय वाटतं.” थोडा वेळ दम खाऊन पुन्हा ते बोलू लागतात. “तुझा बाप आणि आम्ही एकाच शाळेत शिकलू अन् हितच ल्हानाचं मोठं झालू बाबा. पण त्या वेळचा काळ आणि आत्ताची दुनिया लय बदलली. आता मारुतीच्या देवळाम्होरं भिकू आण्णाचा बियरबार आला. मधल्या मळ्यातील विहिरीवरचा रहाट कुजला. साखर कारखाना आला आणि गावातल्या गुऱ्हाळाचा धूरच घेऊन गेला. भूसंपादनाच्या नावाखाली पारंब्याचा सूर गेला. मागच्या पंचायतीच्या मतदानात तुका पाटील ठार झाला. गावच्या राजकारणामध्ये गटातटात अडकलेल्या सख्ख्या भावांच्या हातातल्या कुऱ्हाडी बघून सुंद्रा म्हातारी हकनाक मेली. सणासुदीची, माहेरवाशीणीची गोडा-धोडाची दुरडी गेली… झिम्मा गेला… फुगडी गेली… वरात गेली. लेझीम तुटली, हलगी फुटली, जातं गेलं… ओवी गेली… गाई, म्हशीचा गोठा गेला. उड्डाणपूलाच्या टाचेखाली सारा गावच दडपून गेला.”
हेही वाचा – सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!
“पूर्वी आम्ही कधीतरी मंबईला जायाचू. तिथं गेलं की नुसतं पळायला लागायचं. आता मंबईला जायाची गरजच उरली न्हाय. आपलं गावच आता मंबई झालंय. सकाळपासून रात्रीपर्यंत माणसं नुसती पळत्याती. माणसात माणूस राहिलं न्हाय. कुणालाच कुणाशी बोलायला येळ उरला न्हाय. गावचं गावपणच गेलंय. माडीची घरं आणि हायवेचं सिमेंटचं रस्तं आलं. बघल त्यावेळी रस्त्यावरून गाड्या शर्यत लावल्यागत पळत्यात. कुठं जात्यात? कशासाठी पळत्यात? काय कळत न्हाय. माणूस एका जागी थांबायला तयार न्हाय… थांबला तरी त्याला मोबाइलमुळं बोलायला फुरसत न्हाय. काळच बदलला बाबा. त्याला कोणतरी काय करणार?”
गुरव आप्पा बराच वेळ बोलत राहतात. उद्ध्वस्त झालेल्या गावपांढरीमुळं ते व्यथित झालेले असतात. हयात घालवून जीवापाड जपलेल्या गावपांढरीच्या मुलखातून त्यांच्या पिढीची पाळंमुळं विकासाच्या नावाखाली उखडून टाकली जात असताना ते असहाय्यपणे पाहात असतात. बऱ्याच वेळाने त्यांनी धरलेला हात सोडून मी त्यांचं वाकून दर्शन घेतो. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते खूप मोठा आशीर्वाद देतात. तो घेऊनच मी माझ्या घराकडे झपझप चालू लागतो…!!!


