माधवी जोशी माहुलकर
गूळ आणि कणीक यांचे शंकरपाळे म्हणजे अफलातून स्वाद! गुळाचे आणि गव्हाचे इतकं ‘गूळपीठ’ आहे ना की, एकमेकांमध्ये ते कधी अधीन होऊन एकजीव होतात, हे कळत नाही! कणकेमध्ये साखरेपेक्षा गुळाचा गोडवा चवीला जास्त छान लागतो नक्कीच! गूळ आणि कणकेचे शंकरपाळे करायला अगदी सोपे… फार काही जास्त तामझाम न करता सगळ्या पदार्थांमधे आपला गोडवा व वेगळेपण जपणारा पदार्थ आहे!
साहित्य
- गूळ – 1 वाटी (पावडर किंवा बारीक केलेला)
- दूध – 1 वाटी
- तूप – 1 वाटी (पातळ केलेले)
- पाणी – 1 वाटी
- मीठ – चिमूटभर
- कणीक – दूध, तूप, पाणी आणि गूळ यांच्या मिश्रणात मावेल इतकी
- बारीक रवा – अर्धी वाटी (ऐच्छिक)
- तेल किंवा तूप – तळणासाठी
हेही वाचा – दिवाळी फराळ… प्रथा आणि परंपरेची जपणूक
कृती
- प्रथम एका कढईत एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
- त्यातच वितळलेले तूपही आणि एक वाटी गुळाची पावडर अथवा बारीक केलेला गूळ टाकावा.
- गूळ पूर्णपणे विरघळला की, दूध, पाणी, तूप आणि गुळाचे गरमसर मिश्रण एका मोठ्या पसरट भांड्यात घ्यावे.
- यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे आणि या मिश्रणात मावेल तितकी कणीक आणि अर्धी वाटी रवा टाकून कणकेचा घट्ट गोळा मळून घ्यावा. थोडा वेळ कणीक झाकून ठेवावी.
- कणकेचा हा गोळा थंड झाल्यावर हाताने चांगला मळून एकसारखा करावा.
- त्यानंतर पोळपाटावर याची एक पातळसर पोळी लाटून घ्यावी आणि शंकरपाळ्याच्या कापणीने किंवा सुरीने याचे चौकोनी तुकडे कापून घ्यावेत.
- सुरुवातीला मोठ्या आचेवर कढईत तेल किंवा तूप गरम करून घ्यावे. त्यानंतर मध्यम आचेवर गॅस करून कढईत हळूवार शंकरपाळे सोडावेत.
- गॅसची मध्यम-मंद आच करत हे गूळ आणि कणकेचे शंकरपाळे गुलाबीसर तळून घ्यावेत.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी
टीप
- हे शंकरपाळे चवीला अत्यंत छान लागतात, शिवाय मैद्याचा वापर टाळल्याने पौष्टिकही होतात.
- कणकेचे शंकरपाळे थोडे दिवसांनी वातड होतात. म्हणून ते खुसखुशीत करण्याकरिता मिश्रणात थोडा रवा घातला जातो.
- कणकेचे शंकरपाळे गॅस लो-मीडिअम फ्लेमवर ठेवूनच तळावे. हाय फ्लेमवर ते जळतात आणि रंग हवा तसा येत नाही.
एकूण कालावधी – एक ते दीड तास
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


